वाचनाची सवय कशी लावावी? वाचन का करावं? आणि वाचनाचे फायदे काय? 💖💙
आजच्या जगात वेळ असतो पण शांती नसते, मोबाईल असतो पण संवाद नसतो, शाळा असतात पण खरं शिक्षण हरवत चाललंय. या सगळ्या गोंधळात, एक साधं, शांत पण परिवर्तनशील उत्तर आहे नि ते म्हणजेच वाचन. पुस्तक हे फक्त 200-300 पानांचं वस्त्र नसतं, ते एक आयुष्य असतं. कुणीतरी जगलेलं, अनुभवलं नि प्रेमानं लिहून ठेवलंलेलं. आपण त्या आयुष्याशी जोडले जातो. पण अनेक जण म्हणतात की – मला वाचायची इच्छा होते, पण जमत नाही. मग प्रश्न पडतो की, वाचनाची सवय लावायची तरी कशी? तर माझ्या अनुभवाने उत्तर देतो .🌱 सुरुवात ही कायम लहानच असते. दिवसाला फक्त 10-15 मिनिटं एका छोट्याश्या पुस्तकासोबत घालवा. कधीही वेळ मिळाला नाही, असं होणार नाही. वेळ काढावा लागतो. जेवताना, बसमध्ये, झोपायच्या आधी कुठलीही 5-10 मिनिटं फोनऐवजी पुस्तकासोबत घालवा. सुरुवातीला पानं कमी समजतील, लक्ष विचलित होईल पण चिकाटी ठेवली तर ही सवय हळूहळू आपलं जगच बदलून टाकते. सुरुवातीला सोपं नि आपल्या आवडीचं वाचा. पौराणिक कथा, बालसाहित्य, थरारक गोष्टी, आत्मचरित्र, विज्ञानविषयक पुस्तकं… जे मनाला भिडेल ते निवडा. वाचन ही स्पर्धा नाही तर एक सुंदर मैत्री आहे. मोबाईलवर e-book, पीडीएफ व...