सार्वजनिक सत्य धर्म ....🌼❤️

तात्यांनी लिहलेलं 1891 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक एका स्पर्धेसाठी पुन्हा एकदा वाचलं नि पुन्हा विचारांच्या चक्रात बुडालो. या पुस्तकातून मला त्यांच्या विचारांचा नि समाज बदलासाठीच्या त्यांच्या धडपडीचा एक वेगळाच अनुभव येतो नेहमीच. हे पुस्तक मुळात धर्म किंवा तत्त्वज्ञानावर भाष्य करणारे नाही तर ते आपल्या समाजातील मुळ समस्यांवर, जातिव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता, शिक्षण नि माणुसकी यावर खोलवर विचार करायला लावणारे आहे. फुले यांनी धर्माचा अर्थ पारंपरिक कर्मकांड किंवा अंधश्रद्धा म्हणून न पाहता, तो माणसाच्या जीवनात न्याय, समानता अन् बंधुत्व निर्माण करणारा असा स्वीकारला आहे.  

या पुस्तकात त्यांनी ‘सार्वजनिक’ म्हणजे सर्वांसाठी खुला, सत्य म्हणजे तर्कशुद्ध नि अनुभवावर आधारित नि धर्म म्हणजे माणसाने माणसाशी माणुसकीने वागणारा असा अर्थ दिला आहे. मला हे 152 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तकं  वाचताना जाणवलं की, तात्यांचे मते धर्म हा  समाजाच्या कल्याणासाठी नि सर्वांच्या हितासाठी असावा, असं त्यांचं ठाम मत आहे. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता नि स्त्री-पुरुष असमानतेचा कटाक्षाने विरोध केला आहे नि शिक्षणाला समाज बदलण्याचं मुख्य साधन मानलं आहे.  

पुस्तकातील संवादात्मक स्वरूप नि प्रश्न-उत्तरं मला फार आवडली. यामुळे तात्यांचे विचार अधिक स्पष्ट नि समजण्यास सोपे झाले. त्यांनी धर्म, मोक्ष, पुण्य-पाप, ईश्वर यांसारख्या संकल्पनांवर तर्कशुद्ध नि मानवतावादी दृष्टिकोनातून विचार मांडला आहे. हे वाचताना मला वाटलं की,महात्मा फुले यांचा धर्म म्हणजे केवळ धार्मिक उपासना किंवा कर्मकांड नव्हे, तर तो आपल्या रोजच्या वागणुकीत नि समाजाशी असलेल्या नात्यांमध्ये दिसायला हवा.  

या पुस्तकाने मला माझ्या विचारसरणीत नि समाजाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बदल घडवायला मदत केली. फुले यांचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण अजूनही समाजात अनेक प्रकारच्या भेदभाव नि अन्याय आहेत. समाजात खरा बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःच्या मनात माणुसकी, समता नि न्याय या मूल्यांना जागृत करावं लागेल.‘सार्वजनिक सत्य धर्म’ हे पुस्तक माझ्यासाठी विचारांना नवी दिशा देणारं नि समाजातील गैरसमज दूर करून समतेच्या मार्गावर वाटचाल करण्याचं आवाहन करणारे आहे एवढं नक्की..🌼❤️

©️Moin Humanist 🌼

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼