अरण्यकांड ....🌱🍂
आज अनंत मनोहर सरांना जाऊन चार वर्षे झाली त्यांना भावपूर्ण आदरांजली.🌼💐
माझा एक ठाम विश्वास आहे की आपण पुस्तकं निवडत नाही तर पुस्तकं आपल्याला निवडतात. माझ्याबरोबर हे अनेक वेळा घडलं आहे. कधी आपण ठरवतो की हे पुस्तक वाचायचं, पण आपल्यासमोर काहीतरी वेगळंच येतं नि त्या पुस्तकात आपण हरवून जातो. ‘अरण्यकांड’ या कादंबरीबाबत असंच काहीसं घडलं.
2021 साली अनंत मनोहर सरांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या नावाबद्दल फारशी माहिती नव्हती. पण काही लेख वाचून त्यांच्या बद्दल कुतूहल निर्माण झालं. त्यांचं साहित्य मी वाचन यादीत टाकलं. मागे पुण्यात एका पुस्तकदालनात ‘अरण्यकांड’ दिसली, अनंत मनोहर यांचं नाव पाहून ती लगेच घेतली. वाचायला सुरुवात केली नि सुरुवातीला फक्त चाळायचं म्हणत घेतलेलं पुस्तक अक्षरशः मनात घर करून गेलं. जेव्हा वाचन पूर्ण झालं, तेव्हा असं वाटलं की एक विलक्षण प्रवास नुकताच संपला.
‘अरण्यकांड’ एक जिवंत अनुभव आहे. या कादंबरीत निसर्ग हा खरा नायक आहे. जंगलातील झाडं, वेली, गवत, प्राणी, पक्षी हे सगळं लेखकाने ज्या प्रकारे जिवंत केलं आहे, ते थक्क करणारं आहे. जंगलात रोज चालणारा संघर्ष, तग धरून राहण्यासाठी चाललेली धडपड नि त्यामध्ये सैतान नावाचा एक जबरदस्त नाग यामुळे ही कथा अजूनच थरारक होते.
जणू आपण स्वतः जंगलात वावरतो आहोत, असं वाटायला लागतं. प्राणी, पक्षी, कीटक, आदिवासी, वनखात्याचे कर्मचारी, चोरटे व्यापारी, औषधी शोधणारे लोक हे सगळं जग आपल्याला इथे एका वेगळ्याच स्वरूपात भेटतं. कधी वाटतं जंगल खूप सुंदर आहे, पण आतून ते किती कठीण व धोकादायक असू शकतं हे कादंबरी वाचताना उलगडत जातं.
जंगलात राहणाऱ्या आदिवासींचं जीवन, त्यांची कला-कौशल्य, त्यांच्यावर होणारा अन्याय नि त्यांचं जंगलाशी असलेलं नातं हे सगळं आपल्याला हलवून जातं. प्राण्यांच्या कातडीची चोरी, विदेशात होणारी तस्करी नि माणूस आपल्या स्वार्थासाठी किती निर्दय होऊ शकतो यावरही ही कादंबरी विचार करायला लावते.‘अरण्यकांड’ला भैरूरतन दमाणी पुरस्कार मिळालेला आहे, यामागचं कारणही स्पष्टपणे जाणवतं. ही कादंबरी एका झटक्यात सुचून लिहिली गेलेली नाही. लेखक अनंत मनोहर यांनी सहा वर्षं अभ्यास करून, डोंगर-दऱ्या, अरण्य पाहून, भारतातली नि परदेशातली जंगलं फिरून, अनेक पुस्तकं वाचून अन् चर्चा करून हे लेखन सिद्ध केलं आहे. शिमोगा जिल्ह्याचा गॅझेटियर, इंग्रजी नि मराठी ग्रंथ, फॉरेस्ट गाईड्स हे सगळं संशोधन करूनच ही कादंबरी निर्माण झाली आहे.
आजकाल आपण शहरातल्या आरामदायक आयुष्यात राहत असतो. पण जंगलात जे जगणं चालतं, जे संघर्ष सुरू असतात, ते ‘अरण्यकांड’ आपल्यासमोर उभं करतं. थेट नि थक्क करणाऱ्या भाषेत. माझ्यामते ही फक्त निसर्गकथा नाही तर माणसाच्या नि निसर्गाच्या नात्याचा एक सुंदर दस्तऐवज आहे .
जर तुम्हाला निसर्ग, जंगल आणि अशा अद्भुत विश्वाची ओळख करून घ्यायची असेल नि एक शानदार अनुभव घ्यायचा असेल तर ही कादंबरी जरूर वाचा. एकदा वाचायला सुरुवात केली, की संपेपर्यंत ठेवावीशी वाटत नाही एवढं नक्की...🥰
© Moin Humanist ✍️
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा