रिच डॅड पुअर डॅड...🥰🌼

अखेर हे पुस्तक मी पुन्हा दुसऱ्यांदा वाचलं नि यावेळी ते मला अधिक खोलवर समजलं. पहिल्यांदा वाचताना त्यातील काही गोष्टी नवीन वाटल्या होत्या पण दुसऱ्यांदा वाचताना प्रत्येक कल्पना जास्त स्पष्ट, समजण्यासारखी अन् थेट मनाला भिडणारी वाटली. लहान वयातच पैशांबद्दल योग्य समज असावी यासाठी हे पुस्तक फार उपयुक्त आहे.

या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी सांगतात की त्यांचे दोन वडील होते एक ‘शिकलेले’ पण गरीब वडील (Poor Dad), जे कायम म्हणायचे की चांगलं शिक, चांगली नोकरी कर म्हणजे आयुष्य सुरक्षित होईल. नि दुसरे होते ‘बिजनेस’ वडील (Rich Dad), जे खूप शिकलेले नव्हते, पण पैसा नि गुंतवणूक याबद्दल शहाणे होते. या दोघांच्या विचारांमध्ये खूप फरक होता व लेखकाने लहानपणापासूनच या दोघांकडून वेगवेगळ्या शिकवणी घेतल्या. त्यामुळेच हे पुस्तक केवळ आर्थिक सल्ला देत नाही, तर आपल्याला विचार करण्याची नवी दिशा देते.

या पुस्तकात लेखक सांगतो की गरीब नि मध्यमवर्गीय लोक नेहमी पैसा कमावण्यासाठी काम करतात पण श्रीमंत लोक पैसे त्यांच्या साठी काम करायला शिकतात. हे वाक्य ऐकायला साधं वाटेल, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. याचा अर्थ असा की, नुसते नोकरी करून पैसे कमावणं पुरेसं नाही तर पैशाचं योग्य नियोजन करून, गुंतवणूक करून, तुमचं उत्पन्न वाढवणं जास्त महत्त्वाचं आहे.

पुस्तकात Asset नि Liability म्हणजे काय हे अगदी सोप्या शब्दांत समजावले आहे. Asset म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसा आणते जसे की भाड्याने दिलेलं घर, व्यवसाय, शेअर्स. तर Liability म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्याकडून पैसा घेत राहते जसे की मोठं कर्ज, फक्त वापरासाठी घेतलेली कार. बहुतेक लोक त्यांच्या Liabilities ना Asset समजतात नि मग अडचणीत येतात. लेखक सांगतो की खऱ्या श्रीमंत लोकांची सवय असते आपली Asset वाढवणं अन् Liabilities कमी करणं.

हे पुस्तक वाचताना अजून एक महत्त्वाचं धडा मिळतो तो म्हणजे ‘Financial Education’चा. शाळा आपल्याला गणित, विज्ञान, इतिहास शिकवते पण पैसा कसा हाताळावा, गुंतवणूक कशी करावी, tax कसे भरावे हे शिकवत नाही. नि म्हणूनच लेखक सांगतात की फक्त मार्क मिळवणं हेच आयुष्य नाही तर पैशाचा योग्य उपयोग शिकणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

या पुस्तकातील आणखी एक गोष्ट मनाला भावली ती म्हणजे चुका होऊ द्या नि त्यातून शिका.गरीब वडील म्हणायचे, “मी हे करू शकत नाही”, तर श्रीमंत वडील म्हणायचे, “हे कसं करता येईल ते शिक.” यामागचा मोठा फरक म्हणजे mindset. लेखक आपल्याला नेहमी सकारात्मक विचार करायला,भीती पळवून लावायची नाही, तिच्याशी मैत्री करायची शिकवतात.

2025 सालीही हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. आजही अनेक लोक फक्त नोकरीवर अवलंबून असतात, फक्त पगारासाठी काम करतात. पण आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर व्यवसाय, गुंतवणूक पैशाची शहाणीव हे सगळं समजून घेतलं पाहिजे.

माझ्यासाठी हे पुस्तक एक डोळे उघडणारा अनुभव होता. हे फक्त वाचायला पुस्तक नाही, तर आपल्याला पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारं मार्गदर्शन सुद्धा आहे.लहान वयातच जर हे पुस्तक कुणी समजावून दिलं, तर पुढचं संपूर्ण आयुष्य जास्त सुरक्षित, शहाणपणाचं नि स्वतंत्र असू शकतं.म्हणूनच विद्यार्थ्यांनी, तरुणांनी नि स्वतःचं अर्थकारण समजून घ्यायचं ठरवलेल्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं.

हे पुस्तक खूप साध्या भाषेत लिहिलं गेलं आहे, पण त्यातील विचार आपले आयुष्य बदलवू शकतात एवढ नक्की…🌺💚

©️Moin Humanist ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼