वाचनाची सवय कशी लावावी? वाचन का करावं? आणि वाचनाचे फायदे काय? 💖💙



आजच्या जगात वेळ असतो पण शांती नसते, मोबाईल असतो पण संवाद नसतो, शाळा असतात पण खरं शिक्षण हरवत चाललंय. या सगळ्या गोंधळात, एक साधं, शांत पण परिवर्तनशील उत्तर आहे नि ते म्हणजेच वाचन.

पुस्तक हे फक्त 200-300 पानांचं वस्त्र नसतं, ते एक आयुष्य असतं. कुणीतरी जगलेलं, अनुभवलं नि प्रेमानं लिहून ठेवलंलेलं. आपण त्या आयुष्याशी जोडले जातो.

पण अनेक जण म्हणतात की – मला वाचायची इच्छा होते, पण जमत नाही. मग प्रश्न पडतो की, वाचनाची सवय लावायची तरी कशी?

तर माझ्या अनुभवाने उत्तर देतो .🌱

सुरुवात ही कायम लहानच असते.
दिवसाला फक्त 10-15 मिनिटं एका छोट्याश्या पुस्तकासोबत घालवा. कधीही वेळ मिळाला नाही, असं होणार नाही. वेळ काढावा लागतो. जेवताना, बसमध्ये, झोपायच्या आधी कुठलीही 5-10 मिनिटं फोनऐवजी पुस्तकासोबत घालवा. सुरुवातीला पानं कमी समजतील, लक्ष विचलित होईल पण चिकाटी ठेवली तर ही सवय हळूहळू आपलं जगच बदलून टाकते.

सुरुवातीला सोपं नि आपल्या आवडीचं वाचा. पौराणिक कथा, बालसाहित्य, थरारक गोष्टी, आत्मचरित्र, विज्ञानविषयक पुस्तकं… जे मनाला भिडेल ते निवडा. वाचन ही स्पर्धा नाही तर एक सुंदर मैत्री आहे. मोबाईलवर e-book, पीडीएफ वाचली तरी हरकत नाही, पण शक्य असेल तर प्रत्यक्ष पुस्तक हातात घ्या. त्याचा वास, त्याचं स्पर्श हे सगळं मनाशी घट्ट जडतं.

मग वाचनाचं महत्त्व नक्की काय?

जसं शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करावा लागतो, तसंच डोकं तल्लख ठेवण्यासाठी वाचन आवश्यक आहे. अभ्यास केल्यानंतरसुद्धा, मनाला उर्जा देण्यासाठी सर्जनशील वाचन खूप उपयुक्त ठरतं.चांगलं लिहायचं, बोलायचं, विचार मांडायचा असेल तर वाचन हवंच. जास्त वाचणाऱ्या लोकांचा शब्दसंग्रह भरलेला असतो. ते बोलतात तेव्हा शब्द पडतात नाही तर उमटतात.

वेगवेगळ्या संस्कृती, काळ, विचारसरणी यातून माणूस समजून घ्यायला शिकतो. आपल्या मर्यादित आयुष्याच्या चौकटीबाहेरचं जग समजायला लागतं.स्क्रीन, स्टेटस नि सततची तुलना या जाळ्यात अडकलेलं मन पुस्तकांच्या शांतशक्तीनं झोपतं.वाचन हे ध्यानासारखंच आहे. मोबाईलनं थकलेलं डोळं, माणसांनी थकलेलं मन याला जर कुठे ओलावा मिळतो तर तो पुस्तकातचं.यशस्वी लोकांची एक गोष्ट समान आहे ते सतत वाचतात. वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो. दहावी, बारावी, UPSC, MPSC, NEET, CA, कुठलीही परीक्षा असो ज्याचं वाचन भक्कम आहे, त्याचं जग समृद्ध आहे.

यासाठीच study Bunker ही जागा आपण तयार केली आहे.ही संकल्पना म्हणजे स्वतःसाठी तयार केलेली वाचनाची जागा. जिथं केवळ तुमचं नि पुस्तकांचं नातं आहे. हे एकटेपण नसतं, तर स्वतःशी एक प्रेमळ भेट असते. प्रत्येक घरात, हॉस्टेलमध्ये, कॉलेजच्या लायब्ररीत तुमचं स्वतःचं बंकर असलं पाहिजे, जिथं मोबाईल नाही, गॉसिप नाही फक्त शब्दांची साथ असायला हवी.

आता सगळ्यात मोठा प्रश्न वाचन नसेल तर काय हरवतं?

बुद्धी कुंठीत होते. विचार उथळ होतो. स्वतःचा आवाज हरवतो. इंटरनेटचं ज्ञान वरवर असतं, पण पुस्तकांचं ज्ञान खोलवर जातं.
दुसऱ्यांच्या व्हॉट्सऍप युनिव्हर्समध्ये हरवण्यापेक्षा स्वतःचा विचारविश्व तयार करणं शंभरपट चांगलं नाही का?

तर एक संकल्प करा की आजपासून रोज थोडं वाचायचं.
सुरुवात करताना पुस्तक मोठं नको, पण मन मात्र मोठं हवं.
एक दिवस हीच सवय तुमचं आयुष्य घडवेल एवढं नक्की .🍀

© Moin’s Shelf ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼