द सिक्रेट 💙🌱
कधी असं वाटतं का की आपण कितीही मेहनत केली तरी गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत? आपण मनातून जे वाटतं, तेच सगळं आपल्या आयुष्यात घडत असतं, हे खरं खूप उशिरा उमगतं. Rhonda Byrne ह्या लेखिकेचं The Secret हे पुस्तक याच विचारांचं एक सोपं नि खोल जाणीव देणारं पुस्तक आहे. यामध्ये ‘Law of Attraction’ – म्हणजेच आपण जसं विचार करतो, तशा गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात या संकल्पनेवर खूप सहज नि मनापासून लिहिलं आहे. आपण जर सतत नकारात्मक विचार करत राहिलो ‘माझं काही होणार नाही, मी Failure आहे,’सगळं अवघड आहे वगैरे, तर जग सुद्धा आपल्याला तसंच वागवतं. पण जर आपण मनातून म्हणालो मी यशस्वी होणार, माझं स्वप्न पूर्ण होणार, चांगल्या गोष्टी माझ्या वाट्याला येणारच तर विश्वसुद्धा तसंच घडवून आणायला लागतं.
मी हे पुस्तक लॉकडाऊन काळात मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत वाचलं होतं. खूप प्रश्न होते, भीती होती, पुढचं काहीच स्पष्ट नव्हतं. पण हे पुस्तक वाचताना असा एक शांत विश्वास निर्माण झाला की, आपण जे रोज मनात ठेवतो तेच हळूहळू आपल्या आयुष्यात उमटतं. यात काही जादू नाही, पण विचारांची ताकद आहे. पुस्तकात खूप साध्या उदाहरणांनी हे दाखवून दिलंय की आपली मने, आपले शब्द, आपली भावना हे सगळं एका प्रकारे विश्वाशी संवाद करत असतं. नि हे संवाद जितके Positive, तितकं आपलं आयुष्य सुंदर.
हे पुस्तक मला रोज Thanks म्हणायला शिकवतं नि ज्या गोष्टी अजून मिळालेल्याच नाहीत, त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार मानायला शिकवतं. खूप हळूहळू जणू काही जादूसारख्या त्या गोष्टी आयुष्यात यायला लागतात. हे एखादं मोटिवेशनल पुस्तक नाहीये तर ते विचारांची दिशा बदलणारं पुस्तक आहे. आजूबाजूला जेव्हा सगळीकडे फक्त स्पर्धा, चिंता नि भीती पेरली जाते तेव्हा हे पुस्तक खूप शांत नि प्रेरणा देणार वाटतं.
हे वाचताना आपल्याला आपलंच मन नवीन वाटायला लागतं. आपण रोज किती नकारात्मक बोलतो, नकळत किती वाईट गोष्टींची भीती बाळगतो, याची जाणीव होते. नि मग आपणच आपल्याला म्हणायला लागतो की आपलं भविष्य आपल्या हातात आहे.💙🍀
©Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा