उसवण…🦋❤️



‘उसवण’ ही देवीदास सौदागर यांची लहानशी पण फार मोठं काही सांगून जाणारी कादंबरी. मी ती प्रकाशित होताच वाचली होती नि त्यानंतर जेव्हा या कादंबरीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा एकदा पुन्हा वाचली होती,पण वेळेअभावी तेव्हा याबद्दल माझा अनुभव लिहू शकलो नसल्याने आज लिहितोय जेणेकरून अजूनपर्यंत ज्यांनी वाचली नसेल ते ते वाचतील .

जेव्हा मी ही 116 पेजेस असलेली कादंबरी वाचली तेव्हा सुरुवातीला वाटलं, साधीशी कहाणी असेल गावातल्या एका शिंपीची पण जसजसं पुढे जात गेलो, तसतसं हे पुस्तक माझ्या मनात खोल रुतत गेलं. विठू शिंपी नि त्याच्या छोट्याशा कुटुंबाची ही गोष्ट पण ही गोष्ट फक्त त्यांच्या घरापुरती राहात नाही तर ती आपल्याला संपूर्ण समाजाचं वास्तव दाखवून जाते.

विठू हा एक साधा कष्टकरी गावात बसून गिऱ्हाईकाच्या अंगात फिटणारे कपडे शिवणारा माणूस. त्याचा व्यवसाय म्हणजे त्याचं जगणं. पण जसजसं रेडिमेड कपड्यांचं प्रमाण वाढत जातं तसतसं त्याचं काम कमी होत जातं. अन् इथून सुरू होते ‘उसवण’ म्हणजे आयुष्याची शिवलेली गोधडी तुटायला लागते.

विठूची बायको गंगा, मुलगी नंदा नि मुलगा सुभाष हेही त्याच्याबरोबर या संघर्षात आहेत. गंगाचं पात्र खूप भावून जातं. ती कधीच तक्रार करत नाही, नवऱ्यावर विश्वास ठेवते नि मुलांच्या भविष्यासाठी तीसुद्धा तडजोड करत राहते.तिला बघुन आपल्याला आपली आई आठवते .विठूच्या मनात जो अपराधगंड आहे, तो एका पित्याचा नि पतीचा की मी पुरेसं कमावू शकत नाही हे खूप खोल जातं.

गावातलं बदलतं वातावरण, राजकारण, नवे-पुराणे संघर्ष, जातीनुसार होणारी उलथापालथ या सगळ्याचा परिणाम एका सामान्य शिंपीवर कसा होतो हे फार ताकदीने दाखवलंय. कधी कधी वाटतं, विठूचं घर म्हणजे एक लहानसं आपला भारत आहे.या पुस्तकाचं सर्वात मोठं यश माझ्यामते याने माझ्यासारख्या वाचकाला थांबून विचार करायला भाग पाडलं. आपण काहीतरी मोठं गमावतोय गावपण, मनमिळावूपणा, एकत्र येऊन जगण्याची वृत्ती इत्यादी.

‘उसवण’ वाचताना अनेकदा मी फार शांत झालो, मनात विचारांचं वादळ उठलं. आपण आपल्या घरातील किंवा गावातील अशा अनेक ‘विठू’सारख्या माणसांकडे कधी लक्षच दिलं नाही. त्यांच्या जिवनातले बदल, आर्थिक अडचणी नि जगण्यातली तगमग हे सगळं आपण विसरत गेलो.

मुळात ही फक्त एका शिंपीची कहाणी नाही तर ही प्रत्येक खेड्यातल्या, छोट्या व्यवसाय करणाऱ्या माणसाची खरी कहाणी आहे. जागतिकीकरण, बाजारपेठेचं बुड नि ग्रामीण भारताचं विस्कटत चाललेलं वास्तव हे सगळं ‘उसवण’ आपल्याला शांतपणे सांगून जातं. शेवटी एवढचं की विठूच्या रूपानं लेखकाने आपल्याला खूप काही शिकवून दिलं आहे की टिकून राहायचं, प्रयत्न करायचे, नातं जपायचं नि  ‘पुन्हा एकदा शिवणं’ सुरू ठेवायचं.

जसं विठू उसवलेलं कपडं शिवतो, तसंच आपणही आयुष्यात काही गोष्टी पुन्हा शिवायला शिकावं हेच या पुस्तकाचं खरं सौंदर्य आहे नि यातून मला हेच शिकायला मिळाल.❤️🌱

नक्की आवर्जून वाचा …💝

©️Moin Humanist 🌱

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼