द अलकेमिस्ट...🌼❤️
कधीतरी द अलकेमिस्ट दुसऱ्यांदा वाचलं नि खरंच सांगतो, हा अनुभव पहिल्यापेक्षा कितीतरी गहिरा नि प्रेरक होता माझ्यासाठी. 1988 मध्ये पोर्तुगीजमध्ये ‘O Alquimista’ नावाने प्रकाशित झालेलं हे पुस्तक 80 पेक्षा जास्त भाषांत अनुवादित झालंय नि जगभरात याच्या 65 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत.
हे पुस्तक वाचताना आपण सँटियागोच्या साहसी प्रवासात हरवून जातो. ही कथा स्वप्नांचा पाठलाग, आत्मशोध नि विश्वाशी जोडणारी आहे. वाचताना मला वाटलं, मी सँटियागोसोबत स्पेनच्या मेंढ्यांमागे, टँजिअरच्या बाजारात नि इजिप्तच्या वाळवंटात भटकतोय, त्याच्या स्वप्नांचा खजिना शोधतोय.
द अलकेमिस्ट ही सँटियागो नावाच्या स्पेनमधल्या मेंढपाळ तरुणाची कहाणी आहे. त्याला भटकंती नि फार स्वातंत्र्याची आवड आहे, म्हणूनच तो मेंढपाळ बनतो, जरी त्याचे आई-वडील त्याला धर्मगुरू बनवू इच्छित होते. त्याला दोनदा स्वप्न पडतं, ज्यात एक मूल त्याला इजिप्तच्या पिरॅमिड्सजवळ खजिना दाखवतं. एका जिप्सी बाईकडून स्वप्नाचा अर्थ समजतो नि मेल्किझेदेक नावाचा गूढ राजा त्याला ‘पर्सनल लेजेंड’ साध्य करण्यासाठी प्रेरणा देतो, तसंच दोन जादुई दगड देतो उरिम नि थुम्मिम.
सँटियागो आपली मेंढं विकतो नि इजिप्तला निघतो. या प्रवासात त्याची टँजिअरमध्ये फसवणूक होते, तो क्रिस्टल व्यापाऱ्यासोबत काम करतो, वाळवंटात काफिल्यासोबत प्रवास करतो, फातिमा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो अन् एका अलकेमिस्टला भेटतो, जो त्याला ‘सोल ऑफ द वर्ल्ड’ समजावतो.
सँटियागोचा प्रवास फक्त खजिन्याचा नाही, तर स्वतःच्या हृदयाचा नि विश्वाशी नात्याचा शोध आहे. प्रत्येक पात्र त्याला काहीतरी शिकवतं क्रिस्टल व्यापारी मेहनतीचं महत्त्व सांगतो, फातिमा प्रेमाचा त्याग शिकवते, तर अलकेमिस्ट विश्वाच्या संकेतांवर (ओमन्स) विश्वास ठेवायला लावतो. फातिमाचा “प्रेमाला कारण लागत नाही” हा संवाद माझ्या काळजाला भिडला. तिचं वाळवंटातलं प्रेम नि सँटियागोच्या स्वप्नांना दिलेली साथ खूप प्रेरक आहे. “एका निर्णयाने अनेक निर्णयांची सुरुवात होते,” हा विचार मला खूप आवडलं. एक धाडस तुम्हाला अनपेक्षित ठिकाणी घेऊन जातं.
लेखकाची लेखनशैली साधी पण जादुई आहे नि या पुस्तकाचा अनुवाद सुद्धा तेवढाच छान झाला आहे. भारतीय तत्त्वज्ञान, बायबल नि अलकेमी यांचा मेळ घालून त्यांनी ही कथा विणली. अलकेमी म्हणजे आत्म्याचं शुद्धीकरण, हे मला खूप आवडलं. सँटियागोचं जाडजूड पुस्तकाचं वेड “जाडजुड पुस्तकं वाचायला नज उशाला लावायला बरी असतात” हा किस्सा मला हसवून गेला, कारण मीही असाच वाचनवेडा आहे हे वेगळं सांगायला नको.
‘ओमन्स’ची संकल्पना मला खूपच प्रेरक वाटली . आयुष्यात येणारे संकेत ओळखले, तर मार्ग सापडतो. फातिमाचं पात्र थोडं मर्यादित वाटतं, पण मला ती सँटियागोच्या प्रवासाला पूरक वाटली.
द अलकेमिस्टने मला माझ्या स्वप्नांकडे नव्या उत्साहाने पाहायला शिकवलं. सँटियागोप्रमाणे आपलाही खजिना हृदयात आहे, फक्त धैर्य नि विश्वास हवा. स्वप्नं सोडायची नाहीत, अडचणींना लढत पुढे जायचं बस्स एवढंच....
शेवटी माझा आवडता प्रसंग नि यातील एक संवाद खाली देतोय :-
सँन्तियागो प्रेयसी फातिमाला : मी मोहिमेवर निघालोय.मी नक्कीच परतणार आहे हे सांगण्यासाठीच मी आलोय.मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..
कारण…
फातिमा :- 'काहीही बोलू नकोस.प्रेम करण्यासाठी कुठलही कारण लागत नाही.आपण एकमेकांवर प्रेम करतो.कारण आपलं एकेमेकांवर प्रेम आहे.
वाळवंट आमच्यापासूनसुध्दा आमचे पुरुष दूरदूर नेतं.ते नेहमीच परत येतात असे नाही.आम्हाला हे माहीत आहे.आम्हाला आता त्याची सवय झाली आहे.जे कधीच परतत नाहीत ते ढगांचा भाग बनतात.द-याखो-यांमध्ये,घळ्यांमध्ये राहणा-या प्राण्यांचा भाग बनतात.जमिनीखालून येणा-या पाण्याचा भाग बनतात.ते प्रत्येक गोष्टीचा भाग बनतात.ते विश्वाचा आत्माच बनतात.
मी वाळवंटातली स्त्री आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.वाळूच्या ढिगा-यांचे आकार बदलवणारा वारा जसा मुक्त वाहतो तसंच माझ्याही नव-यानं सगळीकडं मुक्त संचार करावा आणि जर कधी वेळ आलीच तर तो ढगांचा,द-याखो-यांमधल्या प्राण्यांचा आणि वाळवंटातल्या पाण्याचा भाग बनलेलं मी स्वीकारीन..❤️💜
नक्की नक्की वाचा....🌼❤️
©️ Moin Humanist ❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा