ययाती....💖

काही महिन्यांपूर्वी म्हणजेच कॉलेज जाण्यापूर्वी वि. स. खांडेकर सरांची हि बहुचर्चित कादंबरी प्रथमच फक्त वाचली नव्हती तर अनुभवली सुध्दा होती.तेव्हापासुन मला याबद्दल माझा अनूभव लिहायचं होतं नि तो आज पुर्ण करतोय .

तर ययाती मला हि कथा फक्त एका राजाची नाही तर आपल्यासारख्या प्रत्येक माणसाच्या मनातल्या इच्छा, मोह नि पश्चातापाची वाटली . या कादंबरीत ययाती नावाच्या राजाचं आयुष्य, त्याच्या आयुष्यात आलेल्या दोन स्त्रिया म्हणजेच देवयानी व शर्मिष्ठा, त्यांचे नाते नि त्यातून निर्माण झालेले संघर्ष खूप सुंदरपणे मांडले आहेत. देवयानी ही अहंकारी नि महत्वाकांक्षी तर शर्मिष्ठा ही त्याग करणारी नि प्रेमळ असते . या दोन वेगळ्या स्वभावाच्या स्त्रियांमुळे ययातीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते नि आपल्याला या कादंबरीतुन वाचायला मिळते .

कथेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणंजे ययाती राजाला मिळालेला वृद्धत्वाचा शाप. शर्मिष्ठेसोबतचे संबंध उघड झाल्यावर देवयानीचे वडिल म्हणजेच शुक्राचार्य ययातीला म्हातारपणाचा शाप देतात.पण अचानक म्हातारा झाल्यावरही ययातीच्या मनातल्या इच्छा काही संपत नाहीत. तो आपल्या मुलांना विनंती करतो की, त्यातील कुणी एक आपलं तारुण्य त्याला द्यावं. शेवटी त्याचा धाकटा मुलगा पुरु आपलं तारुण्य वडिलांना देतो. ययाती पुन्हा तरुण होतो नि अनेक वर्षे भोगात रमतो. पण शेवटी त्याला जाणवतं की, कितीही भोग मिळाले, तरी मन कधीच तृप्त होत नाही. इच्छांची तळ कधीच लागत नाही नि विषयभोगातून समाधान मिळत नाही. अखेरीस, तो वैराग्य स्वीकारतो नि राज्य पुन्हा पुरुला देतो.

या कादंबरीतल्या प्रत्येक पात्राचं मनोविश्लेषण खूप छान केलं आहे. देवयानीचा अहंकार, शर्मिष्ठेचा त्याग, संयम नि ययातीचा भोगवाद हे सगळं वाचताना असं वाटतं की, हे आपल्या आजूबाजूच्या लोकांसारखेच आहेत. त्यांच्या भावना, निर्णय, चुक नि पश्चाताप हे सगळं खूप जवळचं वाटतं. खांडेकर सरांची भाषा मला फार आवडली. त्यांनी कथा अगदी सोप्या नि परिणामकारक भाषेत मांडली आहे. त्यामुळे मोठ्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टीही सहज समजतात.

ययाती वाचताना मला जाणवलं की, माणूस कितीही मोठा असो, त्याच्या मनातल्या इच्छा कधीच संपत नाहीत. आपण सगळेच कधी ना कधी भोग, मोह नि इच्छांच्या मागे धावत असतो. पण शेवटी समाधान हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही तर आपल्या मनातच आहे.नाही का  ? अन् हेच या कादंबरीतून शिकायला मिळतं.या कथेतील संघर्ष, नाती नि शेवटी मिळणारा वैराग्याचा संदेश हे सगळं आजच्या काळातही तितकंच लागू पडतं असं मला वाटतं.

ही कादंबरी वाचताना मी अनेकदा स्वतःच्या आयुष्यातल्या गोष्टींचा विचार करू लागलो होतो. कारण आपल्या मनातल्या इच्छा, आपल्या चुक नि आपल्याला मिळणाऱ्या शिकवणी  हे सगळं ‘ययाती’मधून समजायला मदत होते. 

कोणी काहीही म्हणा पण ही फक्त एक पौराणिक कथा नाही तर ती आपल्या सर्वांच्या मनाचा एक आरसा आहे. खांडेकर सरांनी या कादंबरीतून दाखवलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे की भोग, इच्छा नि मोह यांना मर्यादा नाही नि खरा आनंद आत्मशोधात, त्यागात नि मुळात वैराग्यात आहे.

एवढंच...🌸

©️Moin Humanist 😇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼