वाचनाची भूक तळागाळापर्यंत पोहोचवायची आहे...🌼❤️

समाजात वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. कुणी आरोग्यासाठी काम करतं, कुणी शिक्षणासाठी, कुणी पर्यावरणासाठी, कुणी महिला, बालकं, ग्रामीण समुदाय किंवा वंचित घटकांसाठी. या सगळ्या कामाची समाजाला गरज आहे. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मला सतत जाणवते, ती म्हणजे वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी, वाचनाची सवय रुजवण्यासाठी अन् पुस्तकं तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून खूप मोठ्या प्रमाणावर काम होण्याची गरज आहे. पुस्तक हातात देणं ही एक गोष्ट आहे, पण त्या पुस्तकाकडे ओढ निर्माण करणं, वाचण्यासाठी वेळ अन् जागा निर्माण करणं, वाचलेल्या गोष्टीवर विचार करायला शिकवणं अन् त्या विचाराला आपल्या जगण्याशी जोडणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे. विशेषतः ग्रामीण भागात, आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांमध्ये किंवा जिथं घरात पुस्तकांचं वातावरणच नाही, तिथं एका पुस्तकाची किंमत फक्त त्याच्या छापील किमतीपुरती राहत नाही. ते पुस्तक एखाद्या मुलासाठी जगाकडे पाहण्याची पहिली खिडकी ठरू शकतं.

याच जाणिवेतून We Read च्या माध्यमातून आपण 2020 पासून वाचनाशी संबंधित विविध उपक्रम करत आलो आहोत. पुस्तकांबद्दल लिहिणं, पुस्तकांची ओळख करून देणं, वाचकांपर्यंत पुस्तकं पोहोचवणं, वाचनाचे उपक्रम घेणं, स्पर्धा आयोजित करणं, चर्चासत्रं घेणं, मुलांसाठी वाचनाची जागा निर्माण करणं, Study Bunker सारख्या उपक्रमातून ग्रामीण मुलांना पुस्तकं अन् अभ्यासासाठी वातावरण उपलब्ध करून देणं, अशा अनेक छोट्या-मोठ्या प्रयत्नांतून हा प्रवास पुढे आला. या प्रवासाला आता We Read Foundation च्या माध्यमातून अधिक संघटित स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. Foundation चं काम फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित राहणार नाही. शिक्षण अन् पर्यावरण या व्यापक क्षेत्रांमध्ये तळागाळातील समुदायांसोबत काम करण्याची आमची दिशा आहे.

आपल्याला मोठमोठे आकडे उभे करायचे नाहीत. किती कार्यक्रम झाले, किती लोक आले, किती पोस्ट झाल्या, किती फोटो झाले, यापेक्षा किती लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदलाची सुरुवात झाली, हा प्रश्न आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा असेल. म्हणूनच आम्ही quantity पेक्षा quality वर भर देऊ इच्छितो. आपल्याकडे ज्या वेळी जितकी साधनं असतील, जितका access मिळेल, जितका निधी उपलब्ध होईल, जितकी माणसं सोबत येतील, तितकं काम वाढवत नेऊ. पण साधनं कमी आहेत म्हणून थांबायचं नाही अन् साधनं मिळाली म्हणून फक्त संख्या वाढवायचीही नाही. जिथं गरज सर्वाधिक आहे, तिथं गुणवत्तापूर्ण काम पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे.

माझ्या दृष्टीने शिक्षण म्हणजे फक्त शाळेत जाणं किंवा परीक्षा पास होणं नाही. शिक्षण म्हणजे स्वतःला समजून घेणं, प्रश्न विचारणं, माहिती शोधणं, योग्य-अयोग्याचा विचार करणं, दुसऱ्याचं दुःख समजून घेणं अन् आपल्या आजूबाजूच्या जगाशी जबाबदारीने जोडले जाणं. त्यासाठी वाचनाची भूमिका खूप मोठी आहे. एखादं पुस्तक एखाद्या मुलाला नवीन शब्द शिकवेल, दुसरं पुस्तक त्याला इतिहास समजावेल, तिसरं पुस्तक त्याला स्वतःच्या आयुष्यापलीकडचं जग दाखवेल, तर एखादं पुस्तक त्याला एखाद्या अनोळखी माणसाच्या दुःखाशी जोडेल. म्हणूनच वाचन ही फक्त शैक्षणिक सवय नाही, ती माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे.

आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचायचं आहे. जिथं अजून चांगली पुस्तकं सहज उपलब्ध नाहीत, तिथं पुस्तकं पोहोचवायची आहेत. जिथं मुलांना शिक्षणाच्या संधींबद्दल माहिती नाही, तिथं माहिती पोहोचवायची आहे. जिथं वाचनासाठी जागा नाही, तिथं जागा निर्माण करायची आहे. जिथं मुलांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव नाही, तिथं त्यांना शिकण्याची संधी द्यायची आहे. अन् हे सगळं करताना त्यांच्यावर काही लादायचं नाही, तर त्यांचं ऐकायचं, त्यांच्या गरजा समजून घ्यायच्या अन् त्यांच्यासोबत काम करायचं आहे.

पण हा प्रवास एका संस्थेने एकट्याने पूर्ण होणार नाही. यासाठी समाजाची साथ लागेल. कुणी पुस्तक देईल, कुणी आपला वेळ देईल, कुणी एखाद्या मुलाला वाचायला पुस्तक सुचवेल, कुणी एखाद्या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होईल, कुणी आपलं कौशल्य देईल, तर कुणी आर्थिक मदत करेल. प्रत्येक प्रकारचं सहकार्य महत्त्वाचं आहे. कारण वाचन संस्कृती ही एका दिवसात किंवा एका संस्थेच्या प्रयत्नातून निर्माण होत नाही. ती घरातून, शाळेतून, गावातून, मित्रांच्या गटातून अन् समाजाच्या सामूहिक प्रयत्नातून तयार होते.

आणि शेवटी एक गोष्ट मला सर्वांत महत्त्वाची वाटते. फक्त पुस्तकं वाचणं पुरेसं नाही. त्या पुस्तकांनी आपल्यात काहीतरी बदललं पाहिजे. एखादं पुस्तक समतेबद्दल सांगत असेल, तर आपल्या वागण्यात समता दिसली पाहिजे. एखादं पुस्तक माणुसकी शिकवत असेल, तर आपल्या व्यवहारात माणुसकी दिसली पाहिजे. एखादं पुस्तक अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारायला शिकवत असेल, तर आपण प्रश्न विचारण्याचं धैर्य ठेवायला हवं. वाचनाचा शेवट पुस्तक बंद करण्यावर होता कामा नये. तो आपल्या विचारांमध्ये, कृतीमध्ये अन् माणसांशी असलेल्या नात्यामध्ये दिसला पाहिजे.

We Read Foundation च्या माध्यमातून आपल्याला हाच छोटासा पण दीर्घ प्रवास सुरू ठेवायचा आहे. साधनं वाढतील तसं काम वाढवायचं, संधी मिळतील तिथं तळागाळापर्यंत पोहोचायचं, चुका होतील तिथं शिकायचं अन् जे काही करायचं ते शक्य तितकं प्रामाणिकपणे करायचं.

कारण आमच्यासाठी अंतिम ध्येय फक्त वाचक वाढवणं नाही.

वाचनातून विचार जागा व्हावा, विचारातून शिक्षणाची दारं उघडावीत, शिक्षणातून संधी निर्माण व्हाव्यात अन् या सगळ्यातून अधिक संवेदनशील, विवेकी अन् माणुसकी जपणारा समाज घडावा, हीच आमची इच्छा आहे.

हे एकटे हे करू शकत नाही.

तुमची साथ, तुमचा विश्वास अन् तुमचं सहकार्य या प्रवासासाठी तितकंच महत्त्वाचं आहे.🌼

©️Moin Humanist 🌼

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

हमारी अधुरी कहाणी - 1 🌼

Moin's 400 पुस्तकांची यादी पार्ट -1 ♥️🌼