वाचन प्रवास....🌼❤️
माझ्या आयुष्याचा खरा अभ्यासाचा प्रवास हा 7 वीच्या दुसऱ्या सत्रापासून सुरू झाला. त्याआधीपर्यंत माझं आयुष्य खरं सांगायचं तर काळोखात हरवल्यासारखं होतं. शाळेचं नाव जरी काढलं तरी माझ्या अंगावर काटा यायचा. अभ्यास करणं, पुस्तक वाचणं हा तर अगदी लांबचा विषय होता. पाचवीपासून जवळपास अडीच वर्षं मी अक्षरशः न्यूनगंडात अडकलो होतो. त्या काळात मी फक्त वेळ वाया घालवला जुगार खेळणं, गावच्या नदीवर किंवा शेतात दिवसभर बसणं, निरर्थक फिरणं. माझ्या आयुष्याची गाडी अक्षरशः रुळावरून घसरलेलीच होती.
पण प्रत्येकाच्या आयुष्यात जसा एखादा लाईफ-चेंजिंग प्रसंग येतो तसाच माझ्याही आयुष्यात आला. तो म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत मी जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट माझं आयुष्य बदलून गेला. त्या आधीपर्यंत माझ्या गावात, समाजात ऐकून माझ्या मनात बाबासाहेब म्हणजे फक्त बुद्ध धर्माचे नेते, “जय भीम” म्हणणाऱ्यांपुरते मर्यादित व्यक्ती असं एक गैरसमजाचं चित्र होतं. पण जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा पहिल्यांदा मला बाबासाहेबांचं खरं अफाट व्यक्तिमत्त्व दिसलं.
त्यांचा संघर्ष, त्यांचं कष्टाळू आयुष्य नि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा अभ्यास नि वाचनावरील प्रचंड प्रेम बघून मी अक्षरशः भारावलो. मनाशी ठरवलं की आता बाबासाहेबांसारखं वाचन करायचं, रोज शाळेत जायचं, अभ्यास करून उच्चशिक्षित व्हायचं अन् आपल्या समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायचं. त्या दिवशीपासून माझ्या आयुष्याची घसरलेली गाडी पुन्हा पटरीवर यायला लागली.
सुरुवातीला मी शाळेचीच पुस्तकं वाचायचो, धडे नीट वाचायचो, कविता पाठ करायचो. पण बाबासाहेबांविषयी अजून माहिती मिळते का याची शोधयात्रा सुरू झाली. शालेय पुस्तकात थोडंफार होतं पण मला समाधान मिळालं नाही. एकदा रविवारी पालकांसोबत मेहकरला दवाखान्यात गेलो असताना बसस्थानकाजवळ रस्त्यावर पुस्तकं मांडलेली दिसली. माझ्या मनातलं कुतूहल तिथे मला खेचून घेऊन गेलं. मी थेट त्यांना विचारलं –“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीचं पुस्तक आहे का?” त्यांनी लगेच 10 रुपयांचं छोटं पुस्तक काढून माझ्या हातात दिलं.
ते पुस्तक माझ्या आयुष्यातील पहिलं खरं पुस्तक होतं. वडिलांनी मला ते विकत घेतलं नि मी जणू खजिनाच मिळाल्यासारखा आनंदी झालो. घरी आल्यावर ते पुस्तक सपाटून वाचून संपवलं. खरं सांगायचं तर मला वाटलं होतं की आता बाबासाहेबांविषयी सगळं समजेल. पण झालं उलटं त्यांच्याविषयीचं कुतूहल अजून प्रचंड वाढलं. कारण बाबासाहेब हे एका पुस्तकातून समजणारे व्यक्ती नव्हतेच.
इथून माझ्या वाचनप्रवासाला खरी सुरुवात झाली. शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, मौलाना आझाद, भगतसिंह, सुभाषचंद्र बोस असे अनेक महामानव मला पुस्तकांतून भेटले. शाळेच्या छोट्या गोष्टींच्या पुस्तकांपासून ते मोठ्या चरित्रपर ग्रंथांपर्यंत मी सगळं वाचायला लागलो.
8 वीमध्ये मी पहिल्यांदा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं “अग्निपंख” हे 150 रुपयांचं पुस्तक खरेदी केलं. ते महाग पुस्तक विकत घेऊन फक्त दोन दिवसांत वाचून संपवलं. त्यानंतर तर पुस्तकं माझ्या आयुष्याचा श्वासच झाली. 12 वीमध्ये सिंधखेडराजा, चैत्यभूमी, यवतमाळ साहित्य संमेलन अशा ठिकाणांवरून मी खूप पुस्तकं घेतली. पुस्तकं माझे खरे मित्र बनले, माझ्या प्रत्येक दुःख-सुखात सोबत राहणारे साथीदार झाले.
Graduation संपल्यावर Lockdown आला नि त्याच काळात माझ्या मनातला एक छोटा विचार वास्तवात उतरला Study Bunker. वाचनाची आवड मी एकट्यापुरती न ठेवता ती इतरांपर्यंत पोहोचवावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला. मित्रमंडळींना एकत्र आणून पुस्तकं, लेख, विचार शेअर करण्याचं एक छोटेसे व्यासपीठ तयार झालं.
याच प्रवासातून माझ्या मनात आणखी एक स्वप्न आकाराला आलं We Read वाचन हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, समाजात सकारात्मकता निर्माण करणं नि एक वाचक म्हणून तयार झालेलं माझं अनुभवविश्व इतरांशी शेअर करणं या सगळ्यांचा संगम म्हणजे We Read. आज या माध्यमातून शेकडो वाचक जोडले जात आहेत नि पूढे जाणार आहेत .
आज माझ्याकडे एक छोटंसं पण अभिमानास्पद ग्रंथालय आहे. शेकडो पुस्तकं आहेत पण त्याहून मोठं म्हणजे त्यातून मिळालेली नवी ओळख, विचारांची ताकद नि जगण्याची दिशा आहे.
माझ्यासाठी डॉ. बाबासाहेब म्हणजे आदर्श, पुस्तकं म्हणजे श्वास नि We Read म्हणजे माझा समाजाशी जोडलेला प्रवास.
हाच प्रवास मला आज Kautilya School of Public Policy (KSPP), Hyderabad पर्यंत घेऊन आला . इथे Public Policy च्या अभ्यासाने वाचनाची खोली नि नवी दृष्टी मिळाली. पुस्तकांनी दिलेलं बळ, बाबासाहेबांचा दिलेला आदर्श नि शिक्षणाने दिलेला आत्मविश्वास यामुळे आज मी धोरणनिर्मितीच्या क्षेत्रात उभा आहे.🌱💖
जयभीम ❤️
©️ Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा