भारतीय संविधान नेमकं कसं वाचावं? 🇮🇳📖
अनेकदा अनेक लोकांच्या हातात भारतीय संविधानाची प्रत दिसते. ते पाहून आपल्यालाही वाटतं की आपण संविधान घ्यावं आणि वाचायला सुरुवात करावी. पण काही पाने वाचल्यानंतर प्रश्न पडतो, नेमकं काय वाचतोय? हे कसं समजून घ्यायचं? कारण संविधान हे कादंबरी, चरित्र किंवा सामान्य माहितीचं पुस्तक नाही. संविधानात भारताचा देश कसा चालतो, नागरिकांना कोणते अधिकार आहेत, सरकारने काय करावं, सरकारच्या अधिकारांना कोणत्या मर्यादा आहेत, न्यायालयाचं काम काय आहे, केंद्र नि राज्य यांचे संबंध कसे आहेत आणि आपल्या लोकशाहीची मूलभूत मूल्यं कोणती आहेत, हे सांगितलं आहे. त्यामुळे संविधान समजून घेण्यासाठी ते फक्त पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचण्यापेक्षा त्याची रचना, त्यामागचा विचार आणि वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. 🌸
संविधान वाचताना सुरुवात प्रस्तावनेपासून म्हणजे Preamble पासून करावी. पण प्रस्तावना फक्त पाठ करण्यासाठी वाचू नये. We, the People of India म्हणजे आम्ही भारताचे लोक या पहिल्याच शब्दांपासून विचार करायला सुरुवात करावी. संविधानाची ताकद कुठून आली? आम्ही भारताचे लोक असं का म्हटलं आहे? भारताला Sovereign, Socialist, Secular, Democratic Republic का म्हटलं आहे? Justice, Liberty, Equality आणि Fraternity म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही चार मूल्यं एकत्र का ठेवली आहेत? आपल्या रोजच्या आयुष्यात न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता आपल्याला कुठे दिसते? असे प्रश्न विचारत प्रस्तावना वाचली, तर संपूर्ण संविधान समजून घेण्यासाठी आपल्याला एक दिशा मिळते.
त्यानंतर संविधानातील Fundamental Rights म्हणजे मूलभूत अधिकार वाचावेत. पण फक्त Article चे नंबर आणि त्यांची नावं पाठ करू नयेत. उदाहरणार्थ, Article 14 म्हणजे समानतेचा अधिकार एवढंच लक्षात ठेवणं पुरेसं नाही. समानता म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक वेळी अगदी सारखंच वागणं का? मग समाजात अनेक वर्षे मागे राहिलेल्या लोकांसाठी विशेष सुविधा किंवा आरक्षण का दिलं जातं? सरकार दोन वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये फरक करू शकतं का? असे प्रश्न विचारले की Article 14 समजायला सुरुवात होते. Article 19 वाचताना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला काहीही बोलता येतं का? त्यावर काही मर्यादा का आहेत? हे पाहावं. Article 21 वाचताना जीवन म्हणजे फक्त जिवंत असणं आहे का? की चांगलं, सुरक्षित आणि सन्मानाने जगणंही त्यात येतं? असे प्रश्न स्वतःला विचारावेत. म्हणजे संविधान वाचताना शब्द वाचा, त्यामागचा प्रश्न समजा आणि तो आपल्या आयुष्याशी जोडा.
संविधान समजून घेताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक Article वेगळा वाचू नका. संविधानातील अनेक गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एखादा अधिकार वाचताना त्याची मर्यादा काय आहे, तो दुसऱ्या अधिकाराशी कसा जोडला आहे, सरकारच्या शक्तीचा त्याच्यावर काय परिणाम होतो आणि न्यायालय अशा परिस्थितीकडे कसं पाहतं, हेही पाहावं लागतं. म्हणून फक्त Article 14 म्हणजे हे, Article 19 म्हणजे हे, Article 21 म्हणजे हे असं पाठ केलं, तर आपल्याला माहिती मिळेल; पण संविधानाची खरी समज तयार होणार नाही.
संविधान समजण्यासाठी Articles मधला संबंध समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संविधानात प्रत्यक्ष काय लिहिलं आहे आणि न्यायालयाने त्याचा अर्थ कसा सांगितला आहे, हेही वेगळं समजून घ्यायला हवं. संविधानात एखाद्या अधिकाराबद्दल काय लिहिलं आहे हा एक प्रश्न आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने त्या शब्दांचा अर्थ कसा लावला आणि काळानुसार तो अर्थ कसा बदलत गेला हा दुसरा प्रश्न आहे.
उदाहरणार्थ, Article 21 चा आज आपण जो मोठा अर्थ समजतो, तो फक्त Article मधले शब्द वाचून समजत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये काय निर्णय दिले, हे पाहावं लागतं. त्यामुळे संविधान वाचताना एखादी गोष्ट समजत नसेल, तर त्या विषयावरचा महत्त्वाचा Supreme Court judgment शोधणं हा संविधानाच्या अभ्यासाचाच एक भाग आहे.
त्याचप्रमाणे Constituent Assembly Debates म्हणजे संविधान तयार होत असताना झालेल्या चर्चा वाचणंही खूप महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट संविधानात का आणली? त्यामागे कोणता प्रश्न होता? संविधान तयार करणाऱ्या लोकांमध्ये काय चर्चा झाली? कोणाचे वेगळे मत होते? एखाद्या शब्दाचा अर्थ काय असावा यावर काय बोललं गेलं? हे समजलं की संविधान आपल्याला फक्त तयार झालेलं पुस्तक वाटत नाही. त्यामागचा विचार आणि चर्चा आपल्याला दिसायला लागते. अर्थात, संविधानाचा अंतिम अर्थ फक्त त्या वेळच्या चर्चेवर ठरत नाही. पण त्या चर्चेमुळे संविधान तयार करणाऱ्या लोकांसमोर कोणते प्रश्न होते आणि त्यांनी कोणत्या विचारातून तरतुदी स्वीकारल्या, हे समजायला खूप मदत होते.
संविधान वाचताना फक्त Fundamental Rights वर थांबणं हीसुद्धा चूक आहे. Directive Principles of State Policy वाचले की सरकारने फक्त आपले अधिकार सुरक्षित ठेवावेत एवढंच संविधान सांगत नाही, तर देशात कशा प्रकारचा समाज आणि अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करावा, हेही संविधान सांगतं, हे समजतं. Fundamental Duties वाचताना नागरिकांची जबाबदारी काय आहे, याकडे लक्ष जातं. म्हणजे संविधान फक्त सरकारबद्दल नाही. ते नागरिक, सरकार, समाज आणि वेगवेगळ्या संस्थांमधील संबंधांबद्दलही सांगतं.
यानंतर Parliament, President, Prime Minister, Council of Ministers, Judiciary, State Government, Election Commission, CAG, Finance Commission, Centre-State Relations, Emergency आणि Amendment असे विषय वाचताना एक प्रश्न कायम मनात ठेवावा to तो म्हणजे हा की, शक्ती कोणाकडे आहे? ती शक्ती त्याला कुठून मिळते? त्या शक्तीवर कोणत्या मर्यादा आहेत? आणि त्या शक्तीला उत्तरदायी कोण बनवतं? हा प्रश्न विचारत संविधान वाचलं की सरकारी यंत्रणेची फक्त माहिती पाठ करण्याऐवजी भारतात सत्ता कशी वाटली आहे, सरकारच्या शक्तीवर नियंत्रण कसं ठेवलं आहे नि नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण कसं केलं जातं, हे समजू लागतं.
संविधानावरचं एखादं पुस्तक वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी. लेखकाने लिहिलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे संविधानाचा मजकूर नाही. पुस्तकात एका भागात संविधानातील तरतुदी असू शकतात, दुसऱ्या भागात न्यायालयाचे निर्णय असू शकतात आणि तिसऱ्या भागात लेखकाचं स्वतःचं मत असू शकतं. त्यामुळे पुस्तक वाचताना स्वतःला विचारावं—हे संविधानात प्रत्यक्ष कुठे लिहिलं आहे? हा अर्थ न्यायालयाने दिला आहे का? की हा लेखकाचा स्वतःचा विचार आहे? ही सवय लागली की आपण फक्त पुस्तक वाचत नाही, तर खरी माहिती नि एखाद्याचं मत यामधला फरक ओळखायला शिकतो. 🙌🏻
अन् कदाचित संविधान वाचण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे त्याला आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडणं. भेदभाव दिसला तर Article 14 आठवा. बोलण्याच्या स्वातंत्र्यावर चर्चा झाली तर Article 19 कडे जा. एखाद्याला अटक झाली तर त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दलचे अधिकार समजून घ्या. धर्माच्या स्वातंत्र्याचा प्रश्न असेल तर त्यासंबंधीचे Articles वाचा. निवडणूक, आरक्षण, शिक्षण, भाषा, केंद्र-राज्य संबंध, संसद, न्यायालय किंवा सरकारच्या अधिकारांवर चर्चा होत असेल, तर त्या विषयाचा संविधानाशी काय संबंध आहे ते शोधा. अशा प्रकारे संविधान कपाटात ठेवलेलं पुस्तक राहत नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनतं.
शेवटी संविधान वाचताना मी किती Articles पूर्ण केले? हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही. त्यापेक्षा मी आज संविधानातील एखादी गोष्ट माझ्या स्वतःच्या शब्दांत समजावून सांगू शकतो का? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा वाचताना सगळं समजेलच असं नाही. काही शब्द पुन्हा वाचावे लागतील. काही Articles चा संदर्भ शोधावा लागेल. काही न्यायालयाचे निर्णय समजायला वेळ लागेल. हे अगदी सामान्य आहे. संविधानाचा अभ्यास एका दिवसात किंवा एका बैठकीत पूर्ण होणारी गोष्ट नाही. हळूहळू त्याची समज वाढत जाते.
म्हणून भारतीय संविधान वाचण्याची माझ्या मते सर्वात सोपी पद्धत अशी आहे.संविधान वाचा, प्रश्न विचारा, संदर्भ शोधा, न्यायालयाचे निर्णय पाहा, संविधान तयार होताना झालेल्या चर्चा समजून घ्या आणि मग हे सगळं आपल्या आजूबाजूच्या जीवनाशी जोडा.
कारण संविधान वाचणं म्हणजे फक्त Articles पाठ करणं नाही.संविधान वाचणं म्हणजे आपण कोणत्या प्रकारच्या लोकशाहीत जगतो, नागरिक म्हणून आपल्याला काय अधिकार मिळाले आहेत, सरकारकडे किती सत्ता आहे, त्या सत्तेवर कोणत्या मर्यादा आहेत आणि न्याय, स्वातंत्र्य, समानता नि बंधुता या मूल्यांना आपल्या समाजात खरं स्थान काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे.
एवढंच…. 🖤
©️ Moin Humanist 📚
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा