उद्योजकतेतील पहिले पाऊल…..❤️🌸
उद्योजकतेतील पहिले पाऊल…..❤️🌸
काही दिवसापूर्वी अखेर हे 175 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवलं नि वाचून संपवल्यावर मनात पहिल्यांदा जी जाणीव दाटून आली, ती म्हणजे उद्योजकता ही काही फक्त दुकान, फॅक्टरी, भांडवल किंवा मोठ्या बोर्डावर झळकणाऱ्या नावाची गोष्ट नाही. तर उद्योजकता ही आधी मनात जन्म घेते. माणसाच्या विचारांत, त्याच्या जिद्दीत, त्याच्या पाहण्यात नि त्याच्या जगण्याच्या रितीत ती आकाराला येते.
प्रशांत पवार यांनी लिहिलेलं हे पुस्तक नेमकं हीच गोष्ट सांगतं. म्हणूनच हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं की एखादा माणूस आपल्याशी गप्पा मारतोय, हात धरून चालवत आहे नि म्हणतोय की अरे, व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधी स्वतःला उभं कर. या पुस्तकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा दृष्टिकोन. तो दृष्टिकोन फक्त तांत्रिक नाही, फक्त आकड्यांचा नाही किंवा नफ्या-तोट्याचा नाही तर तो माणसाच्या जडणघडणीचा आहे.
उद्योजक व्हायचं म्हणजे आधी विचार करायला शिकायचं असतं संकटांना घाबरायचं नसतं , संधी ओळखायची असते नि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायचा असतो. अन् हे सगळं या पुस्तकात जागोजागी येतं. म्हणूनच हे पुस्तक वाचताना वाटत राहतं की लेखक एखादी व्यावसायिक योजना देतोय , पण त्याचवेळी तो माणसाचं मनही घडवत आहे.
या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदाहरण देऊन फार सोप्या भाषेत मार्गदर्शन केलेलं आहे. कारण महाराज पराक्रमी योद्धा सोबतच ते दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते होते, संघटनकौशल्य असलेले नेतृत्व होते अन् व्यापाऱ्यांच्या विश्वासावर उभी राहणारी व्यवस्था निर्माण करणारे शासनकर्ते होते. त्यांच्याकडे फक्त तलवारीची धार नव्हती, तर विचारांची स्वच्छता होती. त्यांनी व्यापाराला संरक्षण दिलं, लोकांचा विश्वास जपला नि प्रशासनाला शिस्त लावली. हे वाचताना असं जाणवतं की आजचा उद्योजकही अशाच गुणवत्तांचा धनी असायला हवा.
नुसतं पैसा कमावणं पुरेसं नाही तर विश्वास जपणं, व्यवस्था टिकवणं नि आपल्या कामातून इतरांचं जीवनही सुलभ करणं, हे खऱ्या उद्योजकाचं लक्षण आहे.
पुस्तकाची रचना देखील खूप विचारपूर्वक केलेली आहे. एकूण अठरा प्रकरणांमधून उद्योजकतेचा प्रवास टप्प्याटप्प्याने उलगडत जातो. स्वतःची मानसिक तयारी कशी करावी, योग्य व्यवसाय कसा निवडावा, कौशल्यं कशी घडवावीत, सरकारी योजना कशा वापराव्यात, बिझनेस प्लॅन कसा बनवावा, बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा, भांडवलाचं नियोजन कसं करावं, योग्य मार्गदर्शक कसे निवडावेत, टीम कशी उभी करावी, नेटवर्किंग कसं वाढवावं, वैयक्तिक ब्रँड कसा तयार करावा, हे सगळं फक्त सांगितलेलं नाही, तर समजेल अशा भाषेत, विविध उदाहरणांसह मांडलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना एखाद्या वर्गात बसल्यासारखं वाटत नाही तर उलट एखादा अनुभवी सहकारी आपल्याला विविध गोष्टी समजावतोय, असं वाटतं.
या पुस्तकात मला आणखी एक गोष्ट आवडली ती म्हणजेचं सिद्धांत नि व्यवहार यांचा समतोल. अनेक पुस्तकांत संकल्पना मोठ्या थाटात येतात, पण प्रत्यक्ष जमिनीवर त्या कशा उतरतात, हे कळत नाही. इथे मात्र बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहक समजून घेणं, योग्य भौगोलिक क्षेत्र निवडणं, ब्रँडची ओळख तयार करणं, स्पर्धेत स्वतःचं वेगळेपण टिकवणं, या गोष्टींना व्यावहारिक रूप दिलेलं आहे. त्यामुळे वाचताना आपण फक्त प्रेरित होत नाही, तर कृतीकडेही वळतो नि खरचं हे फार महत्त्वाचं आहे. कारण कोणत्याही पुस्तकाने फक्त स्वप्नं दाखवून थांबू नये तर त्याने स्वप्नांच्या दिशेने चालायची वाटही दाखवली पाहिजे. अन् हे काम हे पुस्तक चांगल्या प्रकारे करतं.
भाषा ही या पुस्तकाची आणखी एक बलस्थानी गोष्ट आहे. ती जड नाही, गुंतागुंतीची नाही, की वाचकाला घाबरवणारी नाही. ती सरळ, समजण्यास सोपी नि संवाद साधणारी आहे. त्यामुळे व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेला माणूसही हे पुस्तक आरामात वाचू शकतो. पण साधेपणा म्हणजे उथळपणा नाही, हेही लक्षात येतं. कारण प्रत्येक प्रकरणात विचाराची खोली आहे. शब्द सोपे असले तरी मुद्दे महत्त्वाचे आहेत. नि हीच तर खरी लेखनकला असते मोठ्या गोष्टी छोट्या शब्दांत सांगणं.
पुस्तकाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सामाजिक जबाबदारी. व्यवसाय म्हणजे फक्त स्वतःचा फायदा नाही, तर समाजासाठी मूल्य निर्माण करणं. रोजगार देणं, विश्वास निर्माण करणं, नैतिकता जपणं अन् दीर्घकालीन परिणामांचा विचार करणं, हे व्यवसायाचं अविभाज्य अंग आहे. हा दृष्टिकोन आज फार महत्वाचं नि गरजेचं आहे. कारण बाजारात टिकणारा व्यवसाय तोच, जो नुसती विक्री करत नाही, तर नातं निर्माण करतो. आणि हे पुस्तक हीच जाणीव रुजवतं.
अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणात जशी माणसाची दु:खं, जिद्द, संघर्ष नि उभारी यांचा आवाज असतो, तशीच या पुस्तकातही एका नव्या माणसाची उभारणी दिसते. इथे यशाची भाषा फक्त श्रीमंतीची नाही ती आत्मविश्वासाची, कष्टाची, नीतीची यासोबतच समाजाभिमुखतेची आहे.
हे पुस्तक उद्योजकाला धंदा तर शिकवतोच पण,त्यासोबतच धेय्य, धैर्य नि धरसोड न करता पुढे जाण्याची सुद्धा ताकद देतं.
एकूण पाहिलं तर हे पुस्तक उद्योजकतेचा प्रवास सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त पुस्तक आहे. विद्यार्थी असो, तरुण असो, नव्याने व्यवसायात उतरणारा असो, किंवा आपली दृष्टी अधिक स्पष्ट करू इच्छिणारा कुणीही असो हे पुस्तक त्याला एक ठाम दिशा देतं. व्यवसाय सुरू करण्याआधी मन तयार असणं का गरजेचं आहे, याचं उत्तर हे पुस्तक देतं. नि ते उत्तर फक्त माहितीचं नाही, तर प्रेरणेचं आहे.❤️
©️Moin Humanist ✍🏻
हे पुस्तक We Read मधून घरपोच बोलवण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर Msg करा…❤️
https://wa.me/7066495828
https://chat.whatsapp.com/GflcupmFOtD5SExk8qsaU8s
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा