मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ …🍀💖
हल्ली जिम सरांच्या सानिध्यात आहे. वेळ मिळेल तशी त्यांची पुस्तके वाचून पूर्ण करतोय .काही दिवसापूर्वी ‘माय इंडिया’ वाचून मन हलकं झालं होतं… नि त्यानंतर हातात घेतलं हे पुस्तक मॅनईटर्स ऑफ कुमाऊँ. कुठलीही पूर्वकल्पना न ठेवता, एक दिवस अचानक वाचायला सुरुवात केली नि थेट एका दमात संपवलं. जसं जसं पुढं जात गेलो, तसं तसं एक वेगळंच नातं जिम कॉर्बेटशी जोडत गेलं.
या पुस्तकात कुठल्याही मोठ्या भाषाशैलीचा फाजील थाट नाही, कुठलाही गाजावाजा नाही. पण ज्या पद्धतीने जिम सर आपले अनुभव सांगतात , त्यामधून एक अतूट प्रामाणिकपणा, धैर्य नि माणुसकी जाणवत राहते. नरभक्षक वाघ अन् बिबटे यांचं भयावह वास्तव समजून घेताना आपल्यालाही वाटतं की हे फक्त शिकाऱ्याचं काम नाही तर ही गावांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. जिम स्वतः शिकारी होते , पण त्यांना शिकारीत फारसं गर्व नव्हता. ते केवळ त्या प्राण्याला मारत होते जो माणसांसाठी धोका निर्माण करत होता .
या कथांमध्ये अनेक वेळा मृत्यू समोर उभा राहतो पण तरीही त्याची भीती न वाटता जिमचा शांत नि संयमित दृष्टिकोन अधिक जाणवत राहतो. एकेका घटनेच्या वर्णनात m ते केवळ थरारक प्रसंग सांगत नाही, तर त्या गावकऱ्यांची परिस्थिती, त्यांचा विश्वास, त्यांच्या नजरेतली भीती हे सगळं इतकं संवेदनशीलपणे लिहितात की वाचक म्हणून आपण त्या जंगलातच उभे राहतो.
माझ्यासाठी या पुस्तकाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे जिम सरांची निसर्ग व प्राणी यांच्याबद्दल असलेली सहवेदना. ते कुठल्याही प्राण्याला सहजपणे दुष्ट ठरववायचे नाही . वाघ नरभक्षक का बनतो, यामागची कारणं ते शोधायचे. अनेकदा त्या प्राण्याच्या दुखापती, जखमा, किंवा मानवाच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे तो माणसांवर हल्ला करतो हे सांगताना जिम एक सहृदय समजूतदारपणा दाखवयाचे .ते शिकारी जरी होते तरी ते आपल्या बंदुकीचा वापर अतिशय जबाबदारीनं करायचे.
हे पुस्तक म्हणजे फक्त वाघ-बिबट्याच्या गोष्टी नाहीत. हे एका माणसाच्या मूल्यांचा आरसा आहे. जिम कॉर्बेटचं आयुष्य म्हणजे ‘हिरो’गिरी नव्हे तर ‘मानवता’. ते जरी बंदूक घेऊन जंगलात उतरत होते, तरी त्यांच्या मनात केवळ बंदूक नाही तर करुणा नि कर्तव्य यांचीही उपस्थिती असायची .मॅनईटर्स ऑफ कुमाऊँ वाचून मला एक गोष्ट ठामपणे समजली की निसर्गाकडं पाहायचं आपलं दृष्टीकोनच चुकीचा आहे. आपण त्याला भीतीने किंवा अधिपत्याने पाहतो पण निसर्ग हा समजून घेण्याचा विषय आहे, शोषणाचा नव्हे.💖🌱
नक्कीच वाचा ,विश्वास भावे यांनी अनुवाद फार सुंदर नि अप्रतिम केला आहे.जे वाचताना आपण अनुवादित पुस्तक वाचतोय असं अजिबात वाटतं नाही …😊
© Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा