टू किल अ मॉकिंगबर्ड 🕊️🌸


तर नुकतीच मी हार्पर ली यांची ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचून पूर्ण केली. 1960 मध्ये प्रकाशित झालेल्या अन् पुलित्झर पुरस्कार प्राप्त या कादंबरीच्या जगभरात कोट्यवधी प्रती विकल्या गेल्या आहेत. पण ही कादंबरी हातातून खाली ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, या कादंबरीची खरी ओळख त्याच्या प्रचंड खपात किंवा लोकप्रियतेत नाहीच , तर ते वाचताना नि वाचून झाल्यानंतरही आपल्या मनात जी एक तीव्र अस्वस्थता रेंगाळत राहते, त्यात आहे.☘️

वरवर पाहता, ही कथा अलाबामा राज्यातील 'मेयकॉम्ब' या एका लहानशा शांत शहरात राहणाऱ्या 'स्काउट' नावाच्या चिमुकल्या मुलीची, तिचा भाऊ जॅम आणि तिचे वकील वडील एटिकस फिंच यांची वाटते. 

लहान मुलांचे खेळ, त्यांचे बालसुलभ कुतूहल नि आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा त्यांचा निष्पाप दृष्टिकोन यातून कथेची सुरुवात होते. पण हळूहळू ही कथा आपल्याला एका अशा अंधाऱ्या वळणावर घेऊन जाते, जिथे अमेरिकेचा प्रदीर्घ नि कलंकित वर्णद्वेषाचा इतिहास जसाच्या तसा उघडा पडतो.

यातील कथानकाचा मुख्य गाभा नेमकं काय आहे ?

तर टॉम रॉबिन्सन या एका कृष्णवर्णीय तरुणावर एका गोऱ्या महिलेने केलेला बलात्काराचा खोटा आरोप. संपूर्ण शहर टॉमच्या विरोधात असताना, स्काउटचे वडील एटिकस फिंच हे टॉमची बाजू न्यायालयात मांडण्याचे धाडस दाखवतात. न्यायालयात टॉम निर्दोष असल्याचे सगळे पुरावे स्पष्ट असतानाही, फक्त त्याच्या त्वचेचा रंग काळा आहे म्हणून त्याला दोषी ठरवले जाते. हा प्रसंग वाचताना आपलं मन अक्षरशः सुन्न होतं.

ही कादंबरी वाचताना मला एक प्रश्न वारंवार अस्वस्थ करत होता तो म्हणजे हा की कायदा नि संविधानाने समानता दिली म्हणजे समाजाची पूर्वग्रहदूषित मानसिकता लगेच बदलते का?

अमेरिकेत अब्राहम लिंकन आजोबांच्या काळापासून गुलामगिरी संपवण्यासाठी मोठे राजकीय निर्णय झाले, कायदे बदलले, नागरी हक्कांसाठी चळवळी झाल्या. पण माणसाच्या मनात  नि रक्तामध्ये खोलवर रुजलेला विषारी पूर्वग्रह संपवण्यासाठी त्यापेक्षा खूप मोठा नि खडतर प्रवास करावा लागतो, हे ही कादंबरी जळजळीतपणे समोर आणते. 

'मॉकिंगबर्ड' हा एक अत्यंत निष्पाप पक्षी असतो, जो कोणाचंही नुकसान करत नाही, फक्त सुंदर गाणी गाऊन आनंद देतो. अशा निष्पाप पक्ष्याला मारणे हे जसे पाप आहे, तसेच टॉम रॉबिन्सनसारख्या निष्पाप माणसावर त्याच्या रंगावरून अन्याय करणे ही मानवतेची हत्या आहे हाच संदेश या कादंबरीच्या शीर्षकात दडलेला आहे.

काही पुस्तकं आपण वाचतो कारण ती आपल्याला छान वाटतात, मनोरंजन करतात नि आपण ती विसरून जातो. पण काही पुस्तकं आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढतात. ती आपल्याला आतून ढवळून निघायला भाग पाडतात, आपल्याला अस्वस्थ करतात नि स्वतःच्याच समाजातील अन्यायाविरुद्ध, पूर्वग्रहांविरुद्ध प्रश्न विचारायला शिकवतात. जर तुम्हाला एखादं असं पुस्तक वाचायचं असेल जे नुसतं एक कथा सांगत नाही, तर तुमच्या संवेदनशीलतेला नि विवेकाला जागं करतं... 

जे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही आधीसारखे राहत नाही, तर हे पुस्तक तुम्ही नक्की नक्की नक्की वाचायला हवे.🌸

© Moin Humanist✍🏻

हे पुस्तक We Read मधून घरपोच बोलवण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर Msg करा…❤️

https://wa.me/c/919518398168

https://chat.whatsapp.com/GflcupmFOtD5SExk8qsaU8s

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

हमारी अधुरी कहाणी - 1 🌼

वाचन प्रवास....🌼❤️