गंगथडी……❤️



नारायण खानसोळे सर लिखित नुकतीचं आलेली नवी-कोरी 256 पृष्ठसंख्या असलेली कादंबरी वाचली नि भरून पावलो असं म्हणू शकतो कारण मी ही कादंबरी वाचली नाही तर अक्षरशः जगून आलोय.

काही पुस्तकं वाचताना माणूस पानांमध्ये हरवत नाही तर तो मातीत हरवतो. गोदाकाठच्या त्या ओल्या मातीत, बाभुळबनाच्या दाटवाटात, पुराच्या दरडीखाली वसलेल्या वासरी गावाच्या गल्ल्यांमध्ये. 

नारायण खानसोळे सरांची नवी कोरी कादंबरी गंगथडी वाचताना हेच होतं. ही एका गावाची कथा तर आहेच त्यासोबतच ही एका संपूर्ण कृषी संस्कृतीची जिवंत स्मृती सुद्धा आहे नि ती स्मृती इतकी खरी आहे, इतकी अस्सल आहे की वाचता वाचता आपल्याला आपल्या आजोळच्या रानाचा वास यावा, आजीच्या हातच्या भाकरीची आठवण यावी, गुरांच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज कानात घुमावा.

गंगथडी म्हणजे गोदाकाठची जीवनरीत. गोदावरी आईच्या काठावर, नांदेडच्या खालून, काळ्या मातीच्या वावरांमध्ये जगणाऱ्या माणसांची ही कथा आहे. पण लेखक फक्त माणसांबद्दल लिहित नाहीत ते त्या झाडांबद्दल लिहितात, त्या दरडींबद्दल लिहितात, त्या गंगेच्या पाण्याबद्दल लिहितात जी लेकरं, पाखरं, वासरं, किडे-मुंग्यांची माय आहे. 

एका बाजूला पिंपळ, वड, लिंब, आंबा तर दुसऱ्या बाजूला काटाळ बाभळी, चोपड्या बाभळी, रामकाट्या बाभळीचं घनदाट बन. भर दुपारी बायापोरायला गंगेवर यायला हिंमत होणार नाही असा खिट्ट अंधार. हे निसर्गाचं नुसतं वर्णन नाही तर हे एका माणसाने आपल्या लहानपणापासून डोळ्यांत साठवलेलं जग आहे. अन् ते शब्दांत ओतताना सरांनी एक थेंबही सांडू दिलेला नाही. त्या झाडांची नावं वाचताना, त्या वाटांचं चित्रण वाचताना, माणूस त्या गावात शिरतो नकळत, हळूवारपणे.

या कादंबरीचं सर्वात मोठं बळ म्हणजे तिची भाषा. “कोणाचं हाबाळून गबाळून घेऊ नव्हं, वाटंत सोनं पडलं तरी उचलू नव्हं" ही वाक्यं वाचली की कळतं की ही बोली नुसती संवादासाठी वापरलेली नाही तर ती या माणसांच्या आयुष्याचा नैतिक कणा आहे. त्यांची नीतिमत्ता कोणी शिकवलेली नाही तर ती मातीतून आली आहे, पिढ्यान्पिढ्यांच्या राबण्यातून आली आहे. 

वासरी गावाची मायबोली ही निजामी राजवटीच्या नि शीख परंपरेच्या सहवासाने घडलेली आहे त्यामुळे तिच्यात एक संमिश्र सौंदर्य आहे जे मराठीच्या इतर कोणत्याही बोलीत सापडत नाही. "बडंल बडंल बडंल", "सीडबीड", "चिकोल" हे शब्द वाचताना ते शब्द वाटत नाहीत, ते आवाज वाटतात, ते दृश्य वाटतात. 

लेखकांनी ही बोली जपताना आधुनिक माणसाचं भाष्य करण्याचा मोह जाणीवपूर्वक टाळला आहे. “माझ्या आधुनिक मनातले भाष्य टाळून, तटस्थ राहून जे ऐकलं, जे पाहिलं, जे भोगलं, त्याच्याशी इमान राखून मी ओढलेल्या ह्या रेघुट्या आहेत" हे लेखकाचे स्वतःचे शब्द या कादंबरीचा आत्मा सांगतात. 

तटस्थता हा इथे कमजोरपणा नाही ती सर्वात मोठी ताकद आहे. कारण जेव्हा लेखक स्वतःला मागे घेतो, तेव्हा पात्रं स्वतः बोलू लागतात नि माझ्यामते ती बोलणी जास्त खरी असते.

या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे एक शेतकरी कुटुंब. नि त्या कुटुंबाच्या व्यक्तिरेखा नातवावर जिवापाड प्रेम करणारी आजी, रात्रंदिवस घरगाडा ओढणारी, घरचं दारचं रानातल्या कुत्र्याचंही पोट ओळखणारी अन्नपूर्णा आई अन् अवलिया स्वभावाचा बाप. 
या बापाचं वर्णन वाचताना मन गहिवरतं जो इळभर रानात कुंदा काढतो, रात्री गाव प्रसंगात स्वयंपाक करतो, लग्नात मंगलाष्टका म्हणतो, गेलेल्या माणसाच्या घरी जातो, जत्रेत उकळीचे बार भरतो. हा माणूस जाती-धर्माच्या भिंती ओलांडत होता पण त्याला त्याचं नाव नव्हतं, घोषणा नव्हती, कोणाला सांगायची गरज नव्हती तर ते त्याचं जगणंच होतं. 

बैल, गाय, रेडा, घोडा, शेरडू यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा हा भूतदयावादी माणूस एकाच वेळी कठोर शेतगडी नि मऊ मनाचा बाप आहे हे द्वंद्व खानसोळे सरांनी कोणतीही मोठी साहित्यिक भाषणबाजी न करता नुसतं दाखवलं आहे. अन् ते दाखवणंच या कादंबरीला श्रेष्ठ बनवतं. 

कुंभार, सुतार, न्हावी, जंगम, वडर हे बलुतेदार-अलुतेदार नि त्यांची निस्सीम सेवा यांचं चित्रण वाचताना एक जग उभं राहतं जे आता उरलेलं नाही, पण या पानांमध्ये अजून जिवंत आहे.

आपण घराचं बांधकाम सांगणारा तो प्रसंग वाचावा - गंगेची वाळू नि लिंबाचा पाला जात्यावर दळून, पाण्यात कालवून, चिखलाचं बांधकाम. गवंडी, मिस्त्री, कुंभार, सुतार, वडर सगळे अंगणात डेरा टाकतात, दोन-तीन साल राबतात नि पिढ्यान्पिढ्यांना आसरा देणारं घर उभं राहतं. हे वर्णन वाचताना जाणवतं की त्या काळात घर बांधणं म्हणजे फक्त विटा-सिमेंटचं नव्हतं तर ते एक सामूहिक कार्य होतं, एक सांस्कृतिक कार्यक्रम होतं. नि ती संस्कृती आता हरवली आहे हे सांगायला लेखकांना येथे एकही रडका वाक्य वापरावं लागलेलं नाही. 

बाकी त्या हरवण्याची खंत आपल्याच मनात उगवते आपोआप.
हे वेगळं सांगायला नको.

आपल्या लाडक्या मराठी ग्रामीण साहित्याची एक समृद्ध परंपरा आहे .व्यंकटेश माडगूळकर, ग. दि. माडगूळकर, आर. आर. बोरडे यांनी ती जपली. गंगथडी या परंपरेत नुसती बसत नाही तर ती त्या परंपरेला एक नवा भूगोल देते. मराठवाड्याचा, गोदाकाठचा, निजामी-शीख संमिश्र संस्कृतीचा भूगोल. 

माझ्यमते हे अनुभवविश्व मराठी ग्रामीण साहित्यात आधी इतकं खोलवर मांडलं गेलेलं नव्हतं. त्या सणवटी माळावरच्या जमिनीलाही घाम गाळणारा मिळाला की मरणाचं पिकावं हे वाक्य वाचताना लक्षात येतं की या मातीला ओळखणारा माणूसच असं लिहू शकतो. हे ज्ञान ग्रंथालयातून येत नाही, ते पायाखालच्या मातीतून येतं, ते बापाच्या शेतात राबण्यातून येतं, ते गंगेच्या पुराचा आवाज रात्री ऐकण्यातून येतं.

गंगथडी वाचणं म्हणजे एक हरवलेलं जग परत भेटणं. ते जग गेलेलं आहे.पण या कादंबरीत ते इतकं जिवंत आहे की पुस्तक बंद केल्यावरही ते मनात राहतं. 

धड शहरात अन् चित्त खेड्यात हीच अवस्था वाचताना होते नि वाचून झाल्यावरही ती सुटत नाही. शहरात राहणाऱ्या, खेड्याशी नाळ तुटत चाललेल्या, मातीची ओढ विसरत चाललेल्या प्रत्येकाने ही कादंबरी वाचायलाच हवी. 

आपण कुठून आलो हे विसरणं म्हणजे आपल्या मुळांपासून तुटणं नि गंगथडी ती मुळं हळुवारपणे, जबरदस्तीशिवाय, पण खोलवर परत आपल्याला आठवून देते.

तूर्तास एवढंच….❤️🌸

©️Moin Humanist ✍🏻

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

हमारी अधुरी कहाणी - 1 🌼

वाचन प्रवास....🌼❤️