महामाया निळावंती…🌸❤️



या कादंबरीचं केंद्रस्थान आहे ‘निळावंती’ची ती प्राचीन आख्यायिका. असं म्हणतात की, निळावंती हा असा एक ग्रंथ आहे जो वाचणाऱ्याला निसर्गाची भाषा समजते, प्राण्यांशी संवाद साधता येतो, पण तो ग्रंथ वाचणारा एकतर वेडा होतो किंवा त्याचा अंत होतो.

 या आख्यायिकेभोवती सुमेध दादा यांनी विणलेलं जाळं थक्क करणारं आहे. 

कथानकात येतो तो विक्रम विभूते एक वैज्ञानिक, ज्याचा तर्कशास्त्रावर विश्वास आहे. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात एक न भरून येणारं दुःख येतं, जेव्हा तो आपल्या मृत मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी धडपडू लागतो, तेव्हा विज्ञानाची चौकट मोडली जाते. विज्ञानाने नाकारलेल्या गोष्टी जेव्हा मानवी भावनेच्या नि हट्टाच्या जोरावर शोधल्या जातात, तेव्हा काय होतं याचा थरार म्हणजेचं ही कादंबरी.

यातलं बाजिंदा हे पात्र नि त्याचा या प्रवासाशी असलेला संबंध काळजाचा ठोका चुकवणारा आहे. सह्याद्रीच्या दुर्गम भागात दडलेली ती रहस्यं, प्राचीन विद्या नि एका पित्याची आपल्या मुलाला परत मिळवण्यासाठी चाललेली धडपड… हे सगळं वाचताना मन सुन्न होतं. 

लेखकांनी फक्त सस्पेन्स निर्माण केला नाही तर त्यांनी ‘मेटाफिक्शन’चा इतका सुंदर वापर केला आहे की, कधीकधी आपल्या वाटू लागतं की आपण फक्त कादंबरी वाचत नाही आहोत, तर आपण स्वतः त्या निळावंतीच्या शोधाचा भाग आहोत. 

विज्ञान, श्रद्धा, मानवी मन नि निसर्गाचं रौद्र रूप यांचा इतका सुरेख संगम मराठी साहित्यात क्वचितच पाहायला मिळतो.

ही कादंबरी फक्त थरार देत नाही तर ती मानवी अस्तित्वाचे प्रश्न विचारते. दुःख माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतं? विज्ञानाच्या मर्यादा कुठे संपतात? नि निसर्गाचे असे कोणते कोपरे आहेत जे अजूनही मानवी बुद्धीच्या पलीकडे आहेत? 

सुमेध दादांचा अभ्यास नि त्यांचं संशोधन प्रत्येक प्रकरणात जाणवतं. त्यांची शैली अत्यंत सिनेमॅटिक आहे. वाचताना आपल्या डोळ्यांसमोर एखादा भव्य चित्रपट -वेबसिरीज सुरू आहे असा भास होतो. 

पात्रांची मांडणी करताना त्यांनी कुठेही घाई केलेली नाही. विक्रम विभूतेचं दुःख असो किंवा त्या जंगलातलं गूढ, प्रत्येक गोष्ट आपल्या मनावर हळूहळू कोरली जाते.

माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा झालं तर, 

ही कादंबरी वाचताना अनेकदा माझ्या अंगावर काटा आला. रात्रीच्या शांततेत जेव्हा मी सह्याद्रीच्या त्या जंगलाचं वर्णन वाचत होतो, तेव्हा आजूबाजूच्या वाऱ्याचा आवाजही मला त्या गूढ जगाचा भाग वाटू लागला होता. कादंबरी संपली पण विक्रम विभूतेचा तो चेहरा नि निळावंतीचं ते रहस्य डोक्यातून जात नव्हतं. 

कित्येक दिवस मी त्याच विचारात होतो की, आपण ज्याला सत्य मानतो, ते खरंच संपूर्ण सत्य असतं का? की सत्याच्या पलीकडेही अजून काहीतरी आहे, जे फक्त अनुभवायचं असतं?

शेवटी इतकंच म्हणेन, महामाया निळावंती ही कादंबरी वाचायची नाही तर ती अनुभवायची आहे. 

ही कादंबरी तुम्हाला अस्वस्थ करेल, तुम्हाला प्रश्न विचारायला भाग पाडेल नि कदाचित तुमच्यातल्या वाचकाला एक नवीन दृष्टी सुद्धा देईल.🌸

 नक्की वाचा.🌿🙌🏻

© Moin Humanist ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

वाचन प्रवास....🌼❤️

जोगवा 💔🌼