रारंग ढांग ❤️💙
“जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रह जाता है?”
हे वाक्य वाचलं अन् काही क्षण पुस्तक बंद करून शांत बसलो. प्रश्न साधा वाटतो, पण उत्तर मात्र तितकं सोपं नाही. कदाचित म्हणूनच हे पुस्तक संपलं तरी तो प्रश्न अजूनही मनात फिरत राहतो.
प्रभाकर पेंढारकर यांनी 1981 साली लिहिलेली ‘रारंग ढांग’ ही केवळ 168 पानांची कादंबरी आहे. पण या 168 पानांमध्ये त्यांनी हिमालयाचा जो अनुभव उभा केला आहे, तो निव्वळ अविस्मरणीय आहे. पुस्तक वाचताना हिमालय फक्त डोळ्यांसमोर उभा राहत नाही, तर त्याची थंडी, त्याचं वैभव, त्याची भीती नि त्याचं एकाकीपण सुद्धा जाणवू लागतं.
कादंबरीचा नायक विश्वनाथ मेहेंदळे. मुंबईतील सुरक्षित नि चांगल्या पगाराची नोकरी सोडून तो हिमालयातील दुर्गम भागात जातो. जिथे Border Roads Organisation उभ्या कड्यांमध्ये रस्ते खोदत असते. जिथे अनेक फूट बर्फ पडतो, ऑक्सिजन कमी असतो नि प्रत्येक दिवस हा जगण्यासाठीचा संघर्ष असतो. पण प्रश्न पडतो एखादा माणूस एवढं सगळं सोडून अशा ठिकाणी का जातो? नि त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण नकळत या कादंबरीच्या प्रेमात पडतो.
माझ्या मते ही कादंबरी तीन वेगवेगळ्या लढायांची गोष्ट सांगते.
पहिली लढाई म्हणजे माणूस आणि निसर्ग यांच्यातली. हिमालयाचं रौद्र रूप, हिमवर्षाव, भूस्खलन आणि कठोर परिस्थिती.
दुसरी लढाई म्हणजे माणूस नि माणूस यांच्यातली. विविध स्वभावाची माणसं, त्यांचे अहंकार, नातेसंबंध, प्रेम, मत्सर अन् संघर्ष.
पण सर्वात महत्त्वाची तिसरी लढाई म्हणजे माणूस नि स्वतः यांच्यातली. कारण बाहेरचा शत्रू दिसतो, पण स्वतःच्या मनाशी चाललेला संघर्ष अनेकदा अदृश्य असतो.
पुस्तकात एक वाक्य आहे जे मनात कायमचं घर करून गेलं ते म्हणजे,
“रस्ता म्हणजे केवळ दोन बिंदूंना जोडणारं अंतर नव्हे. रस्त्यानं माणसांसोबत त्यांचे विचार प्रवास करतात. आशा नि आकांक्षा, शिक्षण आणि ज्ञानही…” 🌸
हे वाक्य वाचताना मला Public Policy चा विद्यार्थी म्हणून वेगळंच काही जाणवलं. विकास म्हणजे नुसत्या इमारती किंवा आकडे नसतात. एखादा रस्ता म्हणजे एका संपूर्ण समाजाला जगाशी जोडणारा दुवा असतो. एका रस्त्यामागे किती स्वप्नं नि किती आयुष्यं जोडलेली असतात, हे या कादंबरीतून प्रकर्षाने जाणवतं.
आणखी एक सुंदर वाक्य-
“थकव्यासारखी उशी नाही, श्रमासारखी गादी नाही.”
श्रमाचं सौंदर्य इतक्या साध्या पण प्रभावी शब्दांत व्यक्त करणारी ओळ मी फार कमी वेळा वाचली आहे.🥰
मेजर बंबा, कॅप्टन मिनू खंबाटा, कर्नल राईट, सर्जेराव गायकवाड, उमा, कॅप्टन नायर यांसारखी पात्रं वाचताना ती फक्त पात्रं राहत नाहीत. ती आपल्या सोबत प्रवास करू लागतात. त्यांच्या संघर्षात आपण गुंततो, त्यांच्या वेदना जाणवतात आणि त्यांच्या जिद्दीचा आदर वाटू लागतो.
या पुस्तकात एकही चित्र नाही. तरीही संपूर्ण हिमालय आपल्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. लेखकाच्या लेखणीचं हे सर्वात मोठं यश आहे.
पुस्तक संपलं, पण सुरुवातीला विचारलेला प्रश्न अजूनही मनात आहे.
“जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रह जाता है?”
कदाचित माणूस जातो, पण त्याची कर्मं, त्याचे विचार, त्याच्या आठवणी नि त्याने स्पर्श केलेली आयुष्यं मागे राहतात.
रारंग ढांग ही फक्त हिमालयाची कथा नाही. ती संघर्षाची, ध्येयाची, श्रमाची नि माणूसपणाची कथा आहे.
नि म्हणूनच, हे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवटचं पान वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही. ❤️📚🏔️
©️Moin Humanist ✍️
हे पुस्तक We Read मधून घरपोच बोलवण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर Msg करा…❤️
https://wa.me/7066495828
https://chat.whatsapp.com/GflcupmFOtD5SExk8qsaU8s
#रारंगढांग #प्रभाकरपेंढारकर #मराठीसाहित्य #मराठीपुस्तके #पुस्तकप्रेमी #वाचनसंस्कृती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा