द सेव्हन्थ सिक्रेट 🖤
हिटलर खरंच मेला होता का?
30 एप्रिल 1945 - दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जवळ आला होता. बर्लिनवर सोव्हिएत सैन्याचा ताबा मिळत होता. इतिहास सांगतो की त्या दिवशी Führerbunker मध्ये अॅडॉल्फ हिटलर नि त्याची पत्नी इव्हा ब्राऊन यांनी आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह जाळण्यात आले नि त्यासोबत नाझी जर्मनीचाही अंत झाला.
पण इतिहासात काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरं मिळाली तरी शंका संपत नाही.
जर त्या बंकरमध्ये मृत्यू पावलेली व्यक्ती हिटलरच नव्हती तर?
जर हिटलरने स्वतःसारखे दिसणारे body doubles वापरले असतील तर?
अन् जर जगाला माहिती नसलेल्या एखाद्या गुप्त बंकरमध्ये तो जिवंत राहिला असेल तर? याच कल्पनेवर आधारित आहे आयर्विंग वॅलेस यांची अफलातून थ्रिलर कादंबरी
कथेची सुरुवात होते ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध इतिहासकार हॅरिसन अशक्रॉफ्ट यांच्यापासून. ते हिटलरचं अंतिम नि सर्वसमावेशक चरित्र लिहित असतात. त्याच वेळी त्यांना एका जर्मन दंतवैद्याकडून एक रहस्यमय पत्र मिळतं. त्या पत्रात असा दावा केलेला असतो की जगाला सांगितलेली हिटलरच्या मृत्यूची कथा पूर्ण सत्य नाही.
या धाग्याचा शोध घेण्यासाठी अशक्रॉफ्ट बर्लिनला जातात. पण माहितीदाराला भेटल्यानंतर लगेचच त्यांचा एका संशयास्पद hit-and-run मध्ये मृत्यू होतो.
हा साधा अपघात नसतो तर ती थंड डोक्याने केलेली हत्या असते.
यानंतर कथेत प्रवेश करते त्यांची मुलगी एमिली अशक्रॉफ्ट.
वडिलांचं अपूर्ण संशोधन पूर्ण करण्याचा निर्धार करून ती सत्याच्या शोधात निघते. तिच्यासोबत असतो रेक्स फॉस्टर नावाचा अमेरिकन वास्तुविशारद, निकोलस किर्वोव्ह हा सोव्हिएत संग्रहालय अधिकारी आणि टोव्हा लेविन ही पत्रकार जी प्रत्यक्षात मोसादशी संबंधित असते.
चार वेगवेगळ्या देशांतील, वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या व्यक्ती एकत्र येतात नि सुरू होतो इतिहासातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एका रहस्याचा शोध.
शोध त्यांना एका धक्कादायक माहितीपर्यंत घेऊन जातो हिटलरसाठी सात बंकर बांधण्यात आले होते, पण जगाला फक्त सहाच माहीत आहेत. सातवा बंकर गुप्त ठेवण्यात आला होता. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक लपवलेला मार्ग होता, जो बांधणाऱ्या लोकांनाच नंतर जिवंत ठेवण्यात आलं नव्हतं. कादंबरी जसजशी पुढे सरकते तसतसं प्रत्येक उत्तरातून नवे प्रश्न जन्म घेतात. प्रत्येक धागा एका नव्या रहस्याकडे घेऊन जातो. आणि शेवटी समोर येणारं सत्य वाचकाला अक्षरशः थक्क करून सोडतं.
या पुस्तकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे आयर्विंग वॅलेस यांनी वास्तव नि कल्पनारंजन यांची केलेली विलक्षण गुंफण. दुसऱ्या महायुद्धातील खऱ्या घटना, नाझी जर्मनीचा इतिहास, सोव्हिएत गुप्तचर यंत्रणा, युद्धानंतरचे राजकारण आणि त्यामध्ये मिसळलेली थरारक कल्पना हे सगळं इतक्या विश्वासार्ह पद्धतीने मांडलं आहे की अनेकदा आपण कादंबरी वाचतोय की इतिहासाचा एखादा गुप्त दस्तऐवज असा प्रश्न पडतो.
मराठीत विजय देवधर सरांनी केलेला अनुवादही तितकाच प्रभावी आहे. भाषेचा वेग, थरार नि रहस्य कायम ठेवत त्यांनी मूळ कथेचा आत्मा जिवंत ठेवला आहे.
पुस्तक संपलं. शेवटचं पान उलटलं. पण एक प्रश्न अजूनही मनात रेंगाळतो -
हिटलर खरंच त्या बंकरमध्ये मेला होता का?
इतिहास तर म्हणतो हो.
पण द सेव्हन्थ सिक्रेट वाचल्यानंतर मन पुन्हा विचारतं -
खरचं ? 😕
वाचा भारी आहे….🍁🥰
© Moin Humanist ✍️
हे पुस्तक We Read मधून घरपोच बोलवण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर Msg करा…❤️
https://wa.me/7066495828
https://chat.whatsapp.com/GflcupmFOtD5SExk8qsaU8s
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा