हमारी अधुरी कहाणी - 2(Part -1)🥰♥️
काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात… ❤️
प्रेम नेमकं कधी होतं? पहिल्याच नजरेत? की अनेक भेटीनंतर? की एखाद्या साध्या कशी आहेस? मध्ये? मला आजही त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही. पण एवढं नक्की माहीत आहे, की काही माणसं आपल्या आयुष्यात इतक्या शांतपणे येतात की ते कधी आपल्या श्वासाचा भाग बनतात हे कळतच नाही. नि जेव्हा ते निघून जातात, तेव्हा लक्षात येतं की ते फक्त आयुष्यात आले नव्हते तर आपल्या आयुष्याचा एक भाग बनून गेले होते.
माझ्यासाठीही ते सगळं अगदी असंच सुरू झालं.🌸
मी पहिल्यांदाच घरापासून इतक्या लांब आलो होतो. एका छोट्याशा गावातून मोठ्या कॉलेजमध्ये. मनात अनेक स्वप्नं होती, पण त्याहून जास्त भीती होती. नवीन शहर, नवीन माणसं, नवीन वातावरण… नि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भाषा.
आजूबाजूला सगळे सहज इंग्रजीत बोलत होते. काहीजण हिंदीतही बोलत होते. मी मात्र दोन्ही भाषांमध्ये स्वतःला अपुरा समजत होतो. वर्गात बसायचो, लोकांशी हसायचो पण आतून कुठेतरी एकटाच होतो.
माणसांनी भरलेल्या गर्दीतही एकटेपणा किती मोठा असतो, हे मला त्या दिवसांत समजलं.
ती आमची अगदी साधी भेट होती. कोणताही चित्रपटातला प्रसंग नव्हता. ना पाऊस होता, ना स्लो मोशन, ना पार्श्वभूमीला संगीत. फक्त दोन अनोळखी माणसं एका छोट्याशा कारणाने समोरासमोर आली होती.
एक ग्रुप Assignment संबधित तिने काहीतरी विचारलं.
मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला.
ती इंग्रजी बोलत होती पण तिच्या उच्चारावरून तीही त्या भाषेत पूर्णपणे सहज नव्हती. मी तोडक्या-मोडक्या इंग्रजीत उत्तर दिलं. दोघंही थोडं हसलो. कारण दोघांनाही समजलं होतं की आपण दोघंही एकमेकांची भाषा शोधत आहोत.नंतर कळलं की ती दुसऱ्या राज्यातून आलेली होती. तिला हिंदी जवळजवळ येत नव्हती. नि मला इंग्रजी बोलताना घाम फुटायचा.
आमच्यामध्ये भाषा नव्हती. पण संवाद होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा भेट झाली. यावेळी दोन मिनिटं जास्त बोललो.
तिसऱ्या दिवशी पुन्हा. मग चौथ्या दिवशी. हळूहळू कॉलेजमध्ये एक सवय लागली. दिवसात एकदा तरी तिची भेट व्हायचीच. भेट झाली नाही तर काहीतरी राहिल्यासारखं वाटायचं. सुरुवातीला आम्ही फक्त क्लासबद्दल बोलायचो.
नंतर कॉलेजबद्दल. मग आपल्या गावांबद्दल. ती तिच्या राज्यातील गोष्टी सांगायची. मी माझ्या गावाबद्दल सांगायचो. ती तिच्या भाषेतले काही शब्द शिकवायची. मी तिला मराठीतले काही शब्द शिकवायचो. ती माझ्या इंग्रजीवर हसायची नाही, उलट प्रत्येक चूक प्रेमाने दुरुस्त करायची. मी तिच्या हिंदीचा प्रयत्न पाहून हसायचो. आमच्या संभाषणात व्याकरणापेक्षा भावना जास्त होत्या.
आम्ही दोघेही त्या शहरात नवीन होतो. दोघेही घरापासून दूर होतो. दोघांनाही कोणीतरी आपलं वाटणारं माणूस हवं होतं.
कदाचित म्हणूनच आमची मैत्री इतक्या लवकर झाली.
संध्याकाळी क्लास संपला की आम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरायला जायचो. कधी कॅन्टीनमध्ये चहा घ्यायचो. कधी जवळच्या मॉलमध्ये फेरफटका मारायचो. कधी फक्त चालत राहायचो. बोलणं संपलं तरी चालायचो. काही नाती अशी असतात की त्यांना सतत शब्दांची गरज नसते.
एकदा आम्ही माझ्या बाईकवर बाहेर गेलो. तिला काही वस्तू घ्यायच्या होत्या. मी तिच्यासोबत गेलो. छोट्याशा खरेदीला जवळजवळ तीन तास लागले. कारण खरेदीपेक्षा बोलण्यात जास्त वेळ गेला. त्या दिवशी घरी येताना मला जाणवलं… आजचा दिवस खूप सुंदर होता. हळूहळू मला तिची वाट पाहण्याची सवय लागली. सकाळी तिचा Good Morning मेसेज आला नाही तर दिवस अपूर्ण वाटायचा. ती आजारी असेल तर माझं मन अस्वस्थ व्हायचं. मी उदास असेन तर ती काही न विचारता माझ्या बाजूला येऊन बसायची.
त्या दिवसांत मला एक गोष्ट समजली…
काही लोक तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येत नाहीत…
तेच आनंद बनून येतात.
एका दिवशी ती म्हणाली,
You speak English better now. मी हसलो.
कारण मला माहीत होतं… इंग्रजी सुधारण्यामागे पुस्तकांपेक्षा तिचा जास्त वाटा होता. ती माझ्या चुका दुरुस्त करत होती…
नि नकळत माझं आयुष्यही. त्या काळात मी स्वतःमध्ये खूप बदल अनुभवत होतो. आधी लोकांशी बोलायला घाबरणारा मी आता आत्मविश्वासाने बोलू लागलो होतो. आधी एकटं राहणं आवडायचं. आता दिवसातला काही वेळ तिच्यासोबत घालवला नाही तर बेचैनी वाटायची.
प्रेम कधी झालं, हे खरंच सांगता येणार नाही. कोणत्याही एका क्षणात ते झालं नाही. ते रोज थोडं थोडं वाढत गेलं.
एखाद्या झाडासारखं.
पहिल्यांदा बीज रुजतं…
मग अंकुर फुटतो…
मग पानं येतात…
नि एक दिवस लक्षात येतं…
झाड खूप मोठं झालं आहे.
एक संध्याकाळ होती.
आम्ही दोघं कॉलेजच्या मागच्या रस्त्यावर शांतपणे चालत होतो. सूर्य मावळत होता. आकाश केशरी झालं होतं. ती काहीतरी बोलत होती… पण त्या दिवशी मी तिचं बोलणं कमी नि तिच्याकडे जास्त पाहत होतो.
अचानक मनात एक विचार आला…
जर ही मुलगी उद्या या कॉलेजमध्ये नसली, तर?
त्या विचाराने माझ्या छातीत एक विचित्र रिकामेपण जाणवलं.
नि तेव्हाच पहिल्यांदा मी स्वतःशी कबूल केलं…
मी तिच्या प्रेमात पडलो आहे. पण ते प्रेम सांगण्याची घाई नव्हती.
कारण काही भावना बोलून दाखवण्यापेक्षा… जगून दाखवण्यात जास्त सुंदर वाटतात.
…क्रमश 🙌🏻
दुसऱ्या प्रकरणाच्या प्रतीक्षेत : )
उत्तर द्याहटवा