झाडाझडती – मन हेलावून टाकणारा अनुभव 💔
विश्वास पाटील यांची 'झाडाझडती' ही कादंबरी मी बारावीत असताना प्रथम वाचली होती. तेव्हा अनेक गोष्टी नीट समजल्या नव्हत्या, पण काहीतरी मनाला भिडलं होतं, असं आज वाटतंय. आता, मास्टर्स करत असताना पुन्हा एकदा ही कादंबरी वाचतोय – कारणही सांगता येणार नाही, पण आतून वाटलं की पुन्हा वाचावी. इंग्रजी अभ्यासाच्या गर्दीतही माय मराठीशी नाळ जोडलेली ठेवायची हे ठरवलेलं आहे, नि 'झाडाझडती' त्या नाळेला नवसंवेदना देतेय बस्स एवढंच. हि कादंबरी वाचताना असं जाणवलं की आपण बहुतेक वेळा धरणग्रस्तांच्या वेदनांकडे फारच वरवर पाहतो. धरण बांधायचं म्हणजे विकास, शेतीला पाणी, वीज निर्मिती, उद्योग नि संपूर्ण राज्याच्या प्रगतीचा मार्ग असं गणित आपल्या डोक्यात सहज तयार होतं. मलाही पूर्वी तसंच वाटायचं. पण ‘झाडाझडती’ वाचल्यानंतर लक्षात आलं की त्या विकासासाठी कोणाच्या बळावर इमारत उभी राहते ? त्या जमिनी, ती घरं, ती माणसं नि त्यांची आयुष्यं कुठे जातात? या कादंबरीत विश्वास पाटील यांनी धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांचा, तिथल्या माणसांचा संघर्ष फार प्रत्ययकारी पद्धतीने मांडला आहे. सरकारच्या आश्वासनांपासून त...