गुरू आयोनि लडका...❤️
किशोर बळी यांची "गुरू आयोनि लडका" ही अवघ्या 104 पानांची पण अंतर्मनाला हादरवणारी नि आतून विचार करायला लावणारी कादंबरी नुकतीच वाचली. पारधी तांड्यातील एका लहानशा जिल्हा परिषद शाळेची नि त्या शाळेत आलेल्या एका नवख्या शिक्षकाची ही गोष्ट आहे. पण ही फक्त एका शिक्षकाची गोष्ट नाही तर ही आहे त्या शिक्षकाच्या मनात चाललेल्या अस्वस्थतेची, शाळेशी अन् विद्यार्थ्यांशी निर्माण झालेल्या नात्याची व शिक्षणव्यवस्थेच्या ढासळलेल्या वास्तवाची.
कादंबरीची पार्श्वभूमी यवतमाळ जिल्ह्यातील गणेशपूर गावातील पारधी तांडा ही आहे जिथे अजूनही गरिबी, अंधश्रद्धा, शिक्षणापासून दूर राहिलेली मुले नि गावकऱ्यांमध्ये असलेली शंका, अविश्वास नि वेगळेपणाचे दुःख दिसून येते. इथे एक शिक्षक येतो नि तो 'गुरुजी' म्हणून पोऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या जीवनात थोडंसं उजेडाचं पाणी शिंपडतो. पण हा प्रवास सोपा नाही, ना सहज घडणारा.
शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्याला केवळ अध्यापन करायचं नसतं, तर मुलांना शाळेच्या दिशेने ओढून आणायचं असतं, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे असतात, गावकऱ्यांशी संवाद साधायचा असतो. एकेक दिवस जातो तसं त्यांचं नातं घट्ट होत जातं. त्या मुलांच्या डोळ्यातला निरागसपणा, त्यांची भाषा, त्यांचं जग नि त्यांच्या समस्या...सर्व काही शिक्षकाला आतून ढवळून टाकतं. व एक वाचक म्हणून आपल्यालाही.
या पुस्तकात एका बाजूला शिक्षकांची अस्वस्थता, सरकारी व्यवस्थेची बेफिकिरी आणि शिक्षणातले राजकारण आहे, तर दुसऱ्या बाजूला मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारी उमेद, आशा नि प्रेम सुद्धा आहे. शाळा बंद होण्याचा धोका असताना, शिक्षकाने घेतलेले वेगवेगळे उपक्रम.हे सर्व वाचताना आपण त्या तांड्याचा एक भाग झाल्यासारखं वाटतं.
कधी तरी हसवणारं, कधी गहिवरून टाकणारं नि कायमस्वरूपी विचारांत टाकणारं हे पुस्तक “बनगरवाडी” आणि “काटेमुंढरीची शाळा” सारखं वाटतं, पण त्याचं स्वतःचं वेगळं असं एक तांड्यातलं भावविश्व आहे. किशोर बळी सरांचा अनुभव, निरीक्षण नि भाषेवरची पकड या पुस्तकात ठायीठायी दिसते.
ही फक्त एका शिक्षकाची गोष्ट नाही. ही आहे त्या शिक्षकाच्या आतल्या गुंतवणुकीची, मुलांशी झालेल्या नात्याची व सरकारी शिक्षणव्यवस्थेत राहूनही माणूसपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांची गोष्ट नि म्हणूनच ही कादंबरी वाचून "काहीतरी वेगळं वाचल्याची" जाणीव होते.
बाकी शेवटी “गुरुजी आलेत रे पोरा...” ही हाक फक्त तांड्यातच नाही, तर आपल्या मनातही घर करून जाते एवढं मात्र नक्की...❤️
नक्की वाचा...🖤
©️ Bookish Moin ❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा