भुरा 🌼❤️

6 वर्षाच्या गॅपनंतर कॉलेजमध्ये आल्यावर पुन्हा एकदा भुरा हे पुस्तक मी नव्याने जाणीवपूर्वक वाचायला घेतलं.इथपर्यंत येण्यामध्ये भुराचा मोठा रोल राहिलेला आहे.यावेळी सलग न वाचता हे पुस्तकं मी तब्बल 15 दिवस वाचलं.एका दिवसात सुद्धा वाचून संपवता आलं असतं, पण मी प्रत्येक पानाशी थांबलो, त्यातली प्रत्येक भावना अनुभवली नि कधी कधी एखादं पान दोन-तीन वेळा वाचून घेतलं नि आवडलेले लेखकांचे नि विशेषतः आईचे विचार हायलाईट करून ठेवले. कारण हे पुस्तक केवळ एक आत्मचरित्र नाही, तर ते स्वप्न, संघर्ष आणि बदल यांची कहाणी आहे जी मला माझ्या आयुष्याशी खूप जवळची वाटली.

भुरा म्हणजे प्रा. शरद बाविस्कर यांचा स्वतःचा प्रवास. एक अशिक्षित घरातून आलेला मुलगा, शाळेत इंग्रजीत नापास झालेला, पण पुढे मेहनतीने शिक्षण घेऊन JNU सारख्या मोठ्या विद्यापीठात प्राध्यापक होणं ही गोष्ट साधी नाही तिच्यामागे जी खडतर वाट आहे, ती समजून घेतल्यावर कमालीची प्रेरणा मिळते. शिक्षणासाठी, पुस्तकांसाठी नि एक चांगलं आयुष्य मिळवण्यासाठी भुराने केलेला संघर्ष वाचताना असं वाटत होतं की मी माझंच आयुष्य पुन्हा एकदा जगतोय. कारण भुराची परिस्थिती, त्याच्या घरातली गरीबी, त्याचे अपयश, हे सगळं माझ्यासारख्या अनेक मुलांचं वास्तव आहे.यातील काही वाक्य,विचार फक्त भुरासाठी नाही, ते माझ्यासाठी नि अशा लाखो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आहे, जे आजही एका हातात हवं ते पुस्तक व योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मागे पडतात.भुरा हे पुस्तक केवळ प्रेरणादायक नाही, ते सत्य नि कडवट वास्तवाचा आरसा आहे. यात सामाजिक विषमता, शिक्षणव्यवस्थेतील अडथळे, गरीबीतून वर येण्याची धडपड नि एका खेड्यातून आलेल्या मुलाची आत्मा कशी शिकत शिकत मोठी होते, हे स्पष्ट दिसतं. पुस्तक वाचताना मला माझं बालपण, माझं शिक्षण, माझ्या आईवडिलांचे कष्टमय जीवन आठवले. मी सुद्धा 'पहिल्या पिढीतील विद्यार्थी' असल्याने. भुराने जसं आईच्या पदराला चिकटून शिक्षण घेतलं, तसंच मीही माझ्या आईच्या पदरात स्वप्नं गुंडाळलेली होती.🌼

या पुस्तकाने मला शिकवलं की, अपयश म्हणजे अखेर नव्हे. भुराला इंग्रजी विषयात अपयश आलं, पण त्याने हार मानली नाही.तर त्याउलट, त्याच विषयात पदव्युत्तर होऊन नि पुढे प्राध्यापक झाले. हे पाहून मला पुन्हा एकदा खात्री वाटली की, आपण आपलं आयुष्य स्वतः घडवू शकतो गरज आहे ती जिद्दीची नि चिकाटीची.भुरा हे केवळ एका माणसाचं चरित्र नाही. हे पुस्तक म्हणजे सगळ्या कष्टकरी, गावाकडच्या, पहिल्या पिढीच्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करतं. जे मळलेल्या वाटा न चालता आपली स्वतःची वाट निर्माण करतात. जेव्हा मी हे पुस्तक मी पुन्हा नव्याने वाचत होतो, तेव्हा मी देखील आयुष्यातल्या एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर होतो.येथील पुढचं शिक्षण, नवा प्रवास, नवीन जागा नि भुराची गोष्ट मला खूप आधार देऊन गेली. त्याच्या प्रवासाने माझ्या मनात भीतीपेक्षा आत्मविश्वास निर्माण केला.

आजही मला असं वाटतं की भुरा ही फक्त कथा नाही, ती एक ज्वाला आहे जी प्रत्येकाला आतून पेटवू शकते. या पुस्तकाने मला शिकवलं की शिक्षण हे नुसतं नोकरी मिळवण्यासाठी नसतं, तर ते माणूस घडवण्यासाठी असतं. आणि जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं ठरवतो, तेव्हा आपली प्रत्येक चूक, अपयश, अडथळा  सगळं काही आपल्याला शिकवतं जाते.भुराची गोष्ट म्हणजे अशा मुलांची गोष्ट आहे ज्यांचं कुणीच नसतं, पण ते स्वतःच स्वतःसाठी सर्व काही बनतात. आज जेव्हा मी हे पुस्तक बंद करतो, तेव्हा माझ्या मनात एकच भावना आहे.

"'जे भुराला जमू शकतं ते आपल्याला सुद्धा जमू शकतं ".❤️

©️ Bookish Moin 🌼💙

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼