दुनियादारी....🌼❤️

सुहास शिरवळकर यांची ‘दुनियादारी’ ही मराठी साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय नि काळाच्या कसोटीत उतरलेली कादंबरी आहे. कॉलेज जीवन, मैत्री, प्रेम, मत्सर, कुटुंबातील ताणतणाव, गुन्हेगारी पार्श्वभूमी नि बदलत्या नातेसंबंधांवर ही कथा आधारित आहे. पुण्याच्या सिटी कॉलेज परिसरात घडणाऱ्या या कथेतील प्रत्येक पात्र आपल्याला इतकं जवळचं वाटतं की, त्यांचं दु:ख, संघर्ष, आनंद आपणही अनुभवतो. मुख्य पात्र श्रेयस देशपांडे एका श्रीमंत नि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेला मुलगा. कॉलेजमध्ये आल्यावर त्याचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर जातं. शिरीष, दिग्या, मृणाल, मीना नि अप्पा यासारखी पात्रं सुधीरच्या आयुष्यात येतात अन् त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. या सगळ्यांमधील नाती अतिशय गुंतागुंतीची, पण त्याच वेळी वास्तवदर्शी नि मानवी भावनांनी भरलेली आहेत.

कादंबरीची लेखनशैली सहज, संवादप्रधान नि चित्रमय आहे. सुहास शिरवळकर सर हे संवादाच्या माध्यमातून कथेला दिशा देतात. वाचकाला सुरुवातीपासूनच कथेत गुंतवून ठेवण्याची त्यांची शैली भन्नाट आहे. ही केवळ एक कॉलेजमधील तरुणांची कथा नाही, तर ती एकूणच समाजाच्या बदलत्या मानसिकतेचं, नात्यांमधल्या गुंतागुंतीचं नि जीवनातील वास्तवाचं प्रतिनिधित्व करते.

दुनियादारीवर आधारित चित्रपटाने कितीही प्रसिद्धी मिळवली असली, तरी कादंबरीच्या मूळ गाभ्याशी त्यांची साधर्म्य फारशी जाणवत नाही. मूळ कादंबरीतील खोली, भावना नि विचारविश्व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ही कादंबरी वाचने Must आहे.‘दुनियादारी’ ही प्रत्येक तरुणाने वाचावी अशी कादंबरी आहे, कारण ती आपल्याला मैत्री, जबाबदारी, नातेसंबंध नि स्वतःचा मार्ग निवडण्याविषयी विचार करायला लावते. ती फक्त एक कथा नसून, एक अनुभूती आहे जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारी कलाकृती.🌼❤️

©️ Bookish Moin ❤️🌼

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼