सिद्धार्थ ❤️🌼

या बुद्ध पौर्णिमेला विशेष करून नोबेल पुरस्कार विजेते लेखक हरमान हेसे यांच्या जागतिक स्तरावर गाजलेल्या "सिद्धार्थ" या कादंबरीचा अनुवाद मी दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केला. 1922 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला 2022 मध्ये 100 वर्षं पूर्ण झाली आहेत.

एकंदरीत मला ही कादंबरी खूप आवडली नि भावली. दुसऱ्या वाचनात काही नवीन आयाम समजले, उमजले. खूप काही नव्यानं शिकवलं या कादंबरीनं. मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरं मला इथं मिळाली. स्वतःचं अध्ययन करण्यासाठी विशेष प्रेरणा मिळाली.

कादंबरीचं नाव जरी 'सिद्धार्थ' असलं, तरी ती गौतम बुद्धांबद्दल नाही. या कादंबरीत गौतम बुद्धांच्या समकालीन एका मनस्वी भारतीय तरुणाचा आत्मशोध दाखवला आहे. कादंबरीचा काळ मात्र बुद्धांच्या काळातीलच आहे नि यात बुद्ध नि धम्म यांचा उल्लेख आलेला आहे. एकंदरीत हरमान हेसे यांनी गौतम बुद्धांच्या कथेची वेगळ्या प्रकारे पुनरमांडणी केली आहे – पण त्याच अर्थानं, त्या गाभ्यानं.

या कादंबरीचा नायक सिद्धार्थ याच्या जीवनावर बौद्ध नि हिंदू विचारसरणीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. "ज्याला मानवी जीवनाचा खरा अर्थ समजतो तोच खरा सिद्धार्थ" असा या नावाचा गहिरा अर्थ आहे.

ब्राह्मण घरात वाढलेला सिद्धार्थ आत्मसाक्षात्काराच्या शोधात आहे. वास्तव नि शिकवलेलं यामधला विरोध त्याला जाणवतो आणि म्हणूनच तो आपलं आरामदायक जीवन सोडून भ्रमंतीला निघतो. त्याचा विश्वास असतो की, भीतीला पार करणं, आनंद-दुःख-जीवन-मृत्यू या विरोधाभासांना समभावानं स्वीकारणं – हाच खरा मार्ग आहे.

त्याला तपस्व्यांचं उपवास-त्याग समाधान देत नाहीत, तसंच संपत्ती, भोग नि सुंदर गणिकेकडेही त्याचं मन राहत नाही.

शेवटी या सर्व निराशेतून तो एका नदीकाठ गाठतो नि तेथूनच त्याचं खरं ऐकणं, समजणं, अनुभवनं सुरू होतं. तो नदी ऐकायला शिकतो, तिच्यातून जीवन शिकतो, स्वतःमध्ये प्रेमाचा आत्मा शोधतो नि मानवी वेगळेपण स्वीकारतो.

अखेरीस, सिद्धार्थ पूर्ण जीवनाचं आकलन करतो नि आत्मिक आनंद आणि सर्वोच्च समजुतीची अवस्था प्राप्त करतो.

ही कादंबरी कोणाचा शिष्य होण्यापेक्षा स्वयंशिक्षणाची मोठी पुरस्कर्ती आहे. “तुम्हाला शहाणपण मिळवायचं असेल, तर तुमच्या दुःखाचा वाटा तुम्हालाच उचलावा लागतो” या मूलभूत बौद्ध तत्त्वावर ती ठामपणे उभी आहे.
ज्ञान दिलं जाऊ शकतं, सामायिक होऊ शकतं पण शहाणपण इतरांना देता येत नाही.

हे सगळे अत्यंत महत्त्वाचे धडे या कादंबरीनं दिलेत.❤️🌼

©️Bookish Moin ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼