जग बदलणारे ग्रंथ ...❤️💜
हे दीपा देशमुख मॅम यांनी लिहिलेलं हे अप्रतिम पुस्तक मी प्रकाशित होताच वाचलं होतं नि तेव्हा मॅमला एक छोटसं पत्र लिहून माझी प्रतिक्रिया दिली होती.तेव्हापासून मला याबद्दल एकदा विस्तृत लिहायचं होतं त्यामुळे अखेर आज मी शब्द याबद्दल लिहितोय...❤️
हे एक अप्रतिम पुस्तक आहे, ज्यामध्ये लेखिकेने जगाच्या इतिहासात क्रांती घडवणाऱ्या 50 ग्रंथांचा परिचय करून दिला आहे. हे पुस्तक वाचताना मला एक वेगळाच आनंद मिळाला. माझ्या वाचनाच्या विचारांमध्ये यामुळे खूप बदल झाला. पुस्तकाची सुरुवात लेखिकेच्या मनोगताने होते, जिथे त्या वाचनाचं महत्त्व नि ग्रंथांचं आयुष्यातलं स्थान सांगतात. त्यांचे शब्द इतके प्रभावी आहेत की, वाचकाला पहिल्याच पानापासून या प्रवासात सामील व्हावंसं वाटतं. प्रत्येक ग्रंथाची कहाणी, त्याचा इतिहास नि त्याने समाजावर काय परिणाम केला हे सगळं वाचताना आपण त्या काळात, त्या विचारांमध्ये हरवून जातो.
मला हे पुस्तक वाचताना जणू एका मोठ्या ज्ञानसागरात पोहायला मिळाल्यासारखं वाटलं. हे पुस्तक माणसाच्या विचारांना नि स्वप्नांना सलाम करतं, कारण यातले ग्रंथ फक्त कागदावरचे शब्द नाहीत, तर ते माणुसकीला नवं वळण देणारे सुद्धा आहेत.हे पुस्तक केवळ माहितीचं भांडार नाही, तर ते माणसाच्या विचारसरणीला नि समाजाला बदलणाऱ्या कल्पनांचा उत्सव आहे. दीपा देशमुख यांनी 50 ग्रंथ निवडले, जे वेगवेगळ्या काळात आणि देशांत लिहिले गेले. यात भारतीय ग्रंथांपासून जसं की भगवद्गीता, त्रिपिटक, कामसूत्र, अर्थशास्त्र, गीतांजली नि सत्याचे प्रयोग ते आंतरराष्ट्रीय ग्रंथांपर्यंत जसं की द सेकंड सेक्स , सायलेंट स्प्रिंग नि द फेमिनाईन मिस्टिक सर्वांचा समावेश आहे. प्रत्येक ग्रंथाची ओळख इतक्या सोप्या नि मनाला भिडणाऱ्या भाषेत आहे की, नवखा वाचकही त्यात रमुन जातो.
मानवतावादी नजरेतून बघितलं तर, हे पुस्तक माणसाच्या मूलभूत प्रश्नांना नि त्याच्या प्रगतीच्या लढ्याला उजागर करतं. उदाहरणार्थ, अर्थशास्त्र मध्ये कौटिल्याने सरकारने कर गोळा करताना मधमाशीसारखं वागावं, असं सांगितलं आहे जसं मधमाशी फुलाला इजा न करता मध घेते. हे उदाहरण मला खूप आवडलं, कारण यातून शासन नि समाज यांच्यातील संतुलनाची मानवतावादी दृष्टी दिसते. प्रत्येक ग्रंथ माणसाच्या विचारांना कसं प्रेरित करतो, समाजाला कसा बदलतो नि त्यातून माणुसकी कशी बहरते, हे पुस्तक दाखवतं.
दीपा देशमुख मॅम यांनी प्रत्येक ग्रंथाचा परिचय देताना त्याची पार्श्वभूमी, लेखकाचं जीवन नि त्या ग्रंथाचा समाजावर झालेला प्रभाव विस्तृत सांगितलं आहे. उदा, सेपियन्स या युवाल नोवा हरारी सरांच्या पुस्तकाचा परिचय वाचताना त्यांच्या जीवनशैलीबद्दल नि विचारसरणीचं मूळ कसं तयार झालं, याची माहिती मिळते. ही माहिती फक्त पुस्तकापुरती मर्यादित नाही, तर ती वाचकाला त्या विषयात रस निर्माण करते. लेखिकेची भाषा इतकी सहज अन् सोपी आहे की, जणू त्या आपल्याशी गप्पा मारत आहेत. प्रत्येक ग्रंथाची कहाणी सांगताना त्या त्या काळात घेऊन जातात. मला बापूच्या सत्याचे प्रयोग बद्दल वाचताना गांधीजींच्या साध्या पण खोल विचारांचा परिणाम पुन्हा जाणवला. लेखिकेने ग्रंथांचं निवडक संकलन केलं आहे, ज्यामुळे वाचकाला इतिहास, तत्त्वज्ञान, विज्ञान व सामाजिक बदल यांचा एक सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
हे पुस्तक वाचकाला वेगवेगळ्या विषयांबद्दल जिज्ञासा निर्माण करते. मला द सेकंड सेक्स बद्दल वाचताना सिमोन द बोव्हुआर मॅम यांच्या स्त्रीवादी विचारांनी खूप प्रभावित केलं. हे पुस्तक दाखवतं की प्रत्येक ग्रंथाने माणसाच्या विचारांना कसं स्वातंत्र्य दिलं, समाजातल्या अन्यायाला कसं आव्हान दिलं नि माणुसकीला कसं समृद्ध केलं. हे वाचताना मला अनेक नवीन ग्रंथांबद्दल जाणून घ्यायची इच्छा झाली, नि त्यापैकी काही मी तेव्हाच वाचायलाही सुरुवात केली होती नि आजपर्यंत बरीच वाचली सुद्धा.
हे पुस्तक वाचताना मला जणू एका नव्या विश्वात प्रवेश मिळाला. प्रत्येक ग्रंथाची कहाणी मला नवीन विचार नि प्रेरणा देत गेली. उदा- गीतांजली बद्दल वाचताना गुरुजी रवींद्रनाथ टागोर यांचा मानवतावादी दृष्टिकोन नि त्यांची कविता यांचा प्रभाव मला खूप जाणवला. हे पुस्तक माझ्या वाचनाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरलं. याने मला फक्त माहितीच नाही दिली, तर माझ्या विचारांना एक नवीन दिशा सुद्धा दिली. मला आता या सर्वच ग्रंथांना स्वतः वाचायची नि त्यांचा खोलवर अभ्यास करायची इच्छा आहे.
‘जग बदलणारे ग्रंथ’ हे पुस्तक प्रत्येक वाचनप्रेमी माणसासाठी एक खजिना आहे. दीपा देशमुख यांनी 50 ग्रंथांमधून माणसाच्या विचारसरणीचा नि समाजाच्या प्रगतीचा एक सुंदर प्रवास मांडला आहे. यातून मला अनेक नवीन ग्रंथांबद्दल माहिती मिळाली नि माझी वाचनाची भूक आणखी कितीतरी पटीने वाढली आहे. हे पुस्तक फक्त ज्ञानच नाही देत, तर आपल्या मनाला नि विचारांना नवीन उंचीवर घेऊन जातं. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल किंवा जगाला बदलणाऱ्या विचारांबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा एवढं नक्की...❤️💜
©️ Bookish Moin 🌼
भाई आपल हे अनुभव फार महत्त्वाचे काम करतात. माझ्यासारख्या बऱ्याच जणांना अशी पुस्तक वाचायला प्रेरित करतात.धन्यवाद
उत्तर द्याहटवा