वपुर्झा....🌼❤️

व.पु. काळे यांचं हे पुस्तक हातात घेतलं नि वाचताना मला जणू आयुष्याच्या रंगीबेरंगी सुगंधांनी भरलेल्या अत्तराच्या कुपीत हरवून गेल्यासारखं वाटलं. ही 258 पृष्ठसंख्या असलेली ललित लेखसंग्रहाची कादंबरी एक सुंदर अनुभव आहे जिथे आपण माणसाच्या साध्या पण खोल भावनांमध्ये, त्याच्या रोजच्या जगण्यातल्या सुख-दु:खात नि विचारांच्या लाटांमध्ये गुंतत जातो.

व.पु. चं लेखन इतकं हृदयाला भिडणारं अन् सहज आहे की त्यांच्या शब्दांनी मला माणुसकीचा, प्रेमाचा नि आयुष्याचा खरा सुगंध जाणवला. त्यांनी शब्दांतून जीवनातल्या छोट्या छोट्या क्षणांचा असा खजिना उलगडलाय की मी वाचता वाचता त्या भावविश्वात रमलो.‘वपुर्झा’ ही कोण्या कथा-कहाणी वगैरेचं पुस्तक नाही, तर व.पु. यांच्या लघुकथा, ललित लेख नि वैचारिक तुकड्यांचा संगम आहे, जो माणसाच्या नात्यांचा नाजूकपणा, त्यातली गुंतागुंत अन् आयुष्याची साधी सत्यं उलगडतो. 

व.पु. म्हणतात, “कोणतंही पान उघडा आणि वाचा, ‘वपुर्झा’ हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी ” हे वाक्य मला खूप आवडलं, कारण खरंच यातील प्रत्येक लेख जणू एका वेगळ्या अत्तरासारखा आहे.आपला जेव्हा मूड असेल तेव्हा पान उघडतो नि त्यातला सुगंध आपलं मन भरून टाकतो. 

मला यातील एक वाक्य फार आवडलं, ते म्हणजे “स्वतःकडे पाहणं सर्वात अवघड! ह्याचं कारण त्या पाहण्यात काही लपत नाही...” हे वाक्य मला खूप खरं वाटलं, कारण स्वतःला समजून घेण्याची खरी लढाई किती अवघड आहे हे त्यातून जाणवलं. व.पु. यांनी या संग्रहात रोजच्या आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना खूप मोठं केलंय. उदाहरणार्थ, ते म्हणतात, “जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही...” हे वाक्य मला खूप जवळचं वाटलं, कारण नात्यांमधली ही अनिश्चितता आपण सगळेच कधी ना कधी अनुभवतो.

तसंच, “प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे. तो रक्तात असावा लागतो” हे वाक्य मला खूपच विचार करायला लावणारं वाटलं, कारण खरंच प्रामाणिकपणं मनातून येतं, ते शिकवलं जाऊ शकत नाही. मला त्यांचं निरीक्षण खूप जास्त आवडलं, विशेषतः जेथे ते म्हणतात, “फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो...” कारण आपण कितीदा भाबड्या माणसांचा फायदा घेतला जाताना पाहत आलोय.व.पु. यांनी प्रत्येक लेखात आयुष्याला एक नवा अर्थ दिलाय. त्यांचं लेखन इतकं सोपं अन् हलकं आहे की आपल्याला वाटतं हे सगळं आपल्याच मनातलं आहे.

मला आतून खूप भावलं ते त्यांचं अत्तराच्या बाटलीचं रूपक “जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं.” हा विचार मला भारी वाटला, कारण ‘वपुर्झा’ खरंच असंच आहे. आपण कधीही कोणतंही पान उघडलं तरी त्यातला सुगंध आपलं मन मोहून टाकतो. हे पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण करायचं नाही तर कायम सोबत ठेवण्यासारखं आहे.🌼

नक्की वाचा ...🌼❤️

©️ Moin Humanist 🌼

हे पुस्तक कोठे मिळेल :- 

हे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी We Read ला संपर्क करू शकता.
https://wa.me/9518398168 या लिंकवर क्लिक करून पुस्तकाचं नाव नि आपला पत्ता पाठवा...🌼

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼