फकिरा ♥️
काही दिवसांपूर्वी 'अण्णाभाऊ साठे'यांच्या अजरामर लेखणीतून निर्माण झालेली 'फकिरा'ही कादंबरी चौथ्यांदा वाचून पूर्ण केली नि त्या कादंबरीचाच एक भाग झालो.ही कादंबरी मी वाचली नाही तर अक्षरशः जगून नि अनुभवून आलो.अण्णाभाऊ नि त्यांच्या लिखाणाला खरंच तोड नाही.'वाचावं नि फक्त वाचतचं जावं असं अफाट साहित्य त्यांनी मराठी साहित्याला दिलं आहे जे वर्षानुवर्षे वाचकांच्या हृदयात फिट्ट असेल.
35 कादंबऱ्या,13 कथासंग्रह,8 पटकथा,1 प्रवासवर्णन,3 नाटके,10 पोवाडे व 14 लोकनाट्ये आणि 12 उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ दर्जेदार लिखाण करून आपल्या समाजाला आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे.आपल्या साहित्यातून त्यांनी उपेक्षित समाजाचं संघर्षमय जीवन वाचकांसमोर मांडला असून पावलोपावली शोषणाविरुद्ध आवाज त्यांनी उठवला आहे.
फकिरा ही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली अप्रतिम अशी कादंबरी आहे.'1959 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला 1961 मध्ये 'महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार' मिळाला असून अण्णाभाऊंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंझार लेखणीस' ही कादंबरी अर्पण केली आहे. वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना लाभलेल्या या कादंबरीच्या वाचनाची वाचकांची ओढ 64 वर्षांनंतर सुद्धा कमी झालेली नाही यातच या कादंबरीचं महत्व अधोरेखित होतं.
एक उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी ही एक महत्वपूर्ण कादंबरी आहे जी प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवी.'फकिरा वाचून त्यातून बरंच काही शिकून नि नैतिकता,प्रेम,आपुलकी,सहानुभूती ,स्वाभिमान व माणुसकीचे धडे घेऊन परत यावे असं मला वाटतं.!
या कादंबरीत अण्णाभाऊंनी फकिरा नामक वीर तरुणाचे कथानक मांडले आहे.'जो कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाही.'माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या व
ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या या तरुणाची शौर्यगाथा सांगणारी नि माणुसकीचे दर्शन घडवणारी ही उत्कृष्ट अशी एक कादंबरी आहे.'जी आपल्या हृदयाचा ठाव घेऊन सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला गुंतवून ठेवण्याचा काम करते.'जणू यातील कथानक आपल्या डोळ्यांसमोर घडतोय की काय असं भास आपल्याला होतो.
आपल्या मनोगतात अण्णाभाऊ म्हणतात :-
ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही. प्रतिभेला सत्याचे - जीवनाचे दर्शन नसेल, तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत, असा माझा अनुभव आहे. सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणे शक्य नाही.
हा ‘फकिरा’ही माझा होता. जे पाहिले, अनुभवले, ऐकले तेच मी लिहिले आहे. त्यातून हा फकिरा निर्माण झाला आहे.♥️
खरोखर ! अण्णांनी जे आजूबाजूला पाहिले, अनुभवले नि ऐकले तेच त्यांनी आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.'सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते.हे त्यांच्या विविध साहित्यातून अधोरेखित होते.
फकिराच्या कथानकाबद्दल मी जाणून बुजून जास्त काही लिहिणार नाही,कारण आजपर्यंत याबद्दल बरंच काही लिहल्या गेलं आहे',यावर चित्रपट सुद्धा आला आहे.'आतापर्यंत अनेकांनी ही कादंबरी वाचली नि अनुभवली आहे.त्यामुळे इथे याबद्दल विस्तृत लिहून मला आतापर्यंत न वाचलेल्या वाचकांना कुठलीही पूर्वकल्पना द्यायची नाही.'मला वाटतं प्रत्येकाने या कादंबरीचा कथानक या कादंबरीतून वाचाव नि अनुभवावं...!🌿✅
©️Moin Humanist✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा