अंतिम अरण्य ♥️

निर्मल वर्मा लिखित 'अंतिम अरण्य'ही हिंदी भाषिक कादंबरी काही दिवसांपूर्वी वाचून पूर्ण केली.एका वेगळ्याच विश्वात जाऊन आल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.यातील कथानक आणि पात्रांनी मला त्यांच्या प्रेमात पाडायचं काम केलं.कळतं/नकळतपणे या कादंबरीने खूप काही शिकवलं.आजूबाजूला बघण्याची एक नवीन दृष्टी दिली.यातील काही संवादाने हृदयात घर केलं,तर अनेकवेळा मला अंतर्मुख करायचं काम सुद्धा केलं.वाचत असताना मी पूर्णपणे यामध्ये गुंतून गेलो होतो. यातील पात्रांशी एकरूप झालो होतो.हे कथानक जणू माझ्यासमोरच घडतोय असं मला वाटतं होतं.एकंदरीत यातील प्रत्येक पात्र माझ्याआजूबाजूला मला वावरताना दिसतं होतं.मी आतापर्यंत वाचलेल्या काही मोजक्या कादंबऱ्यापैकी एक उत्कृष्ट अशी कादंबरी वाचल्याची प्रचिती मला आली.


'सोनी लिव्ह'वरील 'निर्मल पाठक की घर वापसी'या वेबसिरीज मधून मला ह्याबद्दल कल्पना मिळाली होती.तेव्हापासुन मी ही कादंबरी वाचण्यासाठी कमालीचा उत्सुक होतो.'निर्मल वर्मा सरांची ही शेवटची आणि त्यांच्या इतर कादंबऱ्यापैकी उजवी असलेली ही कादंबरी फार अप्रतिम अशी आहे.जी प्रत्येक वाचकाने एकदा तरी नक्कीच वाचायला आणि अनुभवायला हवी.'अंतिम अरण्याचा'हा प्रवास एकदा नक्कीच करून यायला हवं असं मला वाटतं.ही कथा फारशी गुंतागुंतीची अजिबात नाही.ही कथा एका काल्पनिक गावाची आहे, टेकड्यांवर वसलेल्या एका सुंदर गावाची, जिथे काळ थांबला आहे.यामध्ये सर्वत्र सुंदर देवदार, ओक झाडे असलेल्या डोंगराळ गावाच्या नैसर्गिक सौंदर्याचे अभूतपूर्व वर्णन आहे.येथे दूरवर हिरवळ आणि शांतता पसरलेली आहे. कथेतील सर्व पात्रे कुठेतरी हरवलेले दिवस घालवत आहेत.हे एक असे गाव आहे जिथे प्रत्येकजण आपल्या भूतकाळापासून दूर गेलेला आहे आणि ते पुन्हा परत येण्याची कोणतीही शक्यता सुद्धा नाही.

कादंबरीतील मुख्य 'नायक' आपल्या भूतकाळातील अपयश विसरण्यासाठी, "स्टेट्समन" वर्तमानपत्रातील एक नोकरीची जाहिरात वाचून या डोंगराळ गावात पोहोचतो.त्याला आयुष्यातील एक वेगळीच स्तब्धता इथे पहायला मिळते.कधी कंटाळवाणा वाटणारी शांतता,कधी अतिशय प्रिय वाटतं असते.या कादंबरीची संपूर्ण कथा मृत्यूभोवती फिरते. मेहरासाहेब त्यांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत. कथेतील सर्व पात्रे त्यांच्या भूतकाळातील आणि वर्तमानाच्या प्रवासात कोणत्या ना कोणत्या एका विशिष्ट टप्प्यावर आहेत. जगताना लेखक स्वतःचे दु:ख विसरतो.या सगळ्यामध्ये तो आपल्या दृष्टिकोनातून जीवनाचा नवा अर्थ शोधत असतो.मृत्यूची वाट पाहणाऱ्या माणसाचे जीवन काय असते आणि मृत्यूनंतर आपले काय होते, या दोन्ही गोष्टी लेखकाने आपल्या चमत्कारिक भाषेत सुंदरपणे टिपल्या आहेत.ही कादंबरी या जग आणि जगाचे कृत्रिम अनुभव, सत्य आणि रहस्ये यांच्याशी लढणारी आणि मानवी मनाच्या मुक्तीच्या प्रश्नांचा शोध घेणारी अत्यंत महत्त्वाची कादंबरी आहे. शेवटच्या अरण्याची ही कहाणी तिथलीही नाही आणि इथलीही नाही, पण इथं आणि तिकडच्या जीवनाचा अर्थ शोधते ज्यामध्ये आधुनिक माणसाला त्याचा अर्थ सापडतो.♥️

नक्की नक्की वाचा....♥️

©️Moin Humanist♥️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼