कंट्या 💙
काल गणेश बर्गे सरांची नवी कोरी कादंबरी कंट्या हातात आली आणि कितीतरी दिवसांनी असलेली उत्सुकता संपली.कारण जेव्हा पासून शिरसवाडी वाचून पूर्ण केली होती तेव्हापासूनचं गणेश सरांच्या लिखाणाच्या प्रेमात पडलो होतो. आता आतुरता होती ती सरांच्या नवीन पुस्तकाची.जेव्हा पासून समजलं होतं की कंट्या नामक नवीन कादंबरी येत आहे तेव्हापासून कंट्याची उत्सुकता होतीच.कारण गणेश बर्गे हा लेखक मातीशी नाळ जुडवून ठेवलेला आहे.तो प्रत्येकाला आपला वाटतो.त्याच्या लिखाणात आपलं प्रतिबिंब कोठेतरी बघायला मिळतो.त्यांच्या लिखाणात कोठेही अति जाणवत नाही किंवा ते फेक वाटतं नाही.त्यांनी जगलेलं, अनुभवलेलं आपल्या लिखाणात उतरवलेलं असतं.जे बघितलं,अनुभवलं तेच लिहलं असा सोप्पा नियम या लेखकाचा असतो.या कादंबरीत सुद्धा ट्रक,ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्या अवतीभोवतीचं जग आणि यांच जगणं लेखकांनी खूपच शानदार पद्धतीने रंगवलं आहे.कारण त्यांनी काही वर्षे हा जीवन स्वतः अनुभवलेला होता.एकदम Down To Earth राहून प्रेमाने पुस्तक वाचल्याची विचारपूस करणारा आणि पुस्तक आवडलं नाही तर पैसे परत करणारा हा शेतकरी लेखक खरंच निराळाच म्हणावा लागेल..❤️
तर अखेर उत्सुकता काल समाप्त झाली.
तसं तर प्रकाशित होण्याआधीचं मला ही कादंबरीची पीडीएफ फाईल वाचायला मिळाली होती.आजपर्यंत कधीही कोणतेही पुस्तक पीडीएफ मध्ये वाचलेलं नाही पण कंट्या त्याला अपवाद ठरलं. पीडीएफ चा आणि माझा 36 चा आकडा असून सुद्धा मी कंट्या कादंबरी पीडीएफ मध्ये वाचून काढली होती. पण जोपर्यंत हातात घेऊन पुस्तक वाचत नाही,त्याला स्पर्श करत नाही,त्या पुस्तकाच्या पानाचा सुगंध घेत नाही तोपर्यंत पुस्तक वाचलं,अनुभवलं आणि मुळात ते पुस्तकं मी जगलो असं मला वाटतं नाही.त्यामुळे परत एकदा वाचन आलंच. काल मिळाल्या मिळाल्या सुरुवात केली आणि काहीच तासांत संपवलं सुद्धा.पुन्हा काही नवीन आयाम समजले मुळात उमजले.कंट्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावता आले. तो हृदयविदारक प्रवास पुन्हा अनुभवता आला.आधीपेक्षा जास्त कोठेतरी Touch या वेळेस जाणवलं.आधीच उष्टं वाचल्यानंतर उदास होतो,विचारांच्या चक्रात बुडालेलो असताना कंट्या वाचून पुन्हा डिप मध्ये गेलो.आता सुद्धा त्याच विश्वात मी एकंदरीत वावरतोय.
एकूण पुन्हा एकदा सुन्न झालो..☹️
कंट्या ही कहाणी आहे एका गावातील शाळकरी मुलाची.जो जेव्हा आईच्या दुधावर होता तेव्हाच तिची आई कोणासोबत तरी घरातून पळून गेलेली होती.तेव्हापासून कंट्याचं पालन पोषण त्याच्या वृद्ध आजी आजोबांनी केलं होतं.बाप होता पण तो नसल्यातच जमा होता.आता एखाद्या गावातील मायबाप नसलेल्या आणि आयुष्यात कोणाचाही धाक-संस्कार नसलेला मुलगा ज्याप्रमाणे वाढतो त्याचप्रमाणे कंट्या आतापर्यंत वाढलेला होता आणि वाढत असतो. मनमौजी,निडर,लोफर,अवकाळी,टुकार,बिलंदर इत्यादी कितीतरी बिरुदे आपण कंट्याला लावू शकतो.तर अश्या या कंट्या,त्याचं आयुष्य,छोटस गाव आणि त्याच्या शाळेच्या अवतीभोवती फिरणारी ही एक मनोरंजक आणि तेवढीच हृदयविदारक कथा आहे.कंट्याच्या जीवनात आलेले वेगवेगळे प्रसंग आणि त्या प्रसंगामुळे वेगळं वळण घेत असलेल्या कंट्याच्या आयुष्याची कहाणी आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळते.जी वाचून आपण सुन्न झाल्याशिवाय राहत नाही.वाचून पूर्ण केल्यानंतर विचारांच्या चक्रात गुंतून जातो.कितीतरी दिवस कंट्याची ही कहाणी आपल्या स्मरणातुन जाता जात नाही.यातील काही प्रसंग वाचत असताना अंगावर काटा येतो तर काही प्रसंग वाचताना हमसून हमसून रडायला येतं.अनपेक्षितपणे वाचता वाचता अश्रूने डोळे कधी पाणावतात हे वाचकाला सुद्धा कळतं नाही.काल्पनिक असून सुद्धा ही कादंबरी आपल्याला खूप जवळची वाटते.कंट्या असो किंवा यातील इतर पात्र आपण कोठेतरी बघितले आहेत असं आपल्याला शेवटपर्यंत वाटतं राहतं.छोट्या छोटया गोष्टीचं वर्णन लेखकांनी ज्या पद्धतीने केलं आहे ते खरंच अफलातून आहे जे आपल्याला जणू तेथे प्रत्यक्षात असल्याचा भासवते.
कंट्याच शालेय जीवन त्या जीवनात त्याच्या आयुष्यात येणारी त्याची प्रेयसी "मीरा" .या प्रेयसीमुळे त्याच्या आयुष्यात होणारे बदल.आणि पुढे सर्वकाही ठीक सुरू असताना आयुष्याला लागलेले अनपेक्षित संघर्षमय वळण जे वाचत असताना वाचकाला धक्का बसतो.
शौर्यपुरस्कार ते चौर्यपुरस्कार पर्यंतच कंट्याच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी.असंख्य प्रश्न मनात असताना फक्त शेवटी काहीच पृष्ठात कादंबरीने घेतलेले अनपेक्षित वळण हे फारच धक्कायदायक ठरते.या शेवटच्या काहीच पृष्ठात आपल्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळून जातात आणि येथे कंट्या या अप्रतिम कादंबरीचा प्रवास समाप्त होतो.
जो वाचकांना मात्र सुन्न करून सोडतो..
कंट्या कादंबरीत एकंदरीत सर्वकाही आहे.हास्य,विनोद,मनोरंजन, दुःख,दर्द,पीडा,प्रेम,मैत्री,आपुलकी,जात वास्तव,भेदभाव,लैंगिक शोषण आणि वेश्याचे जीवन.इत्यादी काही भावना वेगवेगळ्या प्रसंगात आपल्याला वाचताना जाणवत राहतात.काही प्रसंग वाचकाला हसवतात तर काही रडवतात तर काही डोकं सुन्न करून विचार करायला भाग पाडतात.कंट्याचा प्रवास सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वाचकाला एका जागी खिळवून ठेवतो.कोठेही बोअर न करता वाचकाला गुंतवून ठेवण्यात ही कादंबरी कमालीची यशस्वी होते.यामध्ये ग्रामीण भागातील भाषा वापरलेली असल्याने यातील कोणताही प्रसंग ओढून ताणून तयार केलेला जाणवतं नाही.किंवा तो फेक वाटतं नाही.पृष्ठसंख्या वाढवायची म्हणून कोणताही प्रसंग गरज नसताना वाढवलेला यामध्ये दिसतं नाही.काही योग्य त्या ठिकाणी काही ग्रामीण शिव्यांचा वापर केलेला असल्याने ही कादंबरी जिवंत वाटते.असंख्य माझ्या सारख्या ग्रामीण भागातील व गावांशी नाळ जुडवून ठेवलेल्या वाचकांना ही कादंबरी रिलेट होते.आणि शेवटी बॅक पृष्ठावर प्रकाश कोयाडे सरांनी लिहिलेलं ते आपल्याला तंतोतंत पटून जाते..
ते लिहितात :-
माईलस्टोन वगैरे म्हणणार नाही पण ' कंट्या ' हा एक दगड आहे जो आपल्या प्रत्येकाच्या वाटेत कुठे ना कुठे येतोच ! कधी इतका मऊ की त्यावरून पाय घसरेल तर कधी त्याच्या अणकुचीदार टोकाने पाय रक्तबंबाळ होईल ... असा हा कंट्या ! तोच नायक आहे , तोच खलनायक आहे . बिलंदर एवढा की सायकलवर ड्रायव्हर ठेवणारा हा पहिलाच माणूस असेल . या कहाणीला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे , एखाधा मराठी चित्रपटासारखा ...त्याच्या मध्यांतरात आपल्या प्रत्येकाला स्वतःमधला कंट्या शोधायचा आहे ! मराठी साहित्य क्षेत्रातून आजवर काहीतरी निसटून गेलं होतं जे लेखक श्री गणेश बर्गे यांना या कादंबरीच्या निमित्ताने सापडलं आहे..🙂
नक्की वाचा ❤️
©️Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा