रारंग ढांग 💙
काही दिवसांपूर्वी प्रभाकर पेंढारकर सर लिखित 168 पृष्ठ संख्या असलेली ही कादंबरी वाचण्यात आली.1981 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीबद्दल अनेक वेळा अनेक जणांकडून ऐकलं होतं तर याबद्दल खूप काही वाचलं सुद्धा होतं. त्यामुळे एकदा फायनली वाचून अनुभव घ्यावा म्हटलं आणि वाचून पूर्ण केलीच.आणि आज माझा अनुभव शेअर करतोय.एकंदरीत ही कादंबरी वाचून झाल्यावर एका सुंदर प्रवासावरून आल्याचा आनंद मला मिळाला.या कादंबरीची थीम आणि कथानक भन्नाट आणि खिळवून ठेवणारं असून उत्कंठा वाढवणारं आहे.एकदा हातात घेतल्यावर वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवताच येणारं नाही या धातनीतील ही कादंबरी.खूप काही शिकवणारी व आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारी ही कादंबरी आहे.अनेक बाबीवर विचार करायला भाग पाडणारी आणि सैनिक म्हणून काम करताना किती वेगवेगळी मानसिक आव्हानं पेलावी लागतात याची जाणीव करून देणारी ही एक सुंदर कादंबरी आहे.
या कादंबरीची कथा,यातील पात्र आणि प्रसंगाचे केलेले वर्णन सर्वकाही फारच अप्रतिम जमून आलं आहे.कादंबरीत एक सुद्धा चित्र नसताना सर्वकाही कथानक आपल्या डोळ्यासमोर घडतोय असा भास आपल्याला होतो.वाचत असताना आपण हिमालयात वावरू लागतो.यातील प्रत्येक घटना आणि पात्र आपल्याला रिलेट होत जाते. एकंदरीत आपण सुद्धा या कादंबरीचा एक हिस्सा होऊन जातो हे आपल्याला सुद्धा कळतं नाही.या सर्व कारणाने ही कादंबरी फार वाचनीय बनते.या कादंबरीतील प्रवासात आपल्याला अनेक स्वभाववैशिष्ट्ये असलेली माणसे भेटतात. प्रत्येकाची कहाणी वेगळी असते.यांच्यापासून वेगळं काही तरी शिकायला मिळतं असतं.मेजर बंबा ,कॅप्टन मिनू खंबाटा,कर्नल राईट, सर्जेराव गायकवाड,विश्वनाथची मैत्रीण उमा,कॅप्टन नायर आणि विश्वनाथ मेहंदळे इत्यादी.ही पात्रे आपल्या समोर वावरताना आपल्याला दिसतं असतात.कथेमध्ये अनेक वळणावर मिळणारे अनपेक्षित धक्के, प्रत्येक प्रसंगाचं, माणसाच्या स्वभावाचं केलेलं अप्रतिम वर्णन, आणि उत्कृष्ट वाक्यासंपदा कादंबरी संपेपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते..
"बॉर्डर रोड ऑर्गनयझेशन हिमालयात ज्या उंचीवर रस्ते बांधत असते, त्या उंचीवर जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशाने कचितच रस्ते बांधले असतील . माणसांना आणि यंत्रांना थकवणारी ही उंची , विरळ ऑक्सिजन , लहरी निसर्ग , विलक्षण थंडी , हिवाळ्यात रस्त्यावर साठणारे सत्तरऐशी फूट बर्फ , अकल्पित लँडस्लाइड्स आणि ह्या सर्वांचा मानवी मनावर होणारा परिणाम -ह्या त्यातल्या काही प्रमुख अडचणी आहेत.
ह्या रस्ताबांधणीतील सर्वांत अवघड भाग हा उभ्या कड्यामधून रस्ता खोदून काढण्याचा.ह्या नितळ,उभ्या कड्यांना स्थानिक भाषेत #ढांग म्हणतात . एका बाजूला हिमालय व लहरी निसर्ग , दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसे ! निसर्गात आणि माणसांत जशी येथे रस्सीखेच व संघर्ष , तसाच प्रसंगी माणसामाणसातही.मुंबईतील एका मोठ्या कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून विश्वनाथ सारखा एक महत्त्वाकांक्षी तरुण इंजिनियर. हा अत्यंत हुशार, बेधडक काम करण्याची वृत्ती, निडर तितकाच हळवा, दुसऱ्याचे दु:ख समजुन मदत करणारा तरुण.हिमालयातील दुर्गम भागात रस्ते बांधणीच्या कामासाठी लष्करातील रस्ते बांधणी विभागात नोकरीवर रुजू होतो. त्याची‘रारंग ढांग’ प्रोजेक्टवर नेमणूक होते. आणि मग सुरु होतो एक संघर्ष .आणि या संघर्षाची ही रोमांचक कथा आहे..माणूस विरुद्ध निसर्ग, माणूस विरुद्ध माणूस आणि माणूस विरुद्ध तो स्वतः असा हा संघर्ष अखंड चालू राहिला आहे. ह्या संघर्षाचा एक सुंदर पैलू लेखक ह्या कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडतात.त्यामुळे हे संघर्षाचे वेगवेगळे पैलू जाणून घेण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचावी.
बाकी यातील काही संवाद आणि वाक्य मनात घर करून जाणारे आहेत..💙
उदाहरण मला प्रचंड आवडलेली वाक्ये :-
1)जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रह जाता है?” राहते ती फक्त ‘यादगारी’
2)आपल्या देशात माणसाच्या वेळेला किंमत नाही. आणि त्या पलीकड त्याच्या जीवनाला !"
3)दोस्त, आता खरोखरच चढली. आता ओठांवर शब्द येतात ते डोक्यातून नाही. इथून, हृदयातून ! विशू, जीवन हे जगण्यासाठी आहे. खऱ्या अर्थाने जग. लुटता येईल तेवढा आनंद लूट. देता येईल तेवढ दोन्ही हातानी दे,आजच! उद्याच कुणाला माहित? ह्या रंगमंचावर प्रत्येकालाच एक दिवस पडद्याआड जायचं आहे! आणि ह्या बॉर्डर रोडवर तो दिवस कोणत्याही क्षणी उगवण्याची शक्यता असते…
4)अधिकार हे माणसाला पंखांसारखे उंच घेऊन जाणारे असावेत.
5)थकव्यासारखी उशी नाही.श्रमासारखी गादी नाही.दमलेल्या,श्रमलेल्या माणसांची झोप किती गाढ असते !कसली हालचाल नाही की अस्वस्थ तळमळ नाही.ही निद्रा त्यांच्याभोवती हलकेच एक गहिरं आवरण निर्माण करते.पोखरणा-या काळज्या,जाळणा-या चिंता ती त्यांच्या आसपास फिरकू देत नाही.ही गाढ झोप गरिबांची संपत्ती..कोणत्याही जोखडापासून ही तात्पुरती मुक्तीच !
जगात आधुनिक विज्ञानानं अनेक शोध लावले आहेत.पैसे मोजले की सुरेख वेष्टनामध्ये बांधून हव्या त्या सुखसोयी घरी आणता येतात.बाहेर कडक उष्णता असतांना शय्याघरातलं वातावरण सुखद थंड ठेवता येतं.पण आपल्याला हवी ती स्वप्नं पाहण्याचं साधन अद्याप बाजारात विक्रीला आलेलं नाही.
6)कायदा,शिक्षा,तुरुंगवास ह्यांपेक्षा कितीतरी माणसं गप्प राहण्याचं कारण माणसाला असलेली घरच्यांची काळजी.
7)आयुष्यात कितीतरी गोष्टी काल केल्या नव्हत्या एवढंच कारण त्या आज न करायला पुरेसं नसतं.
8) रस्ता म्हणजे केवळ २ बिंदूंना जोडणारं अंतर नव्हे.ह्या उंचसखल परिसरावर मारलेली ती एक फक्त रेघ नव्हे.सैन्याच्या वाहतुकीची केवळ एक सोय नव्हे.रस्ता ही त्या विभागातल्या आजवर उपेक्षिला गेलेल्या लोकांना सुधारणांशी जोडणारी एक साखळी आहे.प्रगत विज्ञानानं माणसाला जे दिलं आहे ते इथल्या लोकांच्यापर्यंत पोहचवणारं ते एक साधन आहे.रस्त्यानं माणसांच्याबरोबर त्यांचे विचार प्रवास करतात.आशा आणि आकांक्षा,शिक्षण आणि ज्ञानही..
©Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके 💙
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा