हेन्री डेव्हिड थोरो चरित्र आणि निबंध ❤️
दुर्गा भागवत आपल्या‘वॉल्डनकाठी विचारविहार'या पुस्तकात थोरो गुरुजींबद्दल म्हणतात....
थोरो हा मुळी तत्त्वज्ञ नव्हेच, तो आदिम सृष्टीशी तन्मय झालेला गद्यकवी आहे, आदिमतेशी त्याचे सनातन नाते आहे. आदिम अरण्ये, आदिम मानव, आदिम प्रतिमा त्याला प्रिय आहेत. आणि या साऱ्याचे प्रतिबिंब तत्त्वज्ञानाच्या ग्रंथापेक्षा विविध देशांच्या पुराणकथात मिळतात. म्हणून त्याला दैवतकथा अती प्रिय आहेत. थोरोची देवावर श्रद्धा नाही, चर्चवर नाही, समाधी अथवा देवालयांवर नाही, रूढ पुस्तकी ज्ञानावरही नाही. पण मानव आणि सृष्टी यांना मूलभूत सौंदर्यमय, पार्थिव व रहस्यमय संबंध जोडणाऱ्या पुराणकथांचे किंवा दैवतकथांचे त्यांना क्षणभरही विस्मरण होत नाही.थोरो यांनी समाजाला फटकारे मारले असले तरी त्यांनी निग्रोंच्या गुलामगिरीविरुद्ध बंडाचा झेंडा पुकारलेला आहे. सविनय कायदेभंगाचा पुरस्कार केला आहे. महात्मा गांधी यांना त्यांचे विचार प्रेरक आणि मार्गदर्शक वाटले व त्यांनी दक्षिण आफ्रिकेत त्या सत्याग्रहाच्या वेळी सविनय कायदेभंगावरच्या त्याच्या लेखाचा अनुवाद करून समाजाचे लक्ष त्याच्याकडे वेधले. कार्लाईल इमर्सन, व्हिटमन वगैरे विचारवंतांशी थोरो यांचे सख्य होते, पण अनुयायित्व असे त्यांनी कुणाचेच मानलेले नाही, त्यांची प्रतिभा स्वतंत्र होती. त्याचे लेखन अधूनमधून वाचल्यास मनाला नवी टवटवी आल्याशिवाय राहत नाही, हे मात्र खरे. कारण थोरो म्हणजे वारे, सोसाट्याचे वारे, सारा साचलेपण धुवून काढून वातावरण निर्मळ करणारे.
या पेक्षा बेस्ट वर्णन गुरुजीबद्दल कोणीही करू शकणार नाही.
तर वॉल्डनकाठी विचार विहार, केपकॉड नंतर रात्री हे पुस्तक मी पुन्हा एकदा चाळलं.
आतापर्यंत किमान हे पुस्तक ३ वेळा तरी वाचलं असेल.सेम वॉल्डन बाबतीत सुद्धा हेच लागू होत.कारण हेन्री डेव्हीड थोरो हा व्यक्तिमत्त्वचं तसा होता. त्याबद्दल जेवढं वाचावं तेवढं कमीचं आहे.जेवढं वाचावं तेवढं त्याच्या आणि त्याच्या विचारांच्या प्रेमात पडावं हा जणू समीकरणच बनला आहे.थोरो बद्दल वाचावं आणि फक्त वाचतं जावं असा हा अवलिया हृदयात घर करून गेला आहे.वॉल्डन वाचून मी हेन्नी डेव्हिड थोरो या माणसापासून प्रचंड प्रभावित झालो आहे.यांचे विचार वाचून मी एकंदरीत यांच्या प्रेमात बुडालोय. निसर्ग, भन्नाट विचार आणि त्याच्या तत्वज्ञानाने मला भारावून टाकलं आहे.आणि म्हणूनच मी थोरोला- थोरो गुरुजी म्हणतो.
१२ जुलै १८१७ रोजी अमेरिकेतील मसेच्युसेट्स या जिल्ह्यातील कॉकार्ड या तालुक्यात हेन्नी डेव्हिड या निसर्गवेड्या, विचारवंताचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता.त्यांच्या घरात चालत आलेला व्यवसाय शिसपेन्सिली बनवण्याचा असल्याने पुढे हॉवर्ड विद्यापीठातुन पदवी घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी हा व्यवसाय केला. यानंतर एका शाळेत काही काळ नोकरी केली.पण त्यांचा मन तेथे सुद्धा काही रमला नाही.म्हणून त्यांनी ती नोकरी सोडून दिली.पुढे त्यांनी मिळेल ते काम करत करत भटकंती सुरू केली.यासोबत नेहमीच गुलामगिरीच्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली.आपल्या लिखाणातून,कवितेतून त्याबद्दल प्रबोधन केले..गुलामगिरी राबवणाऱ्या सरकारला टॅक्स भरणं हे त्यांना पाठिंबा देणे होय हा विचार करून त्यांनी टॅक्स भरणंच बंद केलं.5/6 वर्षे टॅक्स भरलाच नाही.यामुळे त्यांना तेथील स्थानिक यंत्रणेने तुरुंगात टाकलं.त्यांनी दोन दिवस तुरुंगात काढले.पुढे त्यांनी यावर सिव्हिल डिसओबिडियन्स(सविनय कायदेभंग)नामक लेख लिहिला तो पुढे जगभर गाजला.गांधीजी सह अनेकांनी त्यावरून प्रेरणा घेतली.अवघ्या 43 वर्ष आयुष्य लाभलेल्या या माणसाने संपूर्ण जगाला भुरळ पाडली आहे.थोरोच्या विचारांचा अमीट ठसा असंख्य लोकांच्या मनावर उमटला आहे.त्यांच्या विचारांचे महत्त्व अधिकाधिक सुसंगत ठरत आहेत. थोरोचे ग्रंथ,जर्नल आणि पत्रे यांमधून थोरो गुरुजींनी मांडलेले विचार आजच्या काळात कितीतरी पटीने जास्त परिणामकारक ठरत आहेत. अमेरिकन असून सुद्धा संपूर्ण जगाला आपला वाटणारा असा लेखक,विचारवंत आणि निसर्गवादी पुन्हा होणे नाही.यांचे विचार व तत्वज्ञान वाचून आपण निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.
थोरो गुरुजींच्या लिखाणाचे एकूण 20 खंड आज उपलब्ध आहेत.त्यामध्ये त्यांनी लिहलेली जर्नलही आहेत.ज्यावरून मग पुढे पुस्तके छापण्यात आली. त्यातील काही निबंध आणि वॉल्डन या पुस्तकामुळे थोरो गुरुजी जगप्रसिद्ध झाले.अमेरिकेन असून सुद्धा सम्पूर्ण जगाला आपला वाटणारा हा विचारवंत निराळाच होता.या पुस्तकात थोरो गुरुजींचे संक्षिप्त चरित्र आणि काही निबंध वाचायला मिळतात.यासोबतच महात्मा गांधींवर थोरोंचा प्रभाव कसा पडला व महात्मा गांधींनी थोरोकडून कशी प्रेरणा घेतली होती ? याचा सुद्धा आढावा शेवटच्या प्रकरणात घेण्यात आला आहे.या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण खूप वाचनीय असून जे वाचताना आपण अनुवाद वाचतोय असं अजिबात वाटतं नाही.एवढ्या सुंदर पद्धतीने जयंत कुलकर्णी सरांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.यातील सिव्हील डिसओबिडीअन्स(सविनय कायदेभंग )हा निबंध तर परत परत वाचावा असा आहे.
थोरोचे काही निवडक विचार जे फक्त वाचूनच आपण अंतमूर्ख होतो..❤️
१)मृत्यू अटळ आहे . मला तर वाटते , अमेरिकेत अजून तरी एकही माणूस मृत्यू पावलेला नाही . कारण मृत्यूसाठी अगोदर जगावे लागते . माझा शववाहिकांवर , कफनांवर आणि अंत्यविधींवर विश्वास बसणे कठीण आहे . कारण ही माणसे खऱ्या अर्थाने जगलीच नाहीत . ही माणसे शेणाच्या खतासारखी या जगात हळूहळू कुजत गेली आहेत . यांच्या थडग्यासाठी मानाची जागाही नाही ... कुठेतरी खड्डा खणलाय बस्स .. ! मी बऱ्याच जणांना ते मरणार आहेत असे ढोंग करताना पाहतो किंवा ते मेले आहेत , असेही ऐकतो . शक्यच नाही ! मी त्यांना आव्हान देतो , त्यांनी मरून दाखवावे . मरायला ते जिवंतच नाहीत , तर मरणार कुठून ? मी सांगतो हे असेच कुजत राहतील आणि आपल्याला त्यांच्या जागा साफ करण्याचे काम लावून जातील . माझ्या दृष्टीने जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत फक्त सहा - सात लोक मेले असतील . ' मेमेंटो मोरी ' म्हणजे ' प्रत्येकाला मेलेच पाहिजे ' या अत्यंत महत्त्वाच्या वाक्याचा खरा अर्थ आपल्याला अजून कळलेलाच नाही ...
२)आपले जीवन किती का क्षुद्र असेना? त्याला सामोरे जा आणि ते जगा. त्याच्यापासून तोंड वळवून दूर जाऊ नका; आणि त्याला नांवेही ठेवीत बसू नका. जीवन कसेही असले तरी तें काही तुमच्या आमच्या इतके खचित वाईट असत नाही.
३)गर्दीत मखमली गद्द्यावर बसण्याऐवजी मी भोपळ्यावर एकटाच बसणे पसंत करतो..
४) “व्यस्त राहणे पुरेसे नाही, मुंग्याही व्यस्त राहतात. प्रश्न आहे - आपण कशासाठी व्यस्त आहोत? "
५)नद्या आणि तलाव ही पृथ्वीवरील सर्वात सुंदर आणि मौल्यवान वस्तू आहेत, ही पृथ्वीचे डोळे आहे, ज्याला निसर्गाचे दर्शन होते त्याला त्याची खोली माहित असते.
६)सर्व प्रकारच्या विलासी आणि सुविधांच्या बाबतीत, सर्वात हुशार लोक अधिक साधे जीवन जगतात आणि कमी-अधिक गोष्टींमध्ये काम करतात. ”
७) प्रेमातून सुटका करून घ्यायचीये ? मग अधिक प्रेम करा.
८) हे वन्यसंशोधक बिनडोक असतात. दुर्मीळ जातीचा, निसर्गात अखेरचा राहिलेला पक्षी ते बंदूकीने मारतात आणि पहिल्यांदा रिपोर्ट केल्याचे श्रेय मिळवतात.
९)मला राजवाड्यात ठेवले तर मी मागच्या दाराने लगेच पळून जाईन.
१०)एखादी गोष्ट कायदेशीर असेल तरी ती न्याय्य असेल असं नाही.
११)एखादा माणूस आसपासच्या लोकांशी जमवून घेऊ शकत नसेल तर कदाचित त्याला वेगळं संगीत ऐकू येत असेल.त्याला त्या संगीताच्या दिशेनं जाऊ द्यावं.मग ते किती जवळ वा लांब असेना.
१२)"आजारी पडणं आरोग्यासाठी बरं असतं.
१३)जे सरकार जुलमाने लोकांवर अन्याय करत असेल तर त्या समाजात सज्जन माणसांची एकच जागा असू शकते, ती म्हणजे तुरुंग.
१४)जन्मत: मी जेवढा शहाणा होतो, नंतर तेवढा राहिलो नाही याचे मला फार दु:ख होते.
१५)एखादी संस्कृती मरू घातलेली असते, तेव्हा तिला आपली स्मारके उभी करायची घाई झालेली असते.
१६)मला एकांतवसाईतका छान मित्र अजून मिळाला नाही.सकाळी मला खूप कंपनी असे.विशेष:-बाहेरून कोणी आलं नाही तर !!
१७)कुठलंही सरकार माझ्या विचारांवर माझ्या वागण्यावर अनिर्बंध सत्ता गाजवू शकत नाही.मला मान्य असलेल्या भागावरच मी त्यांना सत्ता गाजवायची परवानगी देईन.
१८)माझ्या इतका मी इतर कुणालाही जर नीटपणे जाणत असतो तर मीही स्वतःबद्दल इतके बोललो नसतो.’
१९)जो प्रकाश आमचे डोळे दिपवतो तो आमच्या लेखी चक्क अंधारासारखाच आहे. ज्या दिवशी आपण जागृत असतो तोच आपल्या दिवसाचा खरा उदय, दिवस अजून खऱ्या अर्थाने उगवायचाच आहे. आताचा हा सूर्य म्हणजे केवळ पहाटेचा शुक्रताराच आहे.’
२०)
इत्यादी...असंख्य विचार तुम्हांला या पुस्तकात वाचायला मिळतील.त्यामुळे नक्की हे पुस्तक सर्वांनी वाचावे..🥰
©Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा