हेन्री डेव्हिड थोरो चरित्र आणि निबंध ❤️
दुर्गा भागवत आपल्या‘वॉल्डनकाठी विचारविहार'या पुस्तकात थोरो गुरुजींबद्दल म्हणतात.... थोरो हा मुळी तत्त्वज्ञ नव्हेच, तो आदिम सृष्टीशी तन्मय झालेला गद्यकवी आहे, आदिमतेशी त्याचे सनातन नाते आहे. आदिम अरण्ये, आदिम मानव, आदिम प्रतिमा त्याला प्रिय आहेत. आणि या साऱ्याचे प्रतिबिंब तत्त्वज्ञानाच्या ग्रंथापेक्षा विविध देशांच्या पुराणकथात मिळतात. म्हणून त्याला दैवतकथा अती प्रिय आहेत. थोरोची देवावर श्रद्धा नाही, चर्चवर नाही, समाधी अथवा देवालयांवर नाही, रूढ पुस्तकी ज्ञानावरही नाही. पण मानव आणि सृष्टी यांना मूलभूत सौंदर्यमय, पार्थिव व रहस्यमय संबंध जोडणाऱ्या पुराणकथांचे किंवा दैवतकथांचे त्यांना क्षणभरही विस्मरण होत नाही.थोरो यांनी समाजाला फटकारे मारले असले तरी त्यांनी निग्रोंच्या गुलामगिरीविरुद्ध बंडाचा झेंडा पुकारलेला आहे. सविनय कायदेभंगाचा पुरस्कार केला आहे. महात्मा गांधी यांना त्यांचे विचार प्रेरक आणि मार्गदर्शक वाटले व त्यांनी दक्षिण आफ्रिकेत त्या सत्याग्रहाच्या वेळी सविनय कायदेभंगावरच्या त्याच्या लेखाचा अनुवाद करून समाजाचे लक्ष त्याच्याकडे वेधले. कार्लाईल इमर्सन, व्हिटमन वगैरे विचारवंतांशी ...