वॉल्डनकाठी विचार विहार 💜
हेन्री डेव्हीड थोरो म्हणजे निव्वळ थोर आणि अफलातून माणूस हा माझा ठाम मत आहे.माझे गुरू.निसर्ग,पर्यावरणाच्या बाबतीत त्यांच्या विचारांचा मी जबरदस्त चाहता आणि त्यांचा डायहार्ड फॅन आहे. सर्वात प्रथम जर कोण्या विचारवंताने निसर्ग/पर्यावरणाचा विचार केला असेल आणि आपल्या विचारांवर अंमल केला असेल तर तो आपल्या थोरो गुरुजींनीच.२ वर्ष २ महिने २ दिवस कंकाॅर्डजवळच्या वॉल्डन नामक तळ्याकाठी जंगल/रानात एकट्याने वास्तव्य करून तेथे त्यांनी काय केले,कोणता व्यवसाय केला,त्यांना एकटेपणा वाटला नाही का ?? इत्यादी काही कुतूहल असलेल्या प्रश्नाचे उत्तरे त्यांनी वॉल्डन या पुस्तकात दिले आहे.आपले तेथील अनुभव सांगता सांगताच जीवनातील अनेक समस्यांविषयीचे आपले विचारही त्यांनी या पुस्तकात व्यक्त केले आहेत जे वाचून आपण विचारांच्या चक्रात गुंतून गेल्याशिवाय राहत नाही.
आपल्या रानात राहायला जाण्याबद्दल थोरो गुरूजी म्हणतात,
'मी रानात राहायला गेलो तो अशासाठी, की जीवन हेतुपुरःसर जगावे, जीवनाच्या मूलभूत तथ्यांना सामोरे जावे, जे इतरांना शिकवायचे ते आपल्या स्वतःला शिकता येते की नाही ते पाहावे, आणि मरतेवेळी आपण जगलोच नाही हे उमगू नये म्हणून. जे जीवन नव्हे ते जगण्याची मात्र मुळीच इच्छा • नव्हती. जिणे किती प्रिय, किती किमती आहे... मला अगदी खोल, गहन गंभीर जीवन जगायचे होते.'💜
' तर वॉल्डन या पुस्तकाबद्दल अधिक बोलताना द्वितीय आवृत्तीचे संपादकीय मीना वैशंपायन ताई आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,
"आपल्या वॉल्डन पुस्तकांत थोरोनी केलेले हे वर्णन म्हणजे रूढार्थाने त्या विशिष्ट काळातील आत्मपर आठवणी नाहीत, कोणतेही प्रवासवर्णन नाही, अथवा एखाद्या निसर्गशास्त्रज्ञाचा अहवालही नाही. त्यात त्यांनी क्वचित तत्त्वज्ञानपर, तर कधी राजकीय बाबींवर आधारित टिपण्या केल्या आहेत, तसेच आजूबाजूच्या परिसराची, तेथे दिसणाऱ्या, भेटणाऱ्या माणसांची, शेतकऱ्यांची वा कधी प्राण्यांचीही शब्दचित्रे आहेत. कधी त्या तळ्यात मोसम बदलला की पाण्याची होणारी आंदोलने, त्या तळ्याच्या खोलीबद्दलची वैज्ञानिक माहिती, वातावरणातले चढ-उतार अशांची वर्णने येतात. कधी त्यात आपले घर, कपडे, खाणे-पिणे, राहणे, घरी येणारे पाहुणे, पाहुणचार, आपले शेत, शेतीसंबंधित बाबी, आपले तिथले सखे-सोबती, झाडे, पक्षी, प्राणी आणि इतर तळी व त्यांतील पाणी किंवा इंडियनांच्या जुन्या शस्त्रांचे रानात सापडणारे तुकडे यांसारख्या विषयांच्या अनुषंगाने आलेले विचार आहेत. महत्त्वाचे म्हणजे एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेबद्दलची त्याची निरीक्षणे आहेत. ओघानेच समाज, धर्म, परंपरा, समाजाचा पर्यायाने देशाचा विकास, शिक्षणपद्धती, बदलता काळ या सगळ्यांविषयी त्यांनी आपली मते मांडली आहेत."
शेकडो भाषांत या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत..1965 साली दुर्गा भागवत मॅमनी या पुस्तकांचे सर्वांत प्रथम मराठीत अनुवाद केले ते "वॉल्डनकाठी विचार विहार "या नावाने..तेव्हापासून हे पुस्तक दुर्मिळ होते कोठेही मिळत नव्हते.मी जेवढं या पुस्तकाचा शोध घेतला असेल तेवढा आजपर्यंत कधीही कोणत्याही पुस्तकाचा घेतला नसेल..पण ते म्हणतात ना की,
"अगर किसी चीज़ को सच्चे दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुम से मिलाने में लग जाती है "
ठीक या डायलॉग प्रमाणेच हे पुस्तक 2021 मध्ये Reprint होऊन द्वितीय आवृत्ती मला येऊन मिळाली आणि 2/3 वर्षांपासूनचा सुरू असलेला या पुस्तकाचा माझा शोध समाप्त झाला..आणि असलेली प्रचंड आतुरता काही प्रमाणात संपली.
दोनच दिवसांपूर्वी हे पुस्तक मला मिळालं आणि मिळता क्षणीच मी सर्वकाही बाजूला ठेऊन हे पुस्तक वाचून काढलं.वाचल्यानंतर मला जो एक सुकून आणि काळजाला थंडक मिळाली ती मी शब्दांत सांगू शकत नाही.वाचल्यानंतर काहीतरी सुंदर आणि भन्नाट वाचल्याचं मला अनुभव आला.2 दिवसांसाठी मी वेगळ्याच विश्वात जाऊन आल्याचा मला भास होतोय.थोरो आणि त्यांचे अतिउच्च दर्जाचे विचार किती अफलातून आहेत याची प्रचिती मला येतं आहे. कितीतरी नव्या आणि छान गोष्टी मला माहिती झाल्या.नवीन नवीन माहिती मिळाली..एकंदरीत या पुस्तकाची मी पारायणे करणार आहे एवढे नक्की..
इ.सन १८५४ रोजी प्रकाशित झालेल्या वॉल्डन या पुस्तकातील थोरो गुरूचे विचार आजच्या युगात सुद्धा तेवढेच प्रासंगिक आहेत.त्याकाळापेक्षा आजच्या काळात थोरो गुरूच्या विचारांची जास्त गरज विश्वाला आणि आपल्या समस्त मानवजातीला आहे हे मी ठामपणे म्हणू शकतो.आजच्या या धावपड व धकाधकीच्या मानवी जीवनात आपण जरा थांबून निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवे.निसर्ग आपल्याला कोणत्याही गोष्टीची कधीही आणि केव्हाही कमी पडू देत नाही आणि देणार सुद्धा नाही. तो पृथ्वीवरील सर्वांची गरज भागवायला सक्षम आहे ही या गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल.आजच्या तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात आपण स्वतःला जेवढं गुंतवुन घेतलं आहे त्याची तेवढी खरंच गरज आहे का ?? नुसती शो बाजी व जास्तीत जास्त संसाधनाची आपल्याला कितपत गरज आहे ??इंटरनेट, टीव्ही, मोबाईल,वीज आणि इतर वायफळ सुविधेशिवाय आपण राहूच शकत नाही का ?या प्रश्नांची प्रमाणिकपणे उत्तर शोधून आपल्याला यावर विचार करायची गरज आता आहे.गेल्या कोरोना काळात तर जास्तच..
वॉल्डनकाठी त्यांनी स्वतःच्या हाताने घर बांधले,शेती केली,अन्न शिजवले,निसर्ग,प्राण्यांचे निरीक्षण केले व एकंदरीत निसर्गाशी पूर्णपणे एकनिष्ठ राहून त्यांनी २ वर्ष तेथे काढले. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी स्वकष्टाच्या जीवनाचा आनंद लुटला.या पुस्तकातून त्यांनी मानवी आयुष्यातील काही अशा गोष्टीवर थोरोंनी प्रकाश टाकला ज्याबद्दल आपण कधीही आणि केव्हाही विचार करत नाही..वॉल्डन वाचत असताना आपल्याला निसर्ग,वाचन,संगीत,प्राणी/पक्षी प्रेम,स्वकष्ट आणि एकांताचे महत्व कळते..थोरो गुरुचे विचार वाचून त्यांचा थोरपण आणि निसर्गाप्रति असलेली त्यांची निष्ठा कळते..यामुळे आधी तर होतीच पण आता खूप खूप जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहायची,पक्षी/प्राणी,झाड,झुडपं,नदी निरीक्षणाची जाम आवड लागलेली आहे..थोरो गुरुजींच्या पासून खुप काही शिकलोय.त्यांच्याबद्दल हवी असलेली प्रचंड माहिती मला आता मिळाली आहे.काहीप्रमाणात तरी माझी जिज्ञासा आता शांत झाली आहे.
तर तूर्तास एवढंच लवकरच मी माझा विस्तृत अनुभव शेअर करतोच तोपर्यंत तुम्ही सुद्धा हे पुस्तक लवकर वाचा आणि वाचून समृद्ध व्हा..💜
©️ Moin Humanist✍️
अप्रतिम
उत्तर द्याहटवा