जोगवा 💔🌼
जोगवा हा चित्रपट मी कितीतरी वेळा बघितलं नि प्रत्येक वेळी तो खूप खोलवर अंतर्मनाला भिडला.यानंतरच मी राजन गवस लिखित चौंडक,भंडारभोग ह्या कादंबऱ्या सुद्धा वाचल्या.आपल्या समाजात धर्माच्या, देवाच्या नावाखाली काय-काय घडतं, याचं वास्तवदर्शी नि फार भावनिक चित्रण या चित्रपटात आहे.
‘जोगवा’ म्हणजे काय, हे या चित्रपटामुळेच नीट समजलं. पूर्वीपासून आपल्या ग्रामीण भागात असं प्रथा आहे की जर कुणी संकटात असेल, विशेषतः मुलगी किंवा मुलगा दीर्घ आजारी असेल, किंवा मुलं होत नसतील, तर घरातली एखादी मुलं किंवा मुलगी देवासाठी अर्पणकेली जाते त्यांना जोगता किंवा जोगतीण बनवलं जातं. ही व्यक्ती मग आयुष्यभर देवाच्या नावावर जगते,लग्न करता येत नाही, आपलं स्वप्न जगता येत नाही, समाजाच्या बाहेर राहावं लागतं.
या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली आहे (उपेंद्र लिमये) यांनी तायप्पा ‘जोगता’ च्या भूमिकेत. त्यांचं पात्र लहानपणापासून जबरदस्तीने देवासाठी झोतात दिलं जातं. त्यांचं लैंगिक शोषण होतं, ते स्वतःची ओळख विसरतात, स्वतःला पुरूष समजावं की नाही, हेही त्यांना समजेनासं होतं. दुसरीकडे सुली (मुक्ता बर्वे) जोगतीण झाली आहे तिच्यावरही अनेक सामाजिक नि मानसिक बंधनं आहेत. हे दोघं जरी समाजासाठी देवाचे लोक असले, तरी प्रत्यक्षात त्यांचं जीवन खूप जास्त वेदनादायी आहे.चित्रपटात या दोघांची भेट होते, त्यांच्यात प्रेम निर्माण होतं, पण त्यांचं प्रेमही समाजाला मान्य नसतं. कारण देवासाठी अर्पण केलेलं शरीर म्हणजे ते सर्वांसाठी असतं, कोणासाठी खास नाही. हे ऐकून फार त्रास होतो. देवाच्या नावावर लोक इतकं काही मान्य करतात, की त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्कच उरत नाही.
या चित्रपटाची खासियत म्हणजे त्यातली खरीखुरी माणसं, त्यांचं वास्तव नि गावाकडची संस्कृती. यातील 'लल्लाटी भंडार' हे गाणं आजही अंगावर शहारा आणतं.हा चित्रपट बघताना असं वाटतं की समाजाने प्रगती केलीय असं आपण म्हणतो, पण अजूनही अशा अंधश्रद्धा, प्रथा नि रूढी लोकांचं आयुष्य बरबाद करत आहेत. विशेषतः छोट्या गावात, जिथे शिक्षणाची नि विचारांची कमतरता आहे, तिथे अजूनही लोक देवाच्या नावावर सगळं काही सहन करतात. हे पाहून खूप वाईट वाटतं.
‘जोगवा’ मुळात फक्त एक चित्रपट नाही, तर समाजाच्या मनोवृत्तीवर बोट ठेवणारा आरसा आहे. या चित्रपटाने मला शिकवलं की श्रद्धा हवीच, पण ती अंध नको. कोणालाही देवाच्या नावावर त्यांचं आयुष्य नाकारण्याचा अधिकार समाजाला नाही. आपण सगळ्यांनी मिळून अशा प्रथांना विरोध केला पाहिजे नि प्रत्येकाला त्याचं माणूस म्हणून जगण्याचं हक्क मिळाला पाहिजे.हे चित्रपट पाहून मन हेलावलं. ही गोष्ट आजही कुठे तरी खऱ्या आयुष्यात घडते, हे जाणवून खूप काही शिकायला मिळालं. जर आपण खरंच बदल घडवायचा असेल, तर सुरुवात आपल्या विचारांपासून व्हायला हवी हीच या चित्रपटाची खरी शिकवण मला वाटते.🌼
खूप छान
उत्तर द्याहटवा