अॅनिमल फार्म 💜
जॉर्ज ऑर्वेल यांची बहुचर्चित आणि गाजलेली कादंबरी "अॅनिमल फार्म "👍
दोन दिवसांपूर्वी वाचून पूर्ण केली आणि एकंदरीत या कादंबरीच्या प्रेमात पडलो.मनापासून विचार करायला भाग पाडणाऱ्या या कादंबरीबद्दल जेवढं ऐकलं,वाचलं होतं त्याप्रमाणेच ही कादंबरी उत्कृष्ट आहे.१९४५ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी खरंच आजच्या काळात सुद्धा तेवढीच प्रासंगिक आहे. अभिजात कलाकृतींचे हेच वैशिष्ट्य आहे की ते बदलत्या काळ आणि संदर्भानुसार नवे अर्थ घेऊन यांची प्रासंगिकता टिकवून ठेवते.आणि वेगवेगळ्या काळात ती अधिक अर्थपूर्णही बनते. अॅनिमल फार्म
सुद्धा ही एक अशीच कलाकृती आहे..
या कादंबरीला टाईम मॅगझिनने इंग्रजी भाषेतील 100 सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक म्हणून निवडले (1923 ते 2005) आणि मॉडर्न लायब्ररीच्या 20 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट कादंबर्यांच्या यादीत ३१ व्या स्थानावर तर बीबीसीच्या द बिग रीड सर्वेक्षणात 46 व्या क्रमांकावर आहे ही कादंबरी आहे. यासोबतच 1996 मध्ये पूर्वलक्षी ह्यूगो पुरस्कार जिंकला आहेत आणि एकूण पाश्चात्य जगाच्या निवडीतील उत्कृष्ट पुस्तकांपैकी एक ही कादंबरी आहे..
ही कादंबरी व्यंगात्मक रूपाने 1917 च्या रशियन क्रांती/बोल्शेविक क्रांती आणि तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या स्टालिन कालखंडातील घटना दर्शवते..तत्कालीन सोव्हिएत सत्तेच्या मक्तेदारीची थट्टा करते. स्टॅलिनच्या काळात ज्या पद्धतीने सत्तेचे केंद्रीकरण झाले आणि गोपनीयता हा मानवी हक्क नसून मूठभर लोकांचा विशेषाधिकार बनला, त्यावर ही कादंबरी प्राणघातक रीतीने प्राण्यांच्या कथेच्या निमित्ताने प्रहार करते.सिव्हिल सर्व्हिस साठी आधीच रशियन क्रांतीच अभ्यास केल्यामुळे तर ही कादंबरी मला अधिकच भावली.कादंबरीतील प्रत्येक पात्र मला रशियन क्रांतीतील व्यक्तींची आठवण करून देत होता.कशाप्रकारे लोकशाही आणि स्वातंत्र्याचा लॉलीपॉप दाखवून हुकूमशाही केंद्रस्थानी येते याबद्दल खूपच सटीक पद्धतीने कादंबरीत भाष्य केलेलं आहे..कोणत्याही व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे आणि योग्य वेळेवर आवाज न उठवणे हे किती गंभीर समस्येला आमंत्रण देणारं असू शकते हे आपल्याला कादंबरी वाचत असताना पावलोपावली जाणवते.मुळात माणुसकी आणि पशुत्व यांच्यातील नाहीशी होणारी दरी केवळ जॉर्ज ऑर्वेलच्या अॅनिमल फार्ममध्येच नाही तर आपल्या आजच्या काळातील सुद्धा त्रिकालवादी सत्य आहे..समता, बंधुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या विविध संघर्षांतून मानवी संस्कृतीने जी सर्वोत्तम मूल्ये गेल्या अनेक शतकांत आत्मसात केली होती ती या शतकाच्या पहिल्या दोन दशकांतच अॅनिमल फार्मच्या खऱ्या नेपोलियनने हिरावून घेतली आहेत किंवा हिरावून घेण्याच्या मार्गावर आहेत..गेल्या कोरोना काळात तर या कादंबरीतील एक विचार तंतोतंत लागू पडतो तो असा की,
All animals are equal, but some animals are more equal than others.
( सर्व प्राणी समान आहेत .पण काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत.)
कोरोना काळात विदेशात अडकलेल्या लोकांसाठी विशेष विमाने पाठवली गेली पण स्वतःच्या देशात अडकलेल्या लोकांसाठी साध्या बसची सुद्धा व्यवस्था केली नव्हती. त्यांना शेकडो किमी पायपीट करावी लागली यावरून वरील विचारच अधोरेखित होतो ना ??
असो...
मुळ इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या भाषेत अनुवाद झालेलं आहे.पण सुरुवातीला अनेक प्रकाशकांनी हे पुस्तक प्रकाशित करायला नाकारले होते हे विशेष...जॉर्ज ऑर्वेल बिहारमधील मोतीहारी येथे जन्मलेले त्यांच पूर्ण नाव एरिक आर्थर ब्लेअर (१९०३-१९५०) ऑर्वेलने कादंबरी, निबंध, पत्रकारिता, बीबीसी वृत्तांकन असे विपुल लेखन केले आहे..ते लोकशाहीचे खंदे समर्थक होते. आपल्या लेखनातून त्यांनी साम्राज्यशाही आणि एकाधिकारशाही राजवटींवर कोरडे ओढले. १९४५ साली लिहिलेल्या 'अॅनिमल फार्म' या रूपकात्मक राजकीय कादंबरीने त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली..या कादंबरीतून लेखकांनी ज्याप्रकारे येणाऱ्या भविष्याबद्दल सटिक भाष्य केले आहे त्याला खरंच तोड नाही.त्यामुळे अशी परिस्थिती प्रत्यक्षात सुद्धा अवतरु शकते याबद्दल काही दुमत असता कामा नये..कादंबरीच्या कथेतून एकंदरीत आपल्याला भविष्य दिसतो यातील विचार जागोजागी अधोरेखित होताना आपल्याला दिसतात पण त्यासाठी आपले डोळे उघडे असायला हवे,आपल्या मनात कुठला पूर्वग्रह असता कामा नये.या कादंबरीला आपण फक्त व्यंगात्मक रूपाने न वाचता यावर विचार करायला हवे..तेव्हा खरंच लोकशाही ही किती महत्वपूर्ण आहे ही गोष्ट आपल्याला कळून चुकेलं आणि आपण ती नेहमी अबाधित कशी राहील यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करू हे नक्की.
तर चला आता कादंबरीच्या कथेबद्दल बोलूया....
अँनिमल फार्मची कथा सुरू होते इंग्लंडमध्ये स्थित मनॉर फार्म
येथून..जेथे एका म्हाताऱ्या डुकराच्या(मेजर)आव्हानानुसार या शेतात काम करणारे प्राणी आपल्यावर अन्याय करणाऱ्या मालकाविरुद्ध (मि. जोन्स) बंड पुकारतात आणि मि. जोन्सला त्याच्या मालकीच्या मळ्यातून हाकलून लावतात.आणि तेथे आपली सत्ता प्रस्थापित करतात..
ती अशी,
एका रात्री, मेजर(म्हातारा डुक्कर)एक परिषद आयोजित करतो, ज्यामध्ये तो माणसांचा पाडाव करण्याचे आवाहन करतो "आपला खरा शत्रू माणूस आहे . या आयुष्यातून माणसाला हद्दपार करा . भूक आणि अतिश्रम यांचं मूळच कायमचं नष्ट होईल . असे तो प्राण्यांना चेतावतो व प्राण्यांना "इंग्लंडचे प्राणी" नावाचे क्रांतिकारी गाणे शिकवतो. ओल्ड मेजर मरण पावल्यावर, स्नोबॉल आणि नेपोलियन हे दोन तरुण डुक्कर सत्ता हाती घेतात आणि बंड घडवून आणतात.अशाप्रकारे मिस्टर जोन्सला शेतातून बाहेर काढल्या जाते आणि मनॉर फार्मच नाव बदलून "ऍनिमल फार्म "ठेवण्यात येते.यासोबतच ते प्राणीवादाच्या सात आज्ञा स्वीकारतात,अनिमल फार्मवरचे सर्व प्राणी कायम या आज्ञानुसारच लागतील असा फर्मान जाहीर करण्यात येतो.
त्या आज्ञा अशा होत्या :-
१. जे काही दोन पायांवर चालत असेल ते शत्रू आहे.
२. जे काही चार पायांवर चालत असेल किंवा ज्याला पंख असतील ते मित्र आहे.
३. कोणताही प्राणी कपडे घालणार नाही.
४. कोणताही प्राणी बिछान्यात झोपणार नाही.
५.कोणताही प्राणी दारू पिणार नाही.
६. कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारणार नाही.
७. सर्व प्राणी समान आहेत.
स्नोबॉल प्राण्यांना वाचायला आणि लिहायला शिकवतो, तर नेपोलियन लहान पिल्लांना प्राणीवादाच्या तत्त्वांवर शिक्षित करतो. अॅनिमल फार्म सुरू झाल्याच्या स्मरणार्थ, स्नोबॉल पांढऱ्या खुर आणि हॉर्नसह हिरवा झेंडा उंचावतो..असे सर्वकाही व्यवस्थित सुरू असते.अन्न मुबलक असतो तर शेती सुरळीत चालते. डुक्कर स्वतःला नेतृत्वाच्या पदापर्यंत पोहोचवतात आणि त्यांच्या वैयक्तिक आरोग्यासाठी विशेष खाद्यपदार्थ बाजूला ठेवतात.स्नोबॉल डुक्कर पवनचक्की बांधून शेतीचे आधुनिकीकरण करण्याची आपली योजना जाहीर करतो नेपोलियनने या कल्पनेला विरोध करतो.वाद वाढल्या नंतर नेपोलियन कुत्र्यांच्या मदतीने स्नोबॉलला हाकलून लावतो.आणि येथून नेपोलियन स्वतःला सर्वोच्च सेनापती म्हणून घोषित करतो..
आता कशाप्रकारे नेपोलियन सर्व सत्ता आपल्या हातात घेतो आणि कशाप्रकारे तो या प्राण्यांवर राज्य करतो ??
कशाप्रकारे दिलेल्या सात आज्ञा थोड्या थोड्याने बदलल्या जातात ?? कशाप्रकारे प्राणी हुकूमशाहीचे गुलाम होतात ??
"सर्व प्राणी समान आहेत" या आज्ञेच रूपांतर "सर्व प्राणी समान आहेत .पण काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत "या आज्ञेत कसा होतो ??इत्यादी इत्यादी हा प्रवास खूप वाचनीय असून डोळ्यात अंजन घालणारा आहे...त्यामुळे नक्की ही कादंबरी सर्वांनी वाचावी आणि विचार करावा असे मला वाटते...मी एवढ्या उशिरा ही कादंबरी वाचली त्याबद्दल मला दुःख आहे..मधूश्री प्रकाशने नुकतंच या कादंबरीच मराठी अनुवाद केलं असून भारती पांडे यांनी खूपच छान आणि साजेसं अनुवाद केलं आहे..
बाकी कादंबरीचा शेवट खालील वाक्याने होतो जो आपल्या सर्वांना डीपमध्ये विचार करायला भाग पाडतो..खालील वाक्य वाचकांना चेतावणी देण्यासाठी आहे की समाजात त्यांच्याकडे असलेल्या शक्तीला धरून ठेवा, अन्यथा सत्ताधारी वर्ग भूतकाळातील गैरवर्तनांची पुनरावृत्ती करू शकतील..
The creatures outside looked from pig to man,
and from man to pig, and from pig to man again: but
already it was impossible to say which was which.
बाहेरचे प्राणी डुकराकडून माणसाकडे बघत होते - माणसाकडून डुकराकडे बघत
होते; पण आत्ताच त्यांच्यामध्ये वेगळेपण दिसणं- कोण माणूस आणि कसे
डुक्कर, हे सांगणं अशक्य झालं होतं..
©️Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा