केपकॉड 💜



सुरुवातीला जेव्हा मला थोरो गुरुजींच्या बद्दल माहिती हवी होती तेव्हा इंटरनेट वर विशेष अशी काहीही माहिती मराठीत उपलब्ध नव्हती..दुर्गा भागवत यांनी अनुवाद केलेली दोन्ही दुर्मिळ पुस्तके मिळत नव्हती.जयंत कुलकर्णी यांनी अनुवाद केलेलं वॉल्डन तेव्हा आलं नव्हतं.मग अशातच एकेदिवशी अनिल अवचट सरांच एक पुस्तक हाती लागलं "शिकविले ज्यांनी "त्यामध्ये थोरोचे विश्व हा प्रकरण थोरोबद्दल होता त्या एका लेखाने मला थोरो गुरुजींबद्दल निवडक पण महत्वपूर्ण माहिती मराठीत मिळाली.मग यानंतर काही दिवसांनी मधूश्री प्रकाशन तर्फे वॉल्डन मराठीत आलं याचं अनुवाद जयंती कुलकर्णी यांनी अप्रतिम केलं होतं. वॉल्डन हाती लागताच मी ते वाचून संपवल आणि भारावून गेलो.वॉल्डन नंतर मी थोरोंचा डाय हार्ड चाहता झालो.थोरो गुरुजी आणि त्यांच्या भन्नाट विचारांबद्दल अधिक वाचनाची मला जिज्ञासा निर्माण झाली.त्यामुळे मी इतर काही पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात केली पण अपेक्षेप्रमाणे काहीच सापडलं नाही.आणि एकेदिवशी अशातच वर्णमुद्रा प्रकाशनतर्फे थोरो गुरुजीं यांच प्रवासवर्णपर पुस्तक केपकॉड चं मराठी अनुवाद आलं तेव्हा मला जेवढा आनंद झाला तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नव्हतो..मग काय ? केपकॉड मागवलं आणि मिळता क्षणी एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलं..भगवंत क्षीरसागर सरांनी ज्या सुंदरपध्दतीने या पुस्तकाचा अनुवाद केलं आहे त्याला खरंच तोड नाही..केपकॉड वाचून झाल्यानंतर लगेच माझं अनुभव मला लिहायचं होतं पण ते काही मुख्य कारणाने राहूनच गेलं..पण आता मी सर्वकाही बाजूला ठेऊन माझा हा पुस्तक अनुभव शेअर करतोय.

वॉल्डन नंतर केपकॉड हे थोरोजींचे मी वाचलेले दुसरे पुस्तक. मी हे पुस्तक मिळाल्यानंतर सर्वकाही सोडून उत्स्फूर्तपणे अवघ्या ६ तासांतच वाचून पूर्ण केलेले हे पुस्तक माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे.एका जागेवर बसून सलग वाचन करणे कुठेही थोडं बोअर न होता ही जादू आहे थोरो गुरुजींच्या लिखाणाची.आणि त्याला साजेसं केलेल्या उत्कृष्ट अनुवादाची..भगवंत सरांनी ज्यापद्धतीने अनुवाद केलं आहे त्याला खरंच हॅट्स ऑफ आहे..विशेष करून या पुस्तकात जी प्रस्तावना सरांनी लिहली त्यातून थोरो गुरुजींच सारांशरुपानं चरित्र आणि त्यांच्या समग्र कार्याची ओळख होते..
काय बोलू यार थोरो, त्यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व किती भन्नाट माणूस होऊन गेला ज्यांच्याबद्दल विचार करूनच मन प्रफुल्लीत होऊन जातो..आपल्या काळाच्या कितीतरी पटीने पुढं असणारा हा अवलिया खऱ्या अर्थाने आयुष्य जगून गेला. वॉल्डन नंतर केपकॉड वाचून मला जो सुकून मिळाला तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही..थोरो गुरुजीं आणि त्यांच्या एका मित्राने केपकॉड च्या समुद्र किनारी केलेलं प्रवास आणि तेथे त्यांना आलेल्या गोड-कडू अनुभवांना त्यांनी या पुस्तकात सुंदररित्या उतरवलं आहे..प्रवासवर्णपर असलेलं हे पुस्तक खूप वाचनीय असून घरी बसल्या बसल्या  समुद्र किनाऱ्याची आणि तेथे येणाऱ्या अनुभवाची आपल्याला सैर करून आणायची हिम्मत ठेवतो एवढं नक्की. मला हे पुस्तक प्रचंड आवडलं.थोरो गुरुजींच्या ग्रंथात केपकॉड या ग्रंथाला खूप महत्व आहे.या प्रवासात त्यांनी निसर्ग आणि समुद्राच सुंदर रूप तर अनुभवलं पण यांचाच रौद्र रूप सुद्धा अनुभवलं आहे.प्रवास करताना कुठेही पोहचणं हे त्याचं ध्येय नसायचं .फक्त प्रवास करत राहणं याच उद्देशानं गुरुजी शेवटपर्यंत प्रवास करत राहिले..आणि त्यांनी केलेल्या या प्रत्येक प्रवासात आलेल्या अनुभवांच्या नोंदी उत्कृष्ट पद्धतीने करून ठेवलेल्या आहेत.

केप म्हणजे भुशिर (समुद्रात शिरलेला जमिनीचा तुकडा) आणि कॉड हे एका माशाचे नाव आहे.एकंदरीत केपकॉड चा अर्थ माशांच भुशिर असं आपण करू शकतो.या केपकॉड ला थोरोनी आपल्या आयुष्यात चार वेळा भेटी दिल्या 2 वेळा एकट्याने तर 2 वेळा आपल्या मित्रांच्यासोबत.येथे त्यांना आलेल्या अनुभवांचे वर्णन आपल्याला केपकॉड या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतात.
लY
केपकॉडच वर्णन थोरो खालील प्रकारे करतात,

केपकॉड ' हा समुद्रकिनारा मॅसॅच्युसेटस्चा उघडा आणि वाकडातिकडा बाहूच वाटतो . त्याचा खांदा म्हणजे ' बुझर्ड ' चा उपसागर , कोपर म्हणजे केपमालेबरें , टुरुरो म्हणजे बाहू न हाताची जणू जोडणी . तसंच प्रॉव्हिन्सटाऊन म्हणजे जणू आग्नेय दिशेकडून येणाऱ्या वादळाशी झुंज देण्यासाठी सज्ज असलेला ओंजळीसारखा वालुकामय हात . या बाहूच्या मागे मॅसॅच्युसेटस रखवालदारासारखं , पाठीशी पर्वत टेकड्या घेऊन , उपासागराची राखण करीत , महासागराच्या फरशीवर पाय रोवून उभं आहे.

तर केपकॉड नेमकं का वाचावं याचं उत्तर अनुवादक भगवंत क्षीरसागर यांनी आपल्या प्रस्तावनेच्या एका उताऱ्यात खूपच मनमोहक पध्दतीने दिलेलं आहे.

ते म्हणतात..

या पुस्तकात इथले रहिवासी , त्यांचं जगणं , त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय , त्यांची घरं , त्यांची दिनचर्या यांचा लेखाजोखा तर आहेच ,परंतु निसर्ग आणि माणूस यांच्यातील परस्पर विरोधी ताण समर्थपणे वर्णिले आहेत . तिथल्या पवनचक्क्या , समुद्रकिनारे , बंदरं , चौपाट्या , वाळवंट , आसराघरं , पशुपक्षी , मासे आणि असंख्य समुद्रजीव , समुद्राचे रंग - तरंग , लाटा , वादळ अशी कितीतरी समुद्राची रूपं या पुस्तकात थोरोनं वर्णिली आहेत . तिथले मच्छीमार आणि त्यांच्या जीवनातील रौद्रभीषण मृत्यूचं तांडव थोरोने या पुस्तकात उभे केले आहे . ' थोरो जिथं जातो तिथं उठला आणि निघाला असा कधीच जात नाही . तो आपल्या प्रवासाचं खूप नियोजन करतो . खूप तयारी करतो . त्या त्या जागेविषयी आतापर्यंत कुणी कुणी काय काय लिहून ठेवलेलं आहे ते सगळं वाचून जातो . त्याच्या लेखनात हे सगळे संदर्भ येतात . आधी कुणी काय लिहून ठेवलं आणि आता तिथं काय बदल झालेत याचीही तो नोंद करतो . त्यामुळे त्या त्या जागेचा जुना , नवा इतिहास , भूगोल आपल्यासमोर उभा राहतो..

केपकॉड हे पुस्तक एकूण 10 प्रकरणाचा असून फुटलेलं जहाज या पहिल्या प्रकरणापासून सुरुवात होऊन प्रॉव्हिन्सटाऊन या 10 व्या प्रकरणावर येऊन समाप्त होतो.थोरो गुरूजींचे हे समुद्रावरील वर्णन वाचून त्यांच्या थोरपणाची आपल्याला क्षणोक्षणी प्रचिती येत राहते.डोळ्यांनी दिसलेल्या प्रत्येक गोष्टींचे वर्णन गुरुजींनी खूपच उत्कृष्ट पद्धतींने केलेले आहे जे वाचून आपण त्यांच्या प्रेमात पडतो..
केपकॉड वर बघितलेल्या प्रत्येक गोष्टीचं तपशीलवार वर्णन थोरोनी या पुस्तकात केलेलं आहे.समुद्र,चौपाटी,फुटलेलं जहाज,येथे त्यांना भेटलेली माणसे,येथील हवामान,भूगोल, इतिहास,येथील लोकजीवन, संस्कृती, राहणीमान, घरे,लाईटहाऊस,येथील दळणवळण इत्यादी प्रत्येकांबद्दल थोरोनी आपलं निरीक्षण सविस्तर लिहलं आहे जे वाचून आपण त्यामध्येच हरवून जातो..पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या टिपा सुद्धा उपयुक्त आणि महत्वपूर्ण आहेत.एवढ्या महत्त्वाचं पुस्तक मराठीत आणल्याबद्दल अनुवादक भगवंत क्षीरसागर आणि वर्णमुद्रा प्रकाशन यांचे मन : पूर्वक खूप खूप आभार..

एकंदरीत केपकॉड हे पुस्तक खूप वाचनीय असून प्रत्येकांनी एकदा तरी वाचायला हवे आणि थोरो गुरुजींचे विचार समजून घ्यायला हवे.खऱ्या अर्थाने आजच्या युगात हेन्री डेव्हीड थोरो यांच्या विचारांना अधिक महत्व प्राप्त झालं आहे.निसर्गवादी थोरोनी दाखवलेल्या मार्गावर जेव्हा काही प्रमाणात का होईना जेव्हा मानव समाज चालेल तेव्हा मानवाच्या हाताने होणारा निसर्गाचा वऱ्हास थांबू शकेल.

तर चला आता बघुया मला आवडलेले थोरो गुरुजींनी लिहलेले काही अनुभव तर काही निरीक्षणे,विचार जे खरंच अंतर्मुख करणारे आहेत..

1) दीपगृहाचा निरोप घेण्यापूर्वी आम्हाला आमच्या बुटांच्या आत चरबी रगडावी लागली . खाऱ्या पाण्यातून आणि वाळूतून चालावं लागल्यामुळे आमचे बूट खूप कडक झाले होते . आम्हाला महासागर तळ्यांसारखा शांत दिसत नाही , तोपर्यंत त्याचाशी सलगी करायची असं आम्ही ठरवलं होतं . त्याचप्रमाणे महासागराचा आमच्या मनावर झालेल्या सर्व प्रकारच्या पडसादांचा अनुभव घेण्याची आमची इच्छा होती ..

2) हवा - पाणी , आणि पृथ्वी यांपैकी कुणालाही विश्रांतीची गरज वाटत नव्हती . ती क्रिया अखंडपणे चालू असते . सतत काहीतरी घडत असतं , वादळात आणि शांततेत , हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात , दिवसा आणि रात्रीसुध्दा . निष्क्रिय बसलेला माणूससुद्धा तिथं डोलत असल्याचा भास होतो , असं वाटतं .

3)उद्ध्वस्त जहाजाचे अवशेष , मृतदेह भरलेली खोकी , पांढऱ्या कपड्यांखाली झाकलेल मृतदेह , जिकडे तिकडे पडलेल्या हॅट किंवा जॉकिट अशा वस्तू आणि त्या तशा वातावरणात दु : खाचा मागमूसही न दिसता आवश्यक ती कामं काहीही न बोलता शांतपणे व हळूहळू पार पाडणारी माणसं . तशीच , वादळानं समुद्रकिनाऱ्यावर आणून फेकलेल्या सागर वनस्पती गोळा करणारी माणसंही आम्हाला दिसली . त्यात मिसळलेल्या चिंध्या त्यांना वेचून वेगळ्या काढाव्या लागत होत्या . कोणत्याही क्षणी त्यांना वनस्पतीखाली एक मृतदेह सापडण्याचीही शक्यता होती . पण तरीही ते काम माणसं का करत होती ? थोरो लिहितात ,

“ आपल्या शेताचा पोत सुधारण्यासाठी ह्या सागरी वनस्पती बहुमोल ठरणार आहेत , हे ती माणसं विसरली नव्हती . एका म्हाताऱ्या माणसाला समुद्रानं उगाळून फेकलेल्या त्या सागरी वनस्पती लाखमोलाच्या वाटत होत्या . अन् फालतू आणि निरुपयोगी सागरी वानस्पतींप्रमाणेच हे मृतदेह त्याच्यालेखी कुचकामी होते . ” "  


4) मी अपेक्षिलं असावं , तेवढं मला त्या दृश्यानं खोलवर हेलावून सोडलं नाही . जर का मला एखादा मृतदेह समुद्रानं एखाद्या निर्मनुष्य किनाऱ्यावर आणून टाकलेला पाहायला मिळाला असता तर अधिक वाईट वाटलं असतं . मला त्या वादळ वाऱ्याबद्दल व लाटांबद्दलच सहानुभूती वाटत होती . कारण क्षुद्र मनुष्यदेह गुंडाळून टाकणं आणि त्याला छिन्नविछिन्न करणं हेच त्याचं योग्य काम होतं . जर का हा निसर्गनियम होता , तर दयामाया दाखवण्यात वेळ काय दवाडायचा ? जेव्हा लढाईच्या मैदानात असे मृतदेह पडलेले आपण पाहतो , तेव्हा आपणाला त्याचं काहीच दुःख वाटत नाही .

5)आम्हा दोघांनाही अनेकवेळा आपले ओठ चाटून पहावेत अशी इच्छा होत होती कारण हवेतल्या आर्द्रतेमुळे ओठ नेहमी खारट होत होते .  " आपण मीठ नेहमी जेवणात वापरतो , पण गुरांना त्याची गरज भासत नाही , कारण त्यांना गवताबरोबर आणि प्रत्येक श्वासाबरोबर क्षारांचा पुरवठा होत असतो .

6)खरं तर गावाची तुलना गावाशीच केली पाहिजे, निसर्गाशी नाही,
असं मला वाटतं. जे लेखक गावांबद्दल सुंदर असं सहज बोलून जातात,
त्यांच्याबद्दल मला फारसा आदर वाटत नाही. थकलेल्या प्रवाशाला अथवा
परतलेल्या गाववाल्यालाच फक्त गाव सुंदर वाटू शकतं. जो माणूस नुकताच
अरण्यातून आला आहे आणि दरिद्री घरांमधून वाट काढत जाणाऱ्या उघड्या बोडक्या रस्त्यांनी निघालेला आहे, त्याला गाव सुंदर वाटणं शक्यच नाही.


©️ Moin humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼