द लिजेंड ऑफ थोरो 💜



थोरो हा नाव मी पूर्वी कोठेतरी वाचलं आणि ऐकलं होतं. तेव्हापासूनच मला त्यांच्या बाबतीत वाचायचं होत आणि खूप खूप जाणून घ्यायचं होत..मी त्यांच्या साहित्याचा शोध घ्यायला सुरुवात केली पण त्यांच सर्व साहित्य हा इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने मी निराश झालो होतो कारण मला विशेष हे मराठीत हवे होते.अशातच मला १९६५ साली त्यांच्या ‘वॉल्डन’ या पुस्तकाचा दुर्गा भागवत मॅम यांनी केलेल्या ‘वॉल्डनकाठी विचारविहार’ या नावाच्या अनुवादाबद्दल माहिती मिळाली.मी हे पुस्तक खूप शोधलं पण कोठेही मिळालं नाही..यामुळे मी काही इंटरनेट वर उपलब्ध असणारे काही आर्टिकल्स वाचले तर युट्युबर उपलब्ध असलेले काही व्हिडिओस बघितले पण हवी तेवढी माहिती मला काही मिळाली नाही.अशातच मागच्या वर्षी जुलै महिन्यात फेसबुकवर Vishal दादाची थोरोबद्दल एक अप्रतिम आणि शानदार पोस्ट बघितली.त्या पोस्टमध्ये थोरोचे एकंदरीत जे विचार ऍड केले होते ते वाचून तर मी कमालीचा आनंदीत झालो मी ती पोस्ट सेव सुद्धा करून ठेवली.आणि येथूनच काही काळासाठी तरी माझ्या डोक्यातून Exit केलेल्या थोरोने माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा शानदार Entry केली.मी पुन्हा दुर्गा भागवत यांच्या पुस्तकाचा शोध घेत सुटलो पण आता सुद्धा मला ते पुस्तक काही मिळालं नाही पण मधूश्री प्रकाशनाचे प्रकाशक Sharad Ashtekar सरांच्या वॉलवर जयंत कुलकर्णी सरांनी अनुवाद केलेलं आणि मधूश्री पब्लिकेशन प्रकाशित वॉल्डन या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली..तेव्हा मला जी खुशी झाली ती मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही..तहानलेल्या व्यक्तीला विहीर दिसावी अशी माझी अवस्था झाली होती.प्रकाशित होताच मी हे पुस्तक मागवलं आणि मिळताच वाचायला घेतलं आणि वाचतंच गेलो.शानदार जबरदस्त जिंदाबाद अनुवाद असलेल्या या पुस्तकाला मी २ दिवसांतच वाचून पूर्ण केलं आणि वाचल्यावर त्याबद्दल इतरांना माहिती व्हावी म्हणून २ शब्द लिहले सुद्धा..जेव्हा पासून मी हे पुस्तक वाचून संपवल तेव्हापासून मी त्याला परत कपाटात ठेवलेच नाही.वॉल्डनला मी माझ्या अजूनही  नजरेसमोरच ठेवले आहे आणि नेहमी असेच ठेवनार..

जेव्हा पासून मी वॉल्डन वाचून पूर्ण केलंय तेव्हापासून मी हेन्नी डेव्हिड थोरो या अवलिया माणसापासून प्रचंड प्रभावित झालो आहे..या माणसाचे विचार वाचून मी एकंदरीत यांच्या प्रेमात बुडालोय. गौतम बुद्धांच्या नंतर निसर्गाच्या आणि त्यांच्या विचारांच्या बाबतीत या व्यक्तीने मला भारावून टाकलंय.पर्यावरण,प्राणी,अहिंसा,भटकंती,साधी जीवनशैली आणि त्यांच्या अफलातून विचारांच्या बाबतीत गौतम बुद्ध हे माझे पहिले गुरू आहे तर थोरो हे दुसरे..१२ जुलै १८१७ रोजी अमेरिकेतील मसेच्युसेट्स या जिल्ह्यातील कॉकार्ड या तालुक्यात हेन्नी डेव्हिड या अवलीयाचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता.त्यांच्या घरात चालत आलेला व्यवसाय शिसपेन्सिली बनवण्याचा असल्याने पुढे हॉवर्ड विद्यापीठातुन पदवी घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी हा व्यवसाय केला.. आणि नंतर एका शाळेत काही काळ नोकरी केली.पण त्यांचा मन तेथे सुद्धा काही रमला नाही.म्हणून त्यांनी ती नोकरी सोडून दिली.पुढे त्यांनी मिळेल ते काम करत करत भटकंती सुरू केली.यासोबत नेहमीच गुलामगिरीच्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली.आपल्या लिखाणातून,कवितेतून त्याबद्दल प्रबोधन केले..गुलामगिरी राबवणाऱ्या सरकारला टॅक्स भरणं हे त्यांना पाठिंबा देणे होय हा विचार करून त्यांनी टॅक्स भरणंच बंद केलं.५-६ वर्षे टॅक्स भरलाच नाही.यामुळे त्यांना तेथील स्थानिक यंत्रणेने तुरुंगात टाकलं.त्यांनी दोन दिवस तुरुंगात काढले.पुढे त्यांनी यावर सिव्हिल डिसओबिडियन्स(सविनय कायदेभंग)नामक लेख लिहिला तो पुढे जगभर गाजला.गांधीजी सह अनेकांनी त्यावरून प्रेरणा घेतली..अवघ्या ४३ वर्षांच आयुष्य लाभलेल्या या माणसाने संपूर्ण जगाला भुरळ पाडली आहे.
 अमेरिकन असून सुद्धा संपूर्ण जगाला आपला वाटणारा असा लेखक,विचारवंत आणि निसर्गवादी पुन्हा होणे नाही..कार्ल मार्क्सच्या समकालीन असलेल्या या अवलिया बद्दल वाचावं आणि वाचतंच जावं असा हा ग्रेट माणूस एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला पण तरीही या माणसाचे विचार आजच्या युगात सुद्धा तेवढेच प्रासंगिक आहेत किंवा त्यापेक्षा जास्त म्हणा.त्याकाळापेक्षा आजच्या काळात थोरो गुरूच्या विचाराची जास्त गरज विश्वाला आणि समस्त मानवजातीला आहे.स्वार्थी मानवाच्या हाताने निसर्गाचा होत चाललेला वऱ्हास थांबवण्यासाठी आपल्याला थोरो गुरूच्या विचारांना समोर ठेऊनच चालावे लागणार आहे.निसर्गाशी तादात्म्य पावणारे समाजजीवनच खऱ्या अर्थाने सुखीसंपन्न असते आणि सुखी व संपन्न जीवनाची माणसाला, समाजाला नितांत गरज आहे. ही भूमिका घेऊन जेव्हा मानव चालेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण या पृथ्वीवर टिकू शकतो अथवा एकामागे असे भयंकर आजार,त्सुनामी,सायक्लोन येतच राहणार आणि उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात हिवाळा हा असला विचित्र ऋतुचक्र सुरूच राहणार आणि वाढतच जाणार..मी या अवलियाच्या विचाराच्या एवढं मोहात पडलोय की मी माझ्या मोबाईल आणि लॅपटॉप च्या स्क्रीनवर आणि पुस्तकाच्या कपाटावर यांच्या एका Quote सोबत त्यांचा फोटो लावला आहे यावरून तुम्ही यांनी मला किती प्रभावित केलंय हे समजू शकता.अरे ज्या माणसाने मोहनदास करमचंद गांधी आणि इतर काही महान व्यक्तिमत्वाला प्रेरीत आणि प्रभावित केलंय तर ते आपल्याला प्रभावित केल्याविना राहणार कसे..त्यांचे विचार वाचूनच आपल्याला त्यांच्या थोरपणाची प्रचिती येते..

त्यांचे काही विचार जे फक्त वाचूनच आपण अंतमूर्ख होतो....💜

१)सूर्य , वायू , पर्जन्य आणि निसर्गाच्या निरागस , कुठलीही अपेक्षा न ठेवता दाखविलेल्या औदार्यामुळे आज आपण आनंदी आहोत , आपली प्रकृती उत्तम आहे. आणि हे औदार्य आपल्याला जन्मभर उपभोगायला मिळणार आहे . निसर्गाच्या मनात तर मानवाबद्दल एवढी अनुकंपा , प्रेम भरले आहे की मला खात्री आहे की मानवाला योग्य कारणासाठी थोडेसे जरी दुःख झाले तरी सूर्य दुःखाने झाकाळून जाईल . वायू मानवाप्रमाणे उसासे टाकेल आणि ढग अश्रू ढाळतोल . जंगलांची खाने पानगळ होईल , अशा या पृथ्वीशी मी का नाही बोलू शकत ??

२)ऋतू चक्रातील प्रत्येक ऋतूवर मनापासून प्रेम करा, उत्कटपणे तो ऋतू जगा. प्रत्येक ऋतूत हवा वेगळी असते, पाणी वेगळे असते, फळे वेगळी असतात त्यामुळे प्रत्येक ऋतूत या सगळ्याचा आस्वाद घ्या. त्या त्या ऋतूत मिळणारी फळे, हवा, पाणी हाच तुमचा आहार असू देत. तुमची पेयं आणि तीच तुमची औषधे असू देत. ऑगस्ट महिन्यात फक्त बेरीज वर राहा. त्या महिन्यात मांसाहार वर्ज्य करा. असे समजा की तुम्ही एखाद्या निर्जन वाळवंटातून किंवा सागरातून प्रवास करत आहात आणि बेरीज शिवाय तेथे काही मिळत नाही. अंगावर जरा वारा घ्या. शरीरातील रंध्रे उघडू द्या आणि निसर्गाच्या लाटांमध्ये, झर्‍यांच्या पाण्यामध्ये, महासागरांच्या लाटांवर स्वार होत त्यात स्नान करा।
निसर्गालाच तुझ्यासाठी खर्‍या मद्याचे प्याले भरू देत कारण निसर्ग प्रत्येक क्षणी आपल्याला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. शिवाय हे काम तो खास तुझ्यासाठी आणि विनामोबदला करत असतो. त्याचे अस्तित्व यासाठीच तर आहे. त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष विरोध करणे हा आपला मूर्खपणा। निरोगी राहण्याची तुमची इच्छा जर तीव्र असेल तर निसर्ग तुम्हाला निरोगी राहाण्यासाठी मदतच करणार हे निश्‍चित. माणसाला आरोग्यासाठी निसर्गातील काही गोष्टींचाच फायदा कळला आहे..

३)गर्दीत मखमली गद्द्यावर बसण्याऐवजी मी भोपळ्यावर एकटाच बसणे पसंत करतो..

४) “व्यस्त राहणे पुरेसे नाही, मुंग्याही व्यस्त राहतात.  प्रश्न आहे - आपण कशासाठी व्यस्त आहोत? "

५)नद्या आणि तलाव ही पृथ्वीवरील सर्वात सुंदर आणि मौल्यवान वस्तू आहेत, ही पृथ्वीचे डोळे आहे, ज्याला निसर्गाचे दर्शन होते त्याला त्याची खोली माहित असते.

६)सर्व प्रकारच्या विलासी आणि सुविधांच्या बाबतीत, सर्वात हुशार लोक अधिक साधे जीवन जगतात आणि कमी-अधिक गोष्टींमध्ये काम करतात. ”

७) प्रेमातून सुटका करून घ्यायचीये ? मग अधिक प्रेम करा.

८) हे वन्यसंशोधक बिनडोक असतात. दुर्मीळ जातीचा, निसर्गात अखेरचा राहिलेला पक्षी ते बंदूकीने मारतात आणि पहिल्यांदा रिपोर्ट केल्याचे श्रेय मिळवतात.

९)मला राजवाड्यात ठेवले तर मी मागच्या दाराने लगेच पळून जाईन.

१०)एखादी गोष्ट कायदेशीर असेल तरी ती न्याय्य असेल असं नाही.

११)एखादा माणूस आसपासच्या लोकांशी जमवून घेऊ शकत नसेल तर कदाचित त्याला वेगळं संगीत ऐकू येत असेल.त्याला त्या संगीताच्या दिशेनं जाऊ द्यावं.मग ते किती जवळ वा लांब असेना.

१२)"आजारी पडणं आरोग्यासाठी बरं असतं.

१३)जे सरकार जुलमाने लोकांवर अन्याय करत असेल तर त्या समाजात सज्जन माणसांची एकच जागा असू शकते, ती म्हणजे तुरुंग.

१४)जन्मत: मी जेवढा शहाणा होतो, नंतर तेवढा राहिलो नाही याचे मला फार दु:ख होते.

१५)एखादी संस्कृती मरू घातलेली असते, तेव्हा तिला आपली स्मारके उभी करायची घाई झालेली असते.

१६)तुम्हाला जेवढा मेंदू शिकवतो तेवढंच हातपायही शिकवतात.

१७)हृदय नेहमीच अननुभवी असतो.

१८)Any Fool can Make Rules And Any Fool will mind It "

१९)कुठलंही सरकार माझ्या विचारांवर माझ्या वागण्यावर अनिर्बंध सत्ता गाजवू शकत नाही.मला मान्य असलेल्या भागावरच मी त्यांना सत्ता गाजवायची परवानगी देईन.

२०)मला एकांतवसाईतका छान मित्र अजून मिळाला नाही.सकाळी मला खूप कंपनी असे.विशेष:-बाहेरून कोणी आलं नाही तर !!

वॉल्डन बद्दल दोन शब्द...💜

२ वर्ष २ महिने २ दिवस कंकाॅर्डजवळच्या वॉल्डन नामक तळ्याकाठी जंगलात वास्तव्य करून तेथे काय काय केलं याचं वृतांत त्यांनी #वॉल्डन या आपल्या पुस्तकात केलेलं आहे.आपले अनुभव सांगता सांगता जीवनातील अनेक समस्यांविषयीचे आपले विचारही त्यांनी या पुस्तकात व्यक्त केले आहेत.वॉल्डन’ या तळ्याकाठी त्यांनी लाकडाच आपल्या हाताने घर बांधला,शेती केली आणि निसर्गात जे मिळेल ते खाऊन सव्वादोन वर्षे ते तेथे राहिले. तेथे त्यांनी निसर्गाचं, तेथील पशुपक्ष्यांचे, झाडाझुडपांचे निरीक्षण आणि अभ्यास केलं.एकंदरीत निसर्गाशी पूर्णपणे एकनिष्ठ राहून त्यांनी २ वर्ष तेथे काढले. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी स्वकष्टाच्या जीवनाचा आनंद लुटला.या पुस्तकातून त्यांनी मानवी आयुष्यातील काही अशा गोष्टीवर थोरोंनी प्रकाश टाकला ज्याबद्दल आपण कधीही आणि केव्हाही विचार करत नाही..वॉल्डन वाचत असताना आपल्याला निसर्ग,वाचन,संगीत,प्राणी/पक्षी प्रेम,स्वकष्ट आणि एकांताचे महत्व कळते.इ.सन १८५४ रोजी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे अनेक भाषांत अनुवाद झालेले आहेत.हे पुस्तक म्हणजे निसर्गवादी विचारांच्या ग्रंथांचे ‘बायबल’ होय..त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने नक्कीच वाचा आणि इतरांना सुद्धा सुचवा..

संदर्भ :-वॉल्डन,अनिल अवचट लिखित शिकविले ज्यांनी या पुस्तकातील थोरोचे विश्व हा लेख आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली काही माहिती..💜✍️🤘🏼
©️Moin Humanist ✍️

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼