उपरा 💜

लक्ष्मण माने लिखित उपरा हे दलित साहित्यात मोडणारे हृदयस्पर्शी पुस्तक जेव्हा दुसऱ्यांदा वाचलं तेव्हा हे पुस्तक पुन्हा नव्याने उमजले...काही अशा भयानक बाबी लक्षात आल्या ज्या पहिल्या वाचनात आल्या नव्हत्या..

शेकडो वर्षे बिऱ्हाड आपल्या पाठीवर घेऊन पोटासाठी गावोगावी फिरणाऱ्या मंडळीच दुःख आणि त्यांच्या समस्या आपल्या समोर या पुस्तकांमधून येत असतात...लेखकांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलेलं आहे..जात-धर्म,जातीवाद,अंधश्रद्धा,रूढी-परंपरा,उच-नीच,गरिबी,आंतरजातीय विवाह,महिलांसोबत आपली वागणूक ,जात-पंचायती मधी चालणारे ते न्यायनिवाडे इत्यादी ..हे पुस्तक वाचत असताना माझे किती वेळा डोळे पाणावले असतील हे मी शब्दात सांगू शकत नाही .पुस्तक वाचत असताना आपल्या मनामध्ये खूप वेदना होत असतात समाजाची चिड येते आणि समाजाकडे बघण्याचा एकंदरीत दृष्टिकोन बदलतो..वाचत असताना आपण सुद्धा याचाच एक भाग आहोत आणि या लोकांकडे कानाडोळा करून चालणार नाही याची प्रचिती मला आली.आज जरी एवढी भयानक परिस्थिती नसली तरीही जेव्हा सुद्धा पाठीवर आपला बिऱ्हाड घेऊन फिरणारी ही लोकं मला दिसतील तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेला असेल.

 पुस्तकात आपल्या समाजात नेहमी चालणाऱ्या काही अशा गोष्टींवर भाष्य केले आहे जे वाचून आपण विचारात गुंतत जातो.जेव्हा लेखक व्याजाने कर्ज घेऊन नवसासाठी कोंबडे, बकरे कापण्याच ज्याप्रकारे वर्णन करतात तेव्हा तर आपल्याला या प्रकाराचा किळस येतो...आपल्याच समाजाची दुसरी बाजू आपल्याला या पुस्तकांमधून अवगत होत जाते..उकांड्यावर तीन दगडाच्या चुलीवर मांडलेला तो संसार,दिवसभर गाढवामागं फिरणे,बा च दारू पिऊन आई ला मारणे,धान्य साठवण्यासाठी ची कनगी बनवण्याचं कार्य तो सुद्धा  लोकांच्या शेतातून चोरून आणलेल्या फोकीने(हे वाचून मला फँड्री चित्रपटातील जब्याच्या कुटुंबाची आठवण आली),लग्न कार्यात खांदे दुखोस्तर ढोलकी वाजविणे व उंकड्यावर वेगळ्या पंगतीत जेवणे, कधीकधी २-३ दिवस उपाशीच राहणे,घरं दार सोडून पोटासाठी वर्षभर भटकायचं आणि दसऱ्याला किंवा चैत्रीला घरी यायचं व कर्ज घेऊन तो अंधश्रद्देपोटी केलेलं नवस फेडायचं,आंतरजातीय विवाह केल्याने लेखकाच्या कुटुंबातील लोकांना वाडीत टाकणे,लग्न केल्यावर लेखकाचे व त्यांच्या पत्नीचे होणारे बेहाल इत्यादी प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो..

"दुनिया मे कितना गम हैं,
मेरा गम कितना कम हैं !!

हा कडवा माझ्या मेंदूत सारखा गिरक्या घालत होता.

दारिद्रय आणि उपेक्षित लोकांच जीवन आपल्याला या पुस्तकातून कळतो.त्यांच्या कडे बघण्याचा आपला नजरिया बदलतो.त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होते.एवढी या पुस्तकाच्या लिखाणात ताकद आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर मला माझ्या आयुष्यातील सर्व समस्या खूपच क्षुल्लक व कमी वाटू लागल्या आहेत..

सर्वांनी एकदा नक्कीच वाचा...🙏

©️ Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼