असुरवेद 💜
शेवटी आज असुरवेद या रोचक आणि सांस्कृतिक श्रद्धा उध्वस्त करणाऱ्या कादंबरीचे वाचन पूर्ण झाले.संजय सोनवणी सर लिखित २४० पृष्ठसंख्या असलेल्या या कादंबरीसोबतचा प्रवास हा माझ्यासाठी एकंदरीत अफलातून असा ठरला.या तीन दिवसांच्या वाचनात मला खूप काही नवीन व महत्वपूर्ण माहिती मिळाली ज्यावर विश्वास करणे जरी कठीण असले तरीही लेखकांनी ते ज्याप्रकारे योग्य व तार्किक संदर्भ आणि गृहीतके देऊन आपल्यासमोर सादर केले आहे ते आपल्याला विचार करायला नक्कीच भाग पाडतात.कादंबरी लिहण्यासाठी लेखकांनी घेतलेली मेहनत व केलेला अभ्यास हे आपल्याला पावलोपावली वाचन करत असताना जाणवतो.
या जॉनर ची #प्रतिपश्चंद्र वाचलेली ही माझी पहिली कादंबरी होती तर #असुरवेद ही दुसरी ठरली.या जॉनर मध्ये इतिहासातील एखादा प्रसंग घेऊन त्याला थोडी काल्पनिकतेची जोड दिलेली असते व एक जबरदस्त कथा गुंफून एखाद्या रहस्यमय खजिन्याचा शोध या जॉनरच्या पुस्तकामधुन घेतल्या जातो.शोध,प्रतिपश्चंद्र, विश्वस्त या तिन्ही कादंबऱ्यामध्ये एखाद्या रहस्यमयी खजिन्याचा शोध घेतला गेला आहे तर याच जॉनरच्या #असुरवेद या कादंबरीमध्ये एका अज्ञात #वेदाचा शोध घेण्यात आला असून जो वाचताना आपण त्यामध्ये हरवून गेल्या शिवाय राहत नाही,एकदा वाचन सुरू केल्यावर वाचून पूर्ण केल्याशिवाय आपण खाली ठेवूच शकत नाही एवढं या कादंबरीत आपण गुंतून जातो.आता नेमकं पुढे काय ? याचीच उत्सुकता आपल्याला लागलेली असते.
✍️ पुस्तकाबद्दल २ शब्द.....
आपल्याला आजपर्यंत किती वेद माहिती आहेत ??
असा प्रश्न विचारल्यावर आपण हमखास उत्तर देऊ की ४ - ऋग्वेद, सामवेद,यजुर्वेद,अर्थवेद.कारण आजपर्यंत आपण हेच वाचत आजपर्यंत वाचत व ऐकत आलोय.पण खरंच वेद हे चारच होते का ??याबद्दल आपण कधीही विचारच केलेला नाही.पण आता जर आपल्याला कोणी सांगितले की वेद हे चार नसून आठ होते बाकीचे चार वेद सर्पवेद,पिशाच्चवेद,गंधर्ववेद आणि असुरवेद हे नष्ट झाले किंवा करण्यात आले होते तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.आता मग हे वेद कोणी नष्ट केले ?? कसे नष्ट झाले किंवा केले ??केव्हा नष्ट झाले किंवा केले ??व यामागचं नेमकं कारण काय ??इत्यादी असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला #असुरवेद ही कादंबरी देते..या चारही नष्ट झालेल्या वेदांचा उल्लेख गोपथ ब्राहाणात असून "Hymns Of Artharva Veda या ग्रंथाच्या प्रस्तावनेतही याचा स्पष्ट उल्लेख आहे. नष्ट झालेल्या/केलेल्या वेदांपैकी एक असलेल्या #असुरवेदाच्या शोधाची ही चित्तथरारक कथा आपल्याला हलवून सोडते.या एका वेदावरच या कादंबरीत प्रकाश टाकण्यात आलंय. असुरवेदाच्या शोधासोबतच इतर खूप साऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला विचार करायला भाग पाडणारी माहिती मिळते जसे की "पंढरपूरातील विठ्ठलाची मूर्ती आजपर्यंत तीन वेळा बदलण्यात आली , विठ्ठलाचे जन्मस्थान नेमके कुठले ??विठ्ठल नेमके कोणाचे शैव की वैष्णवांचे ??पंढरपूराला पंढरपूर हे नाव नेमके कसे पडले ??पुंडरीक की पुंडलिक ??
असुर वरुण की वरुण ??देशातील महत्वपूर्ण धार्मिक संघटना कश्याप्रकारे काम करते ??यांच्या काटकारस्थानाच्या मध्ये कोणी आलं तर हे त्यांचा काय हाल करतात ??खरा इतिहास कश्याप्रकारे लपवुन छुपा अजेंडा कश्याप्रकारे चालवल्या जातो ??भारताचा सांस्कृतिक इतिहास जसा सांगितला जातो तो तसा नाही ?? इत्यादी असंख्य प्रश्नांची उत्तरे आणि माहिती आपल्याला लेखकांनी योग्य संदर्भ देऊन पटवून दिली आहे..
कोणतेही स्पॉयलर न देता थोडक्यात पुस्तकाच्या कथेचा गाभा मी येथे लिहितोय..
औरंगाबाद येथील इतिहास संशोधक सुरेश जोशी यांना सांस्कृतिक उलथापालथ घडवू शकणारे पैशाच्ची भाषेतील एक हस्तलिखित सापडते.अशातच एका धार्मिक संघटनेकडून त्यांची हत्या केल्या जाते व हा हस्तलिखित तेथून गायब केल्या जातो.पोलिस येतात व पोलिसांचा तपास सुरू होतो.पोलिस सुरेश जोशींवर मूर्ती तस्करीचा आरोप करतात.त्यांची मुलगी सायली हे आरोप धुडकावून लावते व आपल्या एका पंढरपूर येथे मिळालेल्या बौद्ध मित्राची मदतीने हस्तलिखिताचा तपास सुरू करते.अशातच खूप साऱ्या महत्वपूर्ण घटना घडतात व आता हे दोन्ही मिळून त्या हस्तलिखिताचा शोध घ्यायला सुरुवात करतात.यांना सुद्धा त्या धार्मिक संघटनेकडून धोका असतो पण हे सर्व न जुमानता आपलं तपास सुरूच ठेवतात व अनेक धागे दोरे जोडून हे त्या हस्तलिखितामध्ये नेमकं काय होते याचा ते पत्ता लावतातच..
आता पुढे नेमकं काय होते ??
त्या हस्तलिखितामध्ये काय असते ?
सुरेश जोशी यांची हत्या का केली जाते व ही हत्या नेमकी कोण करतो ??त्या हस्तलिखितामध्ये असं काय रहस्यमय असतो ?? इत्यादी असंख्य प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या कादंबरीतच मिळतील...आता यापेक्षा जास्त काहीही लिहलं तरीही स्पॉयलर येतील आणि मला स्पॉयलर द्यायचे नाहीत त्यामुळे तुम्ही ही कादंबरी नक्कीच वाचा आणि इतरांना सुद्धा सुचवा...🙏❤️
©️Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा