देवळांचा_धर्म_आणि_धर्मांची_देवळे 💜


आज प्रबोधनकार ठाकरे लिखित देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे हे छोटेखानी २४ पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक एका बैठकीत ३ ऱ्यांदा वाचलं...२-३ वर्षांपूर्वी जेव्हा प्रथमच वाचलं होतं तेव्हा अक्षरशः काहीच समजलं नव्हतं सर्व एकंदरीत डोक्यावरून गेलं होतं कारण पुस्तक जरी मराठीमध्ये असले तरी पुस्तकातील भाषा ही किचकट आहे व काही असे शब्दार्थ पुस्तकात आहे त्याचे अर्थ कळणे थोडे कठीण आहे व तेव्हा वैचारिक पातळी प्रगल्भ सुद्धा नव्हती..पण आज जेव्हा हे पुस्तक एकदा पुन्हा वाचलं तेव्हा यातून खूप काही नवीन उमजल/समजलं,खूप नवीन शिकायला मिळाले...हे पुस्तक जरी छोटेखानी असली तरीही यातून मिळणारी माहिती ही खूप मोठी आहे प्रत्येक वैचारिक मित्रांनी वाचायलाच हवे असे हे एक क्रांतिकारी पुस्तक आहे...

पुस्तकांवर टिका/टिप्पणी होऊ शकते याचा काहीजणांकडून विरोध सुद्धा होऊ शकतो पण यामध्ये सांगितलेले मुद्दे,विचारलेले/उपस्थित केलेले प्रश्न कोणीही तर्कसंगत देऊच शकत नाही एवढं मात्र नक्की... प्रबोधनकार ठाकरेंनी विद्रोही व कठोर भाषेत खूपच तार्किक पद्धतीने देवळांच्या इतिहासापासून तर आजपर्यंत या देवळांचा फायदा कोणत्या एकाच विशेष वर्गाला मिळत आहे याबद्दल भाष्य केले आहे !! देवळांचा इतिहास काय ??देवळे का आणि कशासाठी व कोणी/कधी बनवले ??बुद्धांच्या लेण्यांचा कोणी व कशाप्रकारे अतिक्रमण करून त्यामध्ये परिवर्तन केलंय ??मूळ हिंदू धर्मात देवळांना स्थान काय ??इत्यादी गोष्टींवर बहुजनांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे..आपला बहुजन समाज हा किती मूर्ख आहे व तो कशाप्रकारे याच (देवळे,नवस,देव) इत्यादीतच अडकून पडला आहे हे मुद्देसूद पटवून दिले आहे...पुस्तकात आपल्या समाजातील खूप साऱ्या अश्या गोष्टीबद्दल भाष्य केल आहे ज्याचा आपण कधीही विचार केलेला नसतो...त्यामुळे आज या पुस्तकाच्या निमित्ताने प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार या लेखात आपण बघूया अथवा जाणून घेऊ....🖋️✍️

कोणतीही गोष्ट अथवा कल्पना आधी कितीही चांगल्या हेतुने/उद्देशाने केलेली असली तरीही काळानुरूप त्यात बदल हा होतच असतो किंवा करावाच लागतो...पूर्वी एकाधी गोष्ट/वस्तूचे लोकांना नवल/स्तुत्य वाटायचे पण आता त्याच गोष्टींचे लोकांना काही विशेष असे वाटत नाही,काळानुसार जर मानवाचे आचार विचार बदलले नाही तर त्याच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहत नाही..पूर्वी जुन्या काळी काही चांगल्या उद्देशाने सुरू केलेल्या गोष्टी जर आज पापाच्या खाणी बनल्या असतील तर त्या गोष्टींना जुने ते सोने म्हणून मिरवणे हा मूर्खपणा आहे ...  ठीक असाच प्रकार आज हिंदू धर्मातील देवळांच्या बाबतीत झालेला आहे एकेकाळी चांगल्या उद्देशाने सुरू केलेले देवळे आज काही भटांचा पैसा कमावण्याचा व्यवसाय बनून गेला आहे आणि बहुजनांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा क्रमांक हा प्रथम लागतो...

देऊळ ही संकल्पना ही हिंदू धर्माची अगदी अलीकडील काळाची कमाई असून इसवी सनाच्या उदयापर्यत भारतीय इतिहासांत देवळांचा कोठेही काही सुगावा लागत नाही.. मग तोपर्यत हिंदू धर्मातील देव हे कोठे राहत होते ?? आणि विद्वान संशोधकांच्या मतें आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तींत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्षे एवढी होती, तर इतकीं वर्षे देव देवळाशिवाय जगले कसे आणि कोठें?
असे प्रश्न लेखक पुस्तकात उपस्थित करतात...
देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे देवाचें जे आलय म्हणजेच वसतिस्थान तेच = #देवालय असा अर्थ होतो... "आमचें तत्त्वज्ञान पहावें तों देव `चराचर व्यापुनि' आणखी वर `दशांगुळें उरला’.. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती हा प्रश्न सुद्धा लेखक विचारतात ?? आज मंदिर/देवळातील थाट बघितल्यावर एक वेगळीच भावना येते... इकडे गरीब जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची न्याहरी, दुपारी पंचपक्क्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण !! याशिवाय काकडआरत्या, धूपार्त्या, आहेतच..कोट्यवधि गोरगरीब हिंदू बांधवांना विशेषतः धर्मश्रद्धाळु हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यांत ठिगळ ही मिळण्याची पंचाईत पण देवांना छपरी पलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाही..मग श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणा-या देवांची स्थिति ही देवळें निर्माण होण्यापूर्वी कशी असावी ?? असा सवाल सुद्धा लेखक विचारतात !!

🖋️✍️ देव आणि देवळे या दोन संस्था कश्या अस्तित्वात आल्या ?? या प्रश्नांचा उत्तर देताना लेखक म्हणतात ....

आर्यांप्रमाणेंच सेमेटिक लोक (मेसापोटेमियाकडील लोक)
 गुरेंढोरे पाळून रोज इकडेतिकडेे वसाहत करणारे होतेे..आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काही तरी ठळक रूपरेषा आखली होती पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेंत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते... धर्म ’ शब्द उचारतांच आज आपल्या ज्या काही भावना होतात, त्या भावनांचा त्यावेळी या दोघांनाही काही थांगपत्ता लागलेला नव्हता..आर्यांनी पंजाब सर केल्यावर व त्यानंतर ही अनेक शतकें त्यांच्या धर्मकल्पनेंत देवळे नव्हतींच.. त्यांच्या संघ-व्यवस्थेंत क्षत्रियांच्या पाठोपाठ उपाध्यायांचा भिक्षुक भटांचा, वर्ग जरी निर्माण झाला होता, तरी देवळांची कल्पना कोणाच्याच मनात आली नव्हती...या बाबतींत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघांनीच प्रथमतः पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते. इजिप्त आणि मेसापोटेमियांत शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली. त्याचवेळीं प्रत्येक शहरांत एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो.. ही देवळे सामान्यतः राजवाड्यांनजीकच असत होती मात्र देवळाचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षां विशेष उंच बांधण्यांत येत असे..देवळांचा हा प्रघात फिनीशियन, ग्रीक व रोमन शहरांत ही पुढें पसरत गेला. इजिप्त आणि सुमेरप्रमाणेच आफ्रिका, युरोप आणि आशियाच्या पश्चिम भागांकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचें पाऊल पडत गेलें, तेथे तेथें देवळांची उत्पत्ती प्रथमतःच ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते...इतिहासांत देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे. या सर्व देवळांत आंतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असत होतात्यांत अर्ध पशू व अर्धमानव अशा स्वरूपाची एक मूर्ती बसविलेली असे. त्याच्या पुढें एक यज्ञकुंड असून देवाला द्यावयाच्या बळीचीं त्यावर कंदुरी होत असे ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचें प्रतिक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वसतिस्थान म्हणून मानण्यात येत होते...एकंदरीत असे म्हणता येईल की देऊळ नव्हतें तोपर्यंत देव सुद्धा नव्हते व त्यांच्या सेवकांची/भट-पुजाऱ्यांची सुद्धा गरज नव्हती 
पण देवळांत देव येऊन बसल्यावर त्याच्या पूजा अर्चणेसाठी शेकडो भट आणि भटणी, तेलबत्तीवाले, झाडूवाले, कंदुरीवाले, धूपार्ती, शेजार्तीवाले असे अनेक लोक निर्माण झाले...बहुजन समाजांतले पुष्कळ हुशार लोक सुद्धा देवळाच्या या फायदेशीर धंद्यात घुसले..भटाचें काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञांतल्या कंदु-या यथासांग करावयाच्या हे यज्ञयाग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे. लोकांची भटकी वसाहत-प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन, त्यांना शहरवासाची चटक लागत चालली होती. सहा दिवस काबाडकष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा, त्याचप्रमाणें वर्षातले काही दिवस सण मानावे, अशी प्रवृत्ती होत गेली...आणि येथूनच देवाला नवस करण्याची प्रथा सुद्धा सुरू झाली आणि आज सुद्धा आपल्याला हे बघायला मिळते..

🖋️✍️ बुद्धांच्या लेण्यांचा कोणी व कशाप्रकारे अतिक्रमण करून त्यामध्ये परिवर्तन केलंय ??यावर लेखक म्हणतात....

आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या भारतात इसवी सनाचा उदय होईपर्यंत, धार्मिक क्षेत्रांत नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीची वादळें अखंड चालू होती..आप मतलबी भिक्षुकशाहीनें नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेविला होता.. सापडेल त्या पशूचा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण यापासून ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारांत क्रांति होत गेली, बुद्धोतर काळी बहुतेक हिंदू समाज "अहिंसा परमो धर्म’वाला निवृत्तमांस बनला होता.. धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाही पार उलट्या झालेल्या होत्या.. परंतु इसवी सनाच्या २-३ ऱ्या शतकांपर्यंत हिंदु जनांत व हिंदुस्थानांत देवळे घुसवलेली नव्हती..
भटांच्या भिक्षुकशाहीनें नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून, भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या २-३ ऱ्या  शतकांत महाभारत, रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीनें फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला.. पण त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयांत देव आणि देवळे मात्र आढळून येत नाहींत.. बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या अमदानीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठीं ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ मंदिरे ही अस्तित्वांत आलेली होतीं..पुढे या संघ मंदिरात महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या हीनयान पंथाने सुरूं केल्या. हिंदुस्थानात देव-देवळांचा उगम शोधीतच गेले, तर तो या बौद्ध विहारातच बिनचुक सापडतो.. नंतर इसवी सनाच्या ७-८ व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला त्यांनी शुद्धी करून संघटनांत सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ रजपूतांच्या पाठबळानें बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या त्यांच्या विहारांची नासधूस केली...उरल्या सुरल्या बौद्धांना देशधडीला लावले. लक्षावधि लोकांना मसणवटींत पार धुडकावले..अशा रीतीनें हिंदुस्थानात हिंदु समाजांत अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्यानें अस्पृश्यता निर्माण केली ठिकठिकाणच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध-मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथें शंकराच्या पिंड्या थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींनाच थोडाबहुत फरक करून त्यांना शंकरमूर्तीचा बाप्तिस्मा दिला आणि अशारीतीनेच बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळांत झाले होते..

🖋️ टीप :-लेख खूप मोठा झाल्यामुळे बाकी काही महत्वपूर्ण मुद्दे पुढील भागात बघू.....लेखातील विचार हे लेखकांचे असून लेखाचा उद्देश्य कोणाच्याही भावना दुखवण्याचा नाही...हा लेख पूर्णपणे सदर पुस्तकाचे संदर्भ घेऊनच लिहलेला आहे फक्त काही जागी योग्य ते शब्दाची बदली केली आहे.....वाचा व प्रतिक्रिया द्या !!

@Moin Humanist ✍️

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼