अजातशत्रू 💜

तुम्हाला विश्वास होणार नाही पण मी काही दिवसांपूर्वी  चक्क भूतकाळात जाऊन आलोय आणि आता सुद्धा मनाने तेथेच वावरत आहे..आता मी भूतकाळात जाऊन आलोय म्हटल्यावर हा प्रश्न तुम्ही मला नक्कीच विचारणार की मी भूतकाळात कितव्या शतकात जाऊन आलोय ?? तर मी इ.स.पूर्व सहाव्या शतकात म्हणजेच २५०० वर्षांपूर्वी  जाऊन आलोय आणि ते सुद्धा त्याकाळातील मगध साम्राज्याचे संस्थापक बिंबिसार यांच्या साम्राज्यात..कशाप्रकारे तर मी हा टाईम ट्रॅव्हल केलंय नुकत्याच प्रकाशित झालेल्या व सुमेध दादा लिखित #अजातशत्रू या भन्नाट,रोमांचकारी आणि अफलातून कादंबरीतून..स्टोरी टेल प्रकाशित #अजातशत्रू ही कादंबरी प्रत्येक बाबतीत लाजवाब असून याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. दिढ दिवसांत वाचून पूर्ण केलेली १९० पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी एकदा हातात घेतल्यावर शेवटपर्यत आपण खाली ठेवूच शकत नाही एवढी ही कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते..

मराठी वाचकवर्ग फक्त काहीच विशेष पुस्तकांना चिटकून बसलेला आहे असा आरोप नेहमी होताना दिसतो..जुन्या काही विशिष्ट पुस्तकांनाच आपण पसंती देत असतो.सारख्या  सारख्या त्याच पुस्तकांवर चर्चा करतो पण आजकालची नवीन पुस्तके यामध्ये सुंदर भर टाकत आहेत याचा आनंद आहे..अशाच नवीन पुस्तकात अजातशत्रू ही वेगळी आणि सुंदर भर आहे..मराठी भाषेतील ऐतिहासिक कादंबऱ्यात अजून एक भर टाकावी असा लेखकाचा हेतू अजिबात नसून मराठी वाचक वर्गाला काहीतरी वेगळं आणि जबरदस्त देऊया हा लेखकाचा उद्देश्य या कादंबरीमागे होता हे विशेष.आणि या प्रयत्नात लेखक निश्चितच यशस्वी झाला आहे हे मी एक वाचकाच्या नात्याने १००% म्हणू शकतो..

आपल्या ऐतिहासिक कादंबऱ्या नायक प्रधान आहेत . आपण नायकाला हिरोच बनवून सोडतो.ऐतिहासिक गोष्टीत आपला नायक एखादा सामान्य माणूस कधीच नसतो. कारण सामान्य माणसांच उल्लेख इतिहासात नसतो. इतिहास राजे , महाराजे , सम्राट ह्यांचाच आणि त्यांच्या लढायांचा-युद्धांचा अशी समजूत आपली अजूनही आहे.. एखाद्या सामान्य माणसाच्या एखाद्या छोट्याश्या निर्णयामुळे जग बदलून गेलेलं असू शकत .एखाद्या सम्राटाच्या गोष्टीपेक्षा त्याच्या राज्यातल्या सामान्य धोब्याचं शिंप्याचं , दासीचं , गुलामाचं किंवा एखाद्या प्राण्याचं आयुष्यही जास्त रसाळ असू शकतं . मग एखादा सामान्य माणूस कादंबरीचा नायक का असू नये हा प्रश्न लेखकाला पडायचा..आणि या लेखकाच्या विचारातूनच जन्म झाला अजातशत्रू या कादंबरीचा.. एक सामान्य लोहार आणि भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट अजातशत्रू या दोघांना केंद्रभागी ठेवून #अजातशत्रू सारखी अप्रतिम कादंबरी उभी राहिली..ही कादंबरी लिहायला पावणेदोन वर्षे लागली.कादंबरी वाचताना आपल्याला लेखकाने केलेली मेहनत पावलोपावली जाणवते..बारीक सारीक गोष्टींवर सुद्धा लेखकांनी विशेष लक्ष दिलेला आपल्याला जाणवतो, कोणतीही गोष्ट सुटता कामा नये याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे..ही कादंबरी दोन भागात लिहिली गेली असून सध्या पहिला भाग प्रकाशित झाला असून दुसरा भाग सध्या स्टोरी टेल वर उपलब्ध असून लवकरच पुस्तकरूपी प्रकाशित होणार आहे..

सर्वप्रथम मला या कादंबरी बद्दल कळालं ते डॉ.प्रज्ञावंत सरांच्या फेसबुक पोस्ट मुळे त्यांनी थोडक्यात जो वर्णन केला होता तो वाचून आणि मुखपृष्ठ बघून आपण ही कादंबरी वाचलीच पाहिजे हा निर्णय लगेच घेतला...इतिहास विषयात विशेष आवडत असल्याने लगेच स्टोरी टेल यांच्या कडुन ही मागवून घेतली..काहीच दिवसांत घरपोच ही कादंबरी येऊन मिळाली आणि मी भूतकाळाच्या प्रवासाला सुरुवात केली..जसं जसं वाचत गेलो तसं तस मी इतिहासात हरवत गेलो.जयराज, मेघा,कुणिकराज ,वजीरा,उदयन,चेलना आणि बिंबिसार इत्यादी पात्र माझ्यानजरे समोर दिसत होते..अनेक प्रसंग वाचता क्षणी मी रडत होतो तर कधी मला राग येत होता तर कधी घृणा येत होती..मी मोठ्यापद्यावर एक ऐतिहासिक चित्रपट किंवा वेबसिरीज बघतोय असा मला भास होत होता..इतिहासातील काही अज्ञात बाबीला कल्पनेची जोड देत एक असा रोमांचकारी व थ्रिलर प्रवास लेखकांनी आपल्या पुढे मांडला आहे जो खरंच शब्दात सांगता येणारा नाही..भूतकाळात आणि वर्तमान काळात आजसुद्धा काही विशेष जास्त बदल झालेला नाही.अजातशत्रू वाचत असताना आपल्याला वर्तमानाची आठवण आल्याशिवाय राहत नाही एवढं नक्की..कादंबरी वाचत असताना अनेक गोष्टी आपल्याला शिकायला,अनुभवायला मिळतात तर काही विचार करायला भाग पाडतात.यासोबतच समाजातील जातीभेद,विषमता,भेदभाव,अंधश्रद्धा इत्यादी दुर्गुणावर सुद्धा वेगवेगळ्या उपकथांच्या द्वारे लेखक बखुबी भाष्य करतो..

आपल्या वडील व भावांची हत्या करून अजातशत्रू हा मगध साम्राज्याच्या गादीवर आला होता.हे आपण सर्वांनी इतिहासात वाचलेलं आहे..पण या घटनेमागची एकंदरीत पार्श्वभूमी काय होती ??अजातशत्रू नायक होता की खलनायक ??इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या कादंबरीत मिळतील..इतिहासातील या घटनेला कल्पनेची जोड देऊन खूप जबरदस्त पद्धतीने आपल्या समोर लेखकांनी अजातशत्रू या कादंबरीच्या रूपाने सादर केली आहे..अडीच हजार वर्षांपूर्वी एक खूप विचित्र घटना घडली होती ह्या काळात. मगध सम्राट बिंबीसाराचा त्याच्या स्वतःच्या मुलाने खून केला.त्या मुलाचं नाव होत अजातशत्रू हे आपल्याला माहिती आहेच पण विचित्र घटना ही नव्हती. तर पुढे जाऊन अजातशत्रूच्या मुलानेही म्हणजेच उदयनने सिंहासन बळकावण्यासाठी आपल्या बापाचा म्हणजे अजातशत्रूचा जीव घेतला होता.. हे चालतचं राहिलं . अजातशत्रूचा वंश संपेपर्यंत प्रत्येक राजपुत्र आपल्या पित्याचा बळी देत सम्राट होत राहिला ..प्रत्येक वंशजाला आपल्या बापाचा खून का करावासा वाटला असेल ? ह्या विचित्र शापाची सुरुवात कशी झाली ह्याची ही अद्भुत कहाणी आपल्याला अजातशत्रू या कादंबरीत वाचायला मिळते...त्या काळात जाऊन आपण हे सर्व प्रत्यक्ष अनुभवतोय असा फील ही कादंबरी आपल्याला देते.. प्रत्येकाने नक्कीच या भूतकाळाच्या प्रवासाला जायलाच हवे आणि या सफरीचा रोमांचकारी अनुभव घ्यावा...

आतुरता आता दुसऱ्या भागाची...💛😍

©️ Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼