शोध 💜
काही महिन्यांपूर्वी दिवंगत मुरलीधर खैरनार सर लिखित #शोध या ऑथेंटिक अस्सल मराठी थ्रिलर कादंबरीचे वाचन पूर्ण झाले.तेंव्हा फक्त आणि फक्त या कादंबरीचाच एकप्रकारे हँगओव्हर किंवा नशा माझ्यावर चढलेला होता.एक उत्कृष्ट,भन्नाट,रहस्यमयी,जबरदस्त आणि उत्कंठा वाढवणारी कादंबरी आपण याला म्हणू शकतो.काही दिवस आपल्या मनावर ताबा करून आपल्याला त्याच्याच धुंदीत ठेवन्याचा कार्य शोध ही कादंबरी खूपच अप्रतिम पद्धतीने करते.मॅथोलॉजिकल किंवा अँथ्रोपोलॉजिकल जेनर मधील #प्रतिपश्चंद्र ही मी वाचलेली पहिली कादंबरी होती त्यानंतर #असुरवेद आणि आता शोध ही या जेनरमधील तिसरी कादंबरी ठरली आणि पुढील चौथी कादंबरी ही विश्वस्त असेल.प्रतिपश्चंद्र कादंबरी वाचल्यापासून या जेनर चा मी एकंदरीत चाहता झालो आहे. इतिहासातील एखाद्या प्रसंगांचे संदर्भ घेऊन त्याला वर्तमानाची जोड द्यायची व आपल्या कल्पनेने एक भन्नाट कथा गुंफून खजिन्याचा शोध घ्यायचा जे वाचत असताना आपण पूर्णपणे त्यामध्ये हरवून जातो व बेभान होऊन उत्सुकतेने फक्त वाचत सुटतो.प्रत्येक गोष्टीत सस्पेन्स, थ्रिलर आणि नेमकं आता पुढे काय याची उत्सुकता लागलेली असते.प्रतिपश्चंद्र आणि असुरवेद बद्दल मी विस्तृत लिहलेलं आहेच त्यामुळे आज #शोध बद्दल पाहूया....
#शोध कादंबरीच्या नावावरून व मुखपृष्ठावरील सोन्याच्या नाण्यांचा फोटो बघून आपण अंदाज लावूच शकतो की ही कादंबरी एका #शोधावर आधारित आहे.
आता हा शोध कशाचा आहे ??
तर तो आहे छत्रपती शिवरायांनी १६७० साली लुटलेल्या दुसऱ्या सुरत लुटीमधील ३५० वर्षांपूर्वी हरवलेल्या खजिन्याचा. हा खजिना आजसुद्धा अज्ञात आहे.या खजिन्याचा शोध संभाजी महाराज,मोरोपंत पिंगळे व इतर अनेकांनी घेतला पण कोणालाही आजपर्यंत तो सापडलेला नाही किंवा तो खजिना कोठे हरवलेला आहे याचा पत्ता अजूनपर्यंत कोणालाही ठाऊक नाही.तो खजिना अचानक गेला तरी कोठे ?? हा एक मोठा रहस्य आहे आणि याच ऐतिहासिक घटनेला मुख्यस्थानी ठेऊन प्रचंड अभ्यास व मेहनत करून अचूक शिवकालीन अस्सल संदर्भ,ऐतिहासिक,भौगोलिक तपशील देऊन गुंफलेल्या एका रहस्यमय, थरारक,उतकंठावर्धक आणि धक्क्यावर धक्के देत जाणाऱ्या काल्पनिक कथेला वाचकांच्या समोर ठेवण्याचा सफल कार्य लेखक दिवंगत #मुरलीधर_खैरनार यांनी शोध या खिळवून ठेवणाऱ्या कादंबरीतून केला आहे.जी वाचत असताना आपण एकूणच या कादंबरीत पूर्णपणे हरवून गेल्या शिवाय राहत नाही.
कादंबरीत घडणारी प्रत्येक घटना आपल्याला आपल्या समोर घडत असल्याचा भास होतो. कादंबरीतील प्रत्येक पात्र कादंबरी वाचून पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला डोळ्यासमोर वावरताना दिसतात एवढं आपण यामध्ये बुडून जातो.केतकी,शौनक,निनाद,गोंदाजी,आबाजी,नाईक,क्लारा,जयंत आणि इतर काही पात्रांशी आपण आपल्या स्वतःशी रिलेट करत असतो.ही कादंबरी वाचल्यानंतर खरा वाचक २-३ दिवस तरी इतर कोणतेही पुस्तक हाती घेत नाही एवढं मी खात्रीने सांगू शकतो.कारण या कादंबरीचं प्रवासच एवढा अफलातून आणि रहस्यमयी आहे जो काही दिवस सारखा आपल्या मनात गिरक्या घालत असतो.आता पुढे नेमकं काय ?? हाच प्रश्न आपल्याला शेवटपर्यंत सारखा सारखा भेडसावत असतो.आणि यातच या कादंबरीचे यश आहे.या कादंबरीवर एक अफलातून यशस्वी वेबमालिका बनू शकते एवढी याच्या कथेत ताकद आहे..
ही कादंबरी फक्त खजिन्याच्या शोधापूर्तच मर्यादित नसून त्याच्याही पुढे जाऊन वाचकांना अनेक बाबतीत माहिती देऊन वाचकांच्या ज्ञानात भर घालते.
काही उदाहरण बघूया :- आदिवासी समाजातील #भाया या देवखेळा आणि गौळा याबद्दल केलेले विश्लेषण आणि सोबतच नाशिक येथील सातमाळा पर्वत,किल्ले त्यांचा भौगोलिक वैशिष्ट्य,नाशिक येथील ग्रंथालय व परिसरातील वेगवेगळ्या गावखेडे,परिसर व तेथील श्रद्धा आणि सणांचे केलेले वर्णन याला कुठलाही तोड नाही.हे वर्णन वाचून केव्हा मी नाशिक व आजूबाजूच्या परिसराला भेट देतो असं झालं आहे.लेखकांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी असलेल्या अभ्यासाची प्रचिती आपल्या अनेक वेळी येत असते.उदाहरण ट्रेकिंग, खजिना शोधण्यासाठी वापरण्यात येणारे सिकोरस्की जातीचे हेलीकॉप्टर व् मेटल डिटेक्टर, ड्रोन,सोशल मीडिया,जिमेल, मोबाईलचा वापर, इत्यादी काही गोष्टींची माहिती अशा प्रकारे दिली आहे जी आपल्या ज्ञानात भर पाडते.
यासोबतच नाशिकच्या ब्रिटिश कलेक्टर एम.टी. जॅक्सन याची दुसरी बाजू सुद्धा लेखकांनी चपखल पद्धतीने मांडली आहे ज्याबद्दल आपण कधीही विचार केलेला नाही ती बाजू आपल्याला लेखकांनी दाखवली आहे जसे की जॅक्सन हा एक ज्ञानपिपासू होता त्याने आपल्या आयुष्यात कमावलेली सर्व संपत्ती ज्ञानाजर्नासाठी खर्च केली होती.त्याच्या हत्येनंतर त्याच्या बायकोला इंग्लडला परत जायला भाड्यासाठी सुद्धा पैसे नव्हते इत्यादी काही गोष्टी वाचून आपण विचारात गुंतून जातो.लेखकांनी पावलोपावली घेतलेली मेहनत बघून आपण लेखकांचे चाहते झाल्याशिवाय राहत नाही.#शोध वाचत असताना मुरलीधर सरांच्या प्रति एक आदर निर्माण होतो..सर आज हयात हवे होते कादंबरी वाचून सरांच्या लेखणीचा चाहता झालो त्यांना भेटायची इच्छा अधुरी राहिली याचं खूप दुःख आहे..शोधचा दुसरा भाग वाचायला फार फार आवडला असता पण ते म्हणतात ना की नियतीच्या पुढे कोणाचेही काहीही चालत नाही "सरांना आदरांजली वाहून आता पुढे दोन शब्द कादंबरीच्या कथेबद्दल बघूया..
✍️ कादंबरीची कथा -
✍️ भुतकाळ :-
आपल्या हयातीत शिवरायांनी दोन वेळेस सुरत येथे लूट केली.पहिली लूट १६६४ साली तर दुसरी १६७० साली.शिवाजी महाराजांची पहिली लूट सुखरूपपणे राजगडावर येऊन पोहोचली पण दुसरी लूट मात्र यशस्वीपणे राजगडावर येऊन पोहचू शकली नाही.दुसऱ्यांदा सुरत लुटल्यानंतर शिवराय आपल्या मावळ्यांच्या सह १२ हजार जनावरांच्या पाठीवर लुटलेला प्रचंड मोठा ऐवज लादून सुरतेतून स्वराज्यात यायला निघाले.ही बातमी गनिमांना येऊन मिळाल्यामुळे शत्रूंना हुलकावणी देण्यासाठी शिवरायांनी एक योजना आखली.त्यांनी या लुटीची संपत्ती व फौजफाटा दोन गटात विभागून त्यांची वेगवेगळ्या वाटेने रवानगी केली.पहिली तुकडीचा प्रमुख आनंद मकाजी दिलेला ऐवज घेऊन सुरक्षितपणे राजगडावर पोहोचला मात्र दुसरी तुकडी राजगडावर पोहचू शकली नाही.या दुसऱ्या तुकडीचा प्रमुख गोंदाजी नारो हा होता व यासोबतच २ हजार सैनिकांची तुकडी व ७ हजार घोड्यावर लादलेला ऐवज होता.
गोंदाजी नारोला वाटेत गनिमांना झुंज द्यावी लागली आणि दुर्दैवाने या झुंजीत सर्व सैनिक मारले गेले आणि गोंदाजी नारोला मुघलांनी पकडले.पण गोंदाजी जवळचा खजिना/ऐवज मात्र गनिमांच्या हाती लागला नाही. कारण गनिमांना झुंज द्यायच्या आधीच गोंदाजी यांनी सारा ऐवज डोंगरात कोठेतरी लपवून ठेवला होता.लपवलेल्या ऐवज/संपत्तीच्या ठिकाणासाठी गोंदाजी यांना खूप यातना देण्यात आल्या पण शेवटपर्यंत त्यांनी कोणालाही त्या ठिकाणाबद्दल मात्र काहीही सांगितलं नाही आणि कैदेत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृत्यूपूर्वीचं त्यांनी त्या लपवलेल्या ऐवजाच्या ठिकाणाबद्दल एक पत्र शिवरायांच्यासाठी लिहून तो पोहोचवायचा बंदोबस्त करून ठेवला होता पण तो पत्र शिवाजी महाराज यांच्याकडे कधीही पोहोचू शकला नाही..कारण गोंदाजींनी शिवरायांच्यासाठी लिहलेला पत्र ज्या इंग्रज अधिकाऱ्याजवळ सोपवला असतो त्याला तात्काळ इंग्लंडला परत जावे लागते आणि पुढे इकडे काही वर्षानंतर शिवरायांच सुद्धा निधन होतो आणि हा रहस्य रहस्य बनुनच राहतो.
✍️ वर्तमानकाळ :-
आता ३५० वर्षांपूर्वी अज्ञात जागी लपवलेल्या त्या खजिन्याचा शोध काही जण घेत आहे.ज्याची किंमत आज २५ लाख कोटी रुपये एवढी आहे.या खजिन्याचा शोध शेकडो वर्षांनी अनेक जणांनी घेतला पण त्याचा मात्र पत्ता कोणालाही लागला नाही. केतकी देशपांडे ही तरुणी जी एक खोजनार असून तिने आपले सम्पूर्ण आयुष्य हा खजिना शोधण्यासाठी समर्पित केलं आहे.खोजनार वंशजातील १९ पिढीतील ही एक तरुणी आहे जी आपल्या एका मित्रांसोबत(शौनक) मिळून या खजिन्याचा शोध घेत असते.अनेक धागेदोरे जोडून ते खजिन्याच्या खूप जवळ पोहोचलेले असतात पण यांच्यासोबतच या कहानीतील खलनायक आबाजी व अजित चौधरी नामक व्यवसायिक सुद्धा या खजिन्याच्या शोधात असतात. त्यांच्या व त्या खजिन्याच्या मध्ये आलेल्या प्रत्येक अडचणीला ते लगेच ठार करत असे.
अशातच केतकी आणि आबाजीला अर्धा-अर्धा नकाश्याचा वेगवेगळा तुकडा सापडतो आणि येथूनच सुरू होतो केतकी विरुद्ध आबाजी असा पाठलागाचा एक चित्तथरारक खेळ.आता हा खजिना कोण सर्वप्रथम शोधतो ??हा खजिना नेमका सापडतो का ??केतकी हा खजिना का शोधत असते ?? इत्यादी काही असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोध या कादंबरीत मिळतील..यापुढे काही जास्त मी लिहू शकत नाहीं कारण स्पॉयलर मला अजिबात द्यायचे नाहीत.
त्यामुळे नक्कीच वाचा !!
©️Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा