माझा वाचनाचा प्रवास 💜



मी एकंदरीत ७ वीच्या द्वितीय सत्रापासून अभ्यासाला सुरुवात केली.यापूर्वी माझ्या आयुष्याची गाडी ही काळोखाच्या दिशेने जात होती एकंदरीत माझा काहीच खरं नव्हतं,शाळेत जाण्याच्या नावावरच माझ्या अंगावर काटा यायचा बाकी अभ्यास/वाचन तर खूप लांबची गोष्ट होती.(इत्यादी तुम्हाला माहिती आहेच) इयत्ता पाचवी पासून न्यूनगंडाने माझी गाडी जी घसरली ती सलग अडीच वर्षे घसरलेलीच होती.या अडीच वर्षात मी फक्त आणि जुगार खेळलो,दिवसभर शेतात व गावाच्या नदीवरच पडलेलो असायचो.माझ्या आयुष्याचे अडीच वर्षे असेच गेले आणि एकूण या अडीच वर्षानंतर दिवाळीच्या सुट्टीत प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तसाच माझ्या आयुष्यात एक लाईफ चेंजिंग मुमेंट किंवा प्रसंग आला आणि येथूनच मी पूर्णपणे बदललो.

तो प्रसंग म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील जब्बार पटेल यांनी दिगदर्शीत केलेला चित्रपट बघणे.हा चित्रपट माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा चित्रपट बनला आणि हा चित्रपट बघून मी एकंदरीत बदललो किंवा सुधारलो..माझी आणि डॉ.बाबासाहेबांची ही पहिलीच मानसिकरीत्या भेट होती या आधी मला समजलेले आंबेडकर फक्त आणि फक्त जय भीम वाल्यांच्या पूर्तच मर्यादित होते गावातील लोकांच ऐकून हा माणूस फक्त बुद्धांचा नेता आहे अशी एक समज निर्माण झाली होती.पण हा चित्रपट बघून मला काही अंशी तरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अफाट व्यक्तिमत्त्व काय होते हे समजले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण,अभ्यास आणि वाचनावर प्रेम बघून मी अक्षरशः भारावलो आणि आता आपल्याला सुद्धा बाबांच्यासारख अभ्यास आणि वाचन करायचं, रोज शाळेत जाऊन उच्चशिक्षित व्हायचं आणि आपल्या देशासाठी,समाजासाठी काहीतरी करायचं असा मनोमन निर्धार केला आणि अशाप्रकारे माझी अभ्यासाला सुरुवात झाली.आता येथूनच मी नियमित शाळेत जायला सुरुवात केली आणि माझी आयुष्याची घसरलेली गाडी पुन्हा थोडी का होईना पण पटरीवर आली.रोज मी घरी येऊन शाळेत दिलेला गृहपाठ पूर्ण करून मी शाळेतील मराठी,हिंदी पुस्तकांच वाचन करायचो त्यातील धडे वाचायचो आणि काही कविता पाठ करायचो आणि डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावर पुन्हा कोठे काही वाचायला मिळते का याचा शोध घेत बसायचो.५-१० पर्यतचे शालेय पुस्तक मी तपासले पण मला हवी तेवढी बाबांच्या बद्दल माहिती मिळाली नाही यामुळें मी थोडा निराश झालो जरी पण मी माहिती शोधायचं कार्य सुरूच ठेवलं आणि अशातच माझ्या हाती डॉ बाबासाहेब आंबेडकर हे छोटेखानी पुस्तक पडले आणि मी सपाट्याने ते वाचून पूर्ण केले.माझ्या आयुष्यात शालेय पुस्तकाऐवजी मी वाचलेलं आणि खरेदी केलेलं हे पहिलं पुस्तक होत..

आता हे पहिलं वहिल पुस्तक मला मिळालं कसं आणि कोठे ?? झालं असं की बाबासाहेबांच्याबद्दल माहिती शोधायचं माझं काम सुरू असतानाच मी एकदा पालकांच्या सोबत रविवारी मेहकरला दवाखान्यात गेलो आणि माझी नजर पडली बस स्टँड शेजारी पुस्तके घेऊन बसलेल्या एका वृद्धावर आणि मी लगेच त्या दुकानावर गेलो.तेथील पुस्तक बघून मला एक वेगळीच फिलिंग आली जी या आधी कधीही आली नव्हती.तेथे जनरल नॉलेजच्या पुस्तकांपासून तर अनेक विषयावरील शेकडो पुस्तके होती. पण इकडे एवढ्या पुस्तकातून माझी नजर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल माहिती देणाऱ्या त्या एखाद्या पुस्तकाला शोधत होती पण ते मला एवढ्या पुस्तकात माझ्या नजरेत पडत नव्हते.म्हणून मी त्या काकाला म्हणालो " डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके बारे मे मालूमात देनेवाली किताब है क्या तुम्हारे पास ?? हे ऐकताच काकांनी माझ्या समोरच्याच पुस्तकातून एक पुस्तक काढले आणि मला दिले.मी विचार केला हे पुस्तक माझ्या नजरेसमोर असून व एवढं शोधून सुद्धा मला का दिसले नसेल ? मी मनोमनच हसलो मला ते उत्सुकतेपोटी दिसले नसेल कारण प्रथमच मी एवढे पुस्तक एकसोबत बघितले होते.हा माझा प्रथम अनुभव होता पुस्तक घेण्याचा.मी कधीही विचार केला नव्हता की मला येथूनच पुस्तकांचं वेड लागेल आणि पुढे हेच पुस्तके माझे खरे मित्र बनतील आणि मला खूप काही शिकवतील.

मी ते पुस्तक बघून एवढं जास्त खुश झालो की विचारूच नका "एखाद्याला खजिना सापडावा अशी माझी तेव्हा गत झाली "मी त्याला किंमत विचारली ते काका म्हणाले १२ रु मी ठीक हैं म्हणून मैं मेरे पप्पा को लेकरं आता हूं असे म्हणून पळत पळत वडिलांच्या कडे गेलो आणि त्यांना घेऊन त्या दुकानात आलो. वडिलांनी मला ते पुस्तक १० रुपयांत घेऊन दिले आणि मी जणू हवेत उडू लागलो.आता कधी घरी पोहोचतो आणि कधी हे पुस्तक वाचून समाप्त करतो याची उत्सुकता मला लागली.एकदाचा घरी आलो आणि ते छोटेखानी दहा रुपयाचं पुस्तक मी वाचून समाप्त केलं.मला वाटलं होते की हे पुस्तक वाचून मला बाबासाहेबांच्या बद्दल माहिती मिळेल आणि बाबासाहेबांच्या बद्दल असलेलं कुतूहल आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचं शोध थांबेल.पण झालं या उलट मला हे पुस्तक वाचून बाबासाहेबांच्या बद्दल पुन्हा अजून खूप खूप काही जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली,त्यांच्याबद्दल असलेलं कुतूहल जाम वाढलं कारण डॉ आंबेडकर हे फक्त कोण्या एका पुस्तकातून समजणारे व्यक्ती नव्हते हे मला त्यावेळी काही माहित नव्हतं.

आता येथूनच मला पुस्तकांची आवड लागली आणि मी बाबासाहेबांच्या सोबतच अनेक इतर महापुरुषांच्या बद्दल सुद्धा वाचायला सुरुवात केली.शिवराय,महात्मा फुले,शाहूमहाराज, टिपू सुलतान,मौलाना आझाद, महात्मा गांधी,भगत सिंह,सुभाषचंद्र बोस इत्यादी.गावातील व मेहकर,लोणार शहरातील ग्रंथालयात जाऊन मी काही पुस्तके वाचली आणि थोडं थोडं करून पुस्तकांचा संग्रह जमवायला सुरुवात केली.सुरुवातीला मी बस स्टँड वरून छोटेखानी पुस्तके विकत घेतली त्यामध्ये शेखचिल्ली, हातीमताई,छान छान गोष्टी,चंपक, अकबर बिरबल,पंचतंत्र गोष्टी आणि इतर काही पुस्तके होती जी मी आजसुद्धा सांभाळून ठेवलेली आहेत.आता माझा पुस्तक वाचनाचा आवाका मी वाढवायचं ठरवलं आणि ८ वीत असताना मी प्रथमच डॉ.एपीजे अब्दुल कलाम सरांचं आत्मचरित्र "अग्निपंख"हे पुस्तक १५० रुपयांत खरेदी करून २ दिवसांत वाचून पूर्ण केले.मी सर्वात प्रथम खरेदी केलेलं महाग पुस्तक हे अग्निपंख होय.

आता अग्निपंख वाचल्यानंतर मला वाचनाचा जणू वेडच लागलं आणि मी जमेल तसे पुस्तक खरेदी करूनच वाचायला सुरुवात केली.असे करत करत मी ११ वीत आलो इथपर्यंत माझ्याजवळ काही अशी विशेष पुस्तके नव्हतीच पण माझा वाचन हा सुरूच होता.११ वीत असताना मी फेसबुक वर संभाजी ब्रिगेडच्या संपर्कात आलो आणि येथूनच मला पुन्हा जास्त पुस्तक खरेदी करून वाचायची सवय लागली आणि मी पुस्तके आता ऍमेझॉन, बुक गंगा आणि इतर काही ठिकाणावरून खरेदी केली.अकोला,औरंगाबाद, जालना,खामगाव, बुलढाणा, चिखली आणि इतर काही शहरात गेल्यावर मी हमखास काही पुस्तके खरेदी केली..१२ वीत असताना मी प्रथमच मातुतीर्थ सिंदखेड राजा येथुन पुस्तके खरेदी केली आणि वाचुन काढली त्यानंतर कॉलेजच्या प्रथम वर्षात असताना मी यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलन येथे विशेष पुस्तके खरेदी करायला गेलो व यासोबतच सिंदखेड राजा येथून सुद्धा पुन्हा खूप पुस्तके खरेदी केली.

६ डिसेंबर रोजी मी चैत्यभूमी,मुंबईला गेलो आणि तेथून सुद्धा मी खूप सारी पुस्तके घेतली आणि वाचली.आता बघता बघता माझ्याजवळ बराच पुस्तकांचा संग्रह जमा झाला.मी अनेक पुस्तके वाचून समाप्त केली.पण पुस्तकांचं वेड माझा दिवसागणिक वाढतंच गेला पुस्तकासोबत माझी चांगलीच गट्टी जमली. मी याकाळात अनेक कादंबऱ्या वाचल्या आणि वाचून समृद्ध झालो.पुस्तकं हेच माझे खरे मित्र झाले आणि मी पुस्तकांचा..येथून मी पुस्तकांच्यासाठी वेगळं गुल्लक बनवून फक्त आणि फक्त पुस्तक खरेदीसाठी पैसे जमवायला सुरुवात केली आणि वाचवलेल्या पुस्तकातून पुन्हा अनेक पुस्तके खरेदी केली आणि अशाप्रकारे शून्यातून सुरुवात करून व परमपूज्य डॉ बाबासाहेबांचा आदर्श घेऊन मी माझा एक छोटासा पुस्तकांचा ग्रंथालय निर्माण केला.पुस्तकांसाठी पैसे जमा करून मी चांगदेव खैरमोडे लिखित १२ आणि बीसी कांबळे लिखित २४ बाबासाहेबांच्या जीवनावर लिहलेले खंड खरेदी करून वाचले आणि त्यातून खूप खूप शिकलो..यानंतर सुद्धा शेकडो पुस्तके मी खरेदी करून माझा ग्रंथालय वाढवला आणि बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेऊन हा ग्रंथालय थोडं थोड्याने का होईना पण खूप वाढवतोय आणि माझं वाचन सुद्धा वाढतचं चाललंय..💜

#जय_भीम❣️

©️ Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼