नदिष्ट 💜



काही दिवसांपूर्वी मनोज बोरगावकर सर लिखित #नदिष्ट या अफलातून कादंबरीचा मनोरंजक, सुंदर आणि खूप काही शिकवून जाणारा प्रवास संपला..BookTuber विनम्र बाभल यांच्या नवीन युट्यूब चॅनेल वरील पहिलाच विडिओ #नदिष्ट या कादंबरीवर होता.तो व्हिडिओ बघितल्या पासून मला नदिष्ट वाचण्याची जबरदस्त उत्सुकता लागली होती.कारण त्यांनी त्या व्हिडिओ मध्ये ज्याप्रकारे या कादंबरीच वर्णन केले होते ते बघून तर न वाचताच अक्षरशः मी या कादंबरीच्या प्रेमात पडलो होतो.त्यामुळे लगेच ही कादंबरी खरेदी करण्यासाठी ऍमेझॉन वर search केलं पण तेथे उपलब्ध नसल्याने निखिल दादा वाघमारे यांना Msg केला..आणि त्यांच्या कडून अक्करमाशी, पुन्हा अक्करमाशी आणि नदिष्ट मागवून घेतली आणि काहीच दिवसांत नदिष्ट मला येऊन मला मिळाली..

सर्वप्रथम तर मी या कादंबरीला हातात घेऊन मुखपृष्ठ पासून तर बॅक कव्हर पर्यत निहाळलं..मुखपृष्ठावरील नदिष्ट हा नाव आपलं विशेष लक्ष वेधून घेतो.या साडेतीन अक्षराच्या नावात आपल्याला नदीमायचे दर्शन होतात..एकदम सुंदर आणि अप्रतिम फॉन्ट या नावाला दिलं गेलंय.. मुखपृष्ठावर असलेलं नदीच आणि नदीत उमटणारं त्या आकाशाच प्रतिबिंब आपल्याला त्याच्या प्रेमात पाडत असतो..
 सकाळी पार्सल मिळाल्या मिळाल्या मी या रंजक प्रवासाला सुरुवात केली आणि एकाच बैठकीत ही कादंबरी वाचून संपवली आणि अक्षरशः या कादंबरीचा हँगओव्हर माझ्या मनावर किंवा हृदयावर चढला होता..माझ्या डोक्यातून काही केल्या या कादंबरीतील पात्र आणि प्रसंग जाता जात नव्हते..सगुणा,सकिनाबी,भिकाजी,दादाराव,कालू भैया आणि आपले लेखक इत्यादी हे माझ्या हृदयात घर करून गेले होते..कादंबरी वाचून रात्रीच मी सरांना व्हाट्सअप्पवर संपर्क करून थोडक्यात अभिप्राय दिला.सरांचा सकाळीच रिप्लाय आला आणि लगेच सरांनी कॉल सुद्धा केला.सकाळी सरांशी काहीवेळ बोलण झालं..सरांशी बोलून मला प्रचंड आनंद झाला..थोड्या वेळात सरांनी Msg करून संध्याकाळी कॉल करतो म्हणाले आणि संध्याकाळी आवर्जून कॉल सुद्धा केला हा सरांचा Down to Earth  स्वभाव मला प्रचंड आवडला..त्यादिवसापासून आजपर्यंत मला याबद्दल लिहायचं होत पण मी जाणून बुजून थोडा उशीर केला कारण मला माझा अनुभव विस्तृत लिहायला आवडते.घाईगडबडीत महत्वपूर्ण मुद्दे लिहायचे बाकी राहतात..

#नदिष्ट बद्दल सांगाव,लिहावं तेवढं कमीच आहे कारण ही कादंबरीच तशी शानदार आणि मनमोहक आहे..मी आजपर्यंत वाचलेल्या अनेक कादंबऱ्यातून ही कादंबरी सर्वात वेगळी ठरते आणि माझ्या आवडीच्या टॉप कादंबऱ्यात ही कादंबरी अग्रणी ठरते..आपल्याला घरी बसल्या बसल्याच नदीचा एक अफलातून प्रवास करवून आणण्याची प्रचंड ताकद या कादंबरीच्या लिखाणात नक्कीच आहे .कादंबरी वाचता वाचता आपण त्यामध्ये एकंदरीत हरवून जातो आणि आपण सुद्धा लेखकाच्या सोबत नदी भ्रमण करत असल्याचा,पोहण्याचा,लेखकांना भेटलेल्या माणसांना भेटल्याचा फिल आपल्याला येतो..लेखकांनी ज्याप्रकारे त्यांनी जगलेले आणि अनुभवलेले क्षण, अनुभव कादंबरीत मांडलेले आहेत ते वाचत असताना आपण त्यामध्ये गुंतुन जातो आणि त्याचा एक भाग होतो. वाचन सुरू केल्यावर आता नेमकं पुढं काय याची सारखी उत्सुकता आपल्याला लागलेली असते.पहिल्या पानापासून शेवटच्या पृष्ठापर्यत ही कादंबरी आपल्याला कोठेही आणि कधीही थोडसं सुद्धा बोअर होऊ देत नाही हे विशेष...कादंबरीत नदीवरचे विश्व तर मांडलेले आहेतच त्यासोबतच आपल्या समाजातील अनेक गोष्टींवर नकळत भाष्य केले आहे जे वाचून आपण एकंदरीत विचारात पडतो तर कादंबरीतील अनेक प्रसंग आपल्याला नकळत माणुसकीचे दर्शन घडवून जातात..

नदीवर प्रेम करायला लावणारी,किन्नर समाजाप्रती आपला दृष्टिकोन बदलणारी आणि आपल्याला एक वेगळ्याच विश्वात नेणारी कादंबरी नदिष्ट ही होय..निसर्गासोबत संवाद साधण्याचा आणि मानव व निसर्गामध्ये असलेली दरी कमी करण्याचा प्रयत्न ही कादंबरी बखुबी करते..लेखक नदीवर त्यांना भेटलेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील कथा समजून घेतात व आपल्यासमोर या कादंबरीच्या रूपाने सादर करतात..१० वर्षे पोहायला सतत नदीवर जाणाऱ्या लेखकांचे हे प्रवास वाचताना आपण रोजनिशी वाचतोय की काय असा भास होतो. कोठेही आपण कादंबरी वाचतोय असं वाटतच नाही.सोप्या आणि सुंदर भाषेत लेखकांनी या कादंबरीला योग्य तो न्याय दिला आहे.अनेक ठिकाणी हिंदी,उर्दू,इंग्रजीतील शब्द चपखल बसवले गेले आहेत जे वाचत असताना भन्नाट वाटतात...नदीबद्दल प्रेम व्यक्त करताना लेखक म्हणतात 

" आईच्या गर्भात नाही का आपण निर्धोक ९ महिने ९ दिवस गर्भाशयातल्या पाण्यात राहिलो. ही नदीदेखील आईच. या प्रकारे लेखक नदीशी आपलं असणारं नातं ते येथे व्यक्त करतात..

कादंबरीतील अनेक प्रसंग आणि पात्र आपल्याला त्यांच्या मोहात पाडतात..खाली मला आवडलेले प्रसंग आणि पात्राची ओळख दोन शब्दांत येथे मांडतोय बाकी इतर अनेक प्रसंग आणि पात्राची ओळख तुम्हाला कादंबरीत होईलच.. 

सकिनाबी रेल्वेवर भीक मागणारी बाई जी लेखकाला नेहमी माटीमिले या शब्दांनी हाक मारायची.जेव्हा ती रेल्वे खाली येऊन मेल्याची बातमी लेखकाला माहिती होते.तेव्हा आपले डोळे नम होऊन आपल्याला ती अश्याप्रकारे मेल्याचा दुःख होतो..

झिंगाभोई बामनवाड यांच्यासोबत लेखकांची चांगलीच ओळख  झालेली असते.काही दिवस तो लेखकांना नदीवर दिसत नाही आणि अनेक दिवसांनी भेटून - त्याच्यासमोर नदीच्या झाडीत एका नवस फेडायला आलेल्या बाईचा बलात्कार होतो पण तो काहीच करू शकत नसल्याची हतबलता बद्दल तो लेखकांना सांगतो तेव्हा मानवी मनाची विविध आणि वेगवेगळी रूपं आपल्याला या द्वारे लेखक दाखवुन देतात..

यासोबत मंदिराचा पुजारी आणि कालूभैया ज्यांच्यासोबत लेखकांची रोज भेट होत असते.हे दोन्ही पात्रे आपल्याला आपली वाटतात..यासोबत सगुणा हा मुख्य पात्र म्हणजेच ज्याला आपण आपल्या भाषेत हिजडा म्हणतो आपल्यासमोर येतो आणि त्याच्या समाजातील दुःख आपल्यासमोर ती मांडत असते.आपला किन्नर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा किती चुकीचा आणि बेढंग आहे याची प्रचिती आपल्याला सगुणा बद्दल वाचताना आणि तिची व्यथा जाणून घेताना सतत येत असते.किन्नर समाज हा कायम दुर्लक्षित राहिलेला आहे त्यांना आपल्या समाजाने कधीही समानतेची वागणूक दिलेली नाही.ते सुद्धा आपल्यासारखीच हाड मासांची माणसं आहेत त्यांना सुद्धा दुःख,वेदना असतात हे आपल्याला सगुणाबद्दल वाचताना कळते .लेखकांना भेटलेला हा पात्र एकंदरीत आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायचा काम करतो..

प्रसाद हा पात्र आपल्याला सापांच्या विश्वात नेतो,त्याच्याबद्दल वाचत असताना आपल्याला सापांची एक वेगळीच दुनिया अनुभवायला मिळते.त्याच्या तोंडातून सापाविषयी व त्याने केलेल्या धाडसी कृत्याबद्दल वाचताना आपण थक्क होतो.सापाचे तोंड मदारी टाक्याने शिवून टाकत असतात हे वाचून तर अक्षरशःआपण उदास होतो..

भिकाजी हा भिकारी पात्र ,जो सुद्धा इतर पात्राप्रमाणेच लेखकांना नदीवरच भेटला होता..लेखकांनी त्याच्यासोबत आपला डबा शेअर करून त्याचा डबा लेखकांनी खाल्ला होता यातच सर्वकाही आलं.हा प्रसंग मला प्रचंड भावला.आयुष्यात किती लहान व्हायचं आणि किती मोठं तर एवढंच.जमिनीशी,मातीशी जुडून राहण्यात जो सुकून आहे तो कशातच नाही.
सुरुवातीला काहीही बोलत नसलेल्या या पात्राला लेखक बोलका करतात,त्याच्या मनातील अनेक वर्षांपासून व्यक्त न झालेली त्याची धक्कादायक कहाणी जाणून घेऊन ती आपल्यासोबत मांडत असतात जे वाचताना कधीकधी आपल्या अंगावर काटा येत असतो..

सगुणा असो किंवा भिकाजी परिस्थितीने हतबल ही पात्रे आपल्या अवतीभोवती सुद्धा वावरताना आपल्याला नेहमी दिसतातच पण त्यांच्याबद्दल आपण कधीही साधं विचार सुद्धा करत नाही,त्यांना व्यवस्थित वागणूक देत नाही आणि हाच आपला खरा चेहरा असतो..इत्यादी असंख्य गोष्टी आपल्याला नदिष्ट वाचताना शिकायला मिळते.

एकेदिवशी नदीकिनारी माकडांची टोळी ज्या निर्दयतेने हरणाच्या पाडसाला उचलून चिंचेवर नेतात व संपवतात त्याचे वर्णन ज्याप्रकारे लेखक करतात आणि वर्णन करत असताना आपण माकडाचे वंशज आहोत या त्यांना न पटलेल्या डार्विनच्या सिद्धांताला पटवून घेतात आणि आपल्याला सुद्धा पटवून देतात..हा प्रसंग वाचून मनात एक वेगळीच भावना येते आणि आपण माकडांचे वंशज आहोत ही थेअरी खरी ठरते..हा माकडपुराण प्रकरण वाचत असताना अक्षरशःआपण हादरून जातो.हा माकडपूराण घडल्या नंतर नेहमी बहरत असलेल्या त्या चिंचेला पुन्हा कधीही चिंचा आल्या नाही हे वाचून आपल्याला निसर्गाची संवेदना किती अफाट आहे हे समजते..
इत्यादी असे खूप प्रसंग या कादंबरीत जे तुम्ही स्वतः वाचावे व या अफलातून कादंबरीचा आस्वाद घ्यावा ही विनंती...मी कादंबरी वाचली आणि याच्या खूप खूप प्रेमात पडलो.ही कादंबरी मी काही वेक नदीच्या किनारी जाऊन वाचली सुद्धा एवढा प्रभाव या कादंबरीने माझ्यावर टाकला.पक्षी,प्राणी,वन,शेत, झाड,झुडपांची मला आवड होतीच आणि आता या यादीत नदीची पुन्हा भर पडली आणि मी आपल्या नदिमायला व तिच्या प्रेमाला समजू शकलो ते फक्त या कादंबरीमुळे..

किन्नर समाजाची दुनिया आणि त्याला काही पौराणिक कथांचा आधार,मोर नेहमी ऐटीत का चालतो या प्रश्नाचं उत्तर,आणि इत्यादी खुप साऱ्या बाबी आपल्या या कादंबरीत वाचायला मिळतात... एकंदरीत सांगायचं असल्यास नदिष्ट ही कादंबरी खूप खूप सुंदर असून प्रत्येकाने वाचून इतरांना सुद्धा वाचायला प्रेरित करायला हवी...आणि शेवटी विनायक पाटील यांनी बॅक कव्हर वर लिहलेल्या काही नेमक्या आणि मोजक्या ओळीं या कादंबरीच्या बाबतीत तंतोतत खरी ठरतात..

विनायक पाटील म्हणतात....

" विषय चाकोरीबाहेरचा आहे . शैली पहिल्या धारेची आहे . थेट कोंडुरा किंवा बनगरवाडीची आठवण करून देणारे लिखाण आहे . ' नदीष्ट ' ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नाही , तो आहे त्यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार . ' नदीष्ट ' ही मराठी कादंबरीविश्वातील अकरावी दिशा आहे ..💛💜

©️Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼