वॉल्डन 💜
गेल्या काहीच दिवसांपूर्वी वॉल्डन या पुस्तकाचा नुकताच प्रकाशित झालेला मराठी अनुवाद वाचून समाप्त झालं. आणि तेव्हापासून मी फक्त आणि फक्त वॉल्डन,थोरो आणि निसर्गाच्या सानिध्यातच वावरतोय..एकंदरीत मी थोरो गुरूच्या प्रेमात पडलोय.त्यांना मी मनापासून निसर्गाबद्दल माझं गुरू मानलं आहे.
जेव्हा पासून मी हे पुस्तक वाचून संपवलय तेव्हापासून मी त्याला परत कपाटात ठेवलेच नाही.वॉल्डनला मी माझ्या नजरेसमोरच ठेवले आहे आणि नेहमी असेच ठेवीन.वॉल्डन या पुस्तकाने मला निसर्ग,प्राणी,पक्षी,किटक,झाडं,नदी इत्यादी वर सदा प्रेम करावे हे शिकवलंय..
इ.सन १८५४ रोजी प्रकाशित झालेल्या वॉल्डन या पुस्तकातील थोरो गुरूचे विचार आजच्या युगात सुद्धा तेवढेच प्रासंगिक आहेत.त्याकाळापेक्षा आजच्या काळात थोरो गुरूच्या विचारांची सर्वात जास्त गरज विश्वाला आणि समस्त मानवजातीला आहे.स्वार्थी मानवाच्या हाताने निसर्गाचा होत असलेला वऱ्हास थांबवण्यासाठी आपल्याला थोरो गुरुजींच्या विचारांना समोर ठेऊनच चालावे लागेल..आजच्या धावपड व धकाधकीच्या मानवी जीवनात आपण जरा थांबून निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवे.निसर्ग आपल्याला कोणत्याही गोष्टीची कधीही आणि केव्हाही कमी पडू देत नाही आणि देणार सुद्धा नाही. तो पृथ्वीवरील सर्वांची गरज भागवायला सक्षम आहे ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल.
याबद्दल थोरो गुरू म्हणतात....
"सूर्य , वायू , पर्जन्य आणि निसर्गाच्या निरागस , कुठलीही अपेक्षा न ठेवता दाखविलेल्या औदार्यामुळे आज आपण आनंदी आहोत , आपली प्रकृती उत्तम आहे. आणि हे औदार्य आपल्याला जन्मभर उपभोगायला मिळणार आहे . निसर्गाच्या मनात तर मानवाबद्दल एवढी अनुकंपा , प्रेम भरले आहे की मला खात्री आहे की मानवाला योग्य कारणासाठी थोडेसे जरी दुःख झाले तरी सूर्य दुःखाने झाकाळून जाईल . वायू मानवाप्रमाणे उसासे टाकेल आणि ढग अश्रू ढाळतोल . जंगलांची खाने पानगळ होईल , अशा या पृथ्वीशी मी का नाही बोलू शकत ??
आजच्या तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात आपण स्वतःला जेवढं गुंतवुन घेतलं आहे त्याची तेवढी खरंच गरज आहे का ??नुसती शो बाजी व जास्तीत जास्त संसाधनाची आपल्याला कितपत गरज आहे ??इंटरनेट, वीज आणि वायफळ सुविधेशिवाय आपण राहूच शकत नाही का ??
इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला वॉल्डन वाचताना आपोआप मिळत जातात..आणि एकंदरीत विचार करायला भाग पाडतात.
थोरो गुरुजी म्हणजे निव्वळ थोर माणूस. सर्वात प्रथम जर कोणत्या विचारवंताने निसर्ग/पर्यावरणाचा विचार केला असेल तर तो थोरो गुरुजींनीच.
२ वर्ष २ महिने २ दिवस कंकाॅर्डजवळच्या
वॉल्डन नामक तळ्याकाठी जंगलात वास्तव्य करून तेथे काय काय केलं याचं वृतांत त्यांनी वॉल्डन या पुस्तकात केलेलं आहे.अनुभव सांगता सांगता जीवनातील अनेक समस्यांविषयीचे आपले विचारही त्यांनी या पुस्तकात व्यक्त केले आहेत. अनेक भाषांत या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत. वॉल्डनकाठी त्यांनी स्वतःच्या हाताने घर बांधले,शेती केली,अन्न शिजवले,निसर्गाचे निरीक्षण केले व एकंदरीत निसर्गाशी पूर्णपणे एकनिष्ठ राहून त्यांनी २ वर्ष तेथे काढले. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी स्वकष्टाच्या जीवनाचा आनंद लुटला.या पुस्तकातून मानवी आयुष्यातील काही अशा गोष्टीवर थोरोंनी प्रकाश टाकला ज्याबद्दल आपण कधीही आणि केव्हाही विचार करत नाही..वॉल्डन वाचत असताना आपल्याला निसर्ग,वाचन,संगीत,प्राणी/पक्षी प्रेम,स्वकष्ट आणि एकांताचे महत्व कळते..थोरो जरी जंगलाच्या एकांतात होते तरीही त्यांनी मानवी संपर्क तोडला नव्हता.त्यांना भेटायला नेहमी काही जण येत होते.आणि त्यांना भेटून थोरोंना आनंद होत असे..
निसर्गाबद्दल मानवाला उद्देशून थोरो गुरू म्हणतात
"ऋतू चक्रातील प्रत्येक ऋतूवर मनापासून प्रेम करा, उत्कटपणे तो ऋतू जगा. प्रत्येक ऋतूत हवा वेगळी असते, पाणी वेगळे असते, फळे वेगळी असतात त्यामुळे प्रत्येक ऋतूत या सगळ्याचा आस्वाद घ्या. त्या त्या ऋतूत मिळणारी फळे, हवा, पाणी हाच तुमचा आहार असू देत. तुमची पेयं आणि तीच तुमची औषधे असू देत. ऑगस्ट महिन्यात फक्त बेरीज वर राहा. त्या महिन्यात मांसाहार वर्ज्य करा. असे समजा की तुम्ही एखाद्या निर्जन वाळवंटातून किंवा सागरातून प्रवास करत आहात आणि बेरीज शिवाय तेथे काही मिळत नाही. अंगावर जरा वारा घ्या. शरीरातील रंध्रे उघडू द्या आणि निसर्गाच्या लाटांमध्ये, झर्यांच्या पाण्यामध्ये, महासागरांच्या लाटांवर स्वार होत त्यात स्नान करा।
निसर्गालाच तुझ्यासाठी खर्या मद्याचे प्याले भरू देत कारण निसर्ग प्रत्येक क्षणी आपल्याला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. शिवाय हे काम तो खास तुझ्यासाठी आणि विनामोबदला करत असतो. त्याचे अस्तित्व यासाठीच तर आहे. त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष विरोध करणे हा आपला मूर्खपणा। निरोगी राहण्याची तुमची इच्छा जर तीव्र असेल तर निसर्ग तुम्हाला निरोगी राहाण्यासाठी मदतच करणार हे निश्चित. माणसाला आरोग्यासाठी निसर्गातील काही गोष्टींचाच फायदा कळला आहे..
थोरो गुरुचे इत्यादी विचार वाचून त्यांचा थोरपण आणि निसर्गाप्रति असलेली त्यांची निष्ठा कळते..यामुळे मला आधी तर होतीच पण आता खूप खूप जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहायची,पक्षी/प्राणी,झाड,झुडपं,नदी निरीक्षण व वाचनाची जाम आवड लागलेली आहे..हे पुस्तक आजच्या काळात सर्वांनीच वाचायला हवे आणि निसर्गाचे महत्व समजून घ्यायला हवे.कोरोना सारख्या आजाराने तर आपल्याला आपली लायकी दाखवून दिली आहेच त्यामुळे वॉल्डन वाचून मानवाने आपण कोठे चुकलो याच आत्मपरीक्षण करायला हवे.आपण आज जो धावपडीच जीवन जगतोय तो खरंच कितपत योग्य आहे ??हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा.निसर्गाचे महत्व ओळखून आपण काही दिवस तरी निसर्गाच्या सानिध्यात घालायला हवे.प्राणी,झाडं, नदी यांच्यावर प्रेम करायला हवे.होईल तेवढं प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवे.आणि शेवटी शक्य होईल तेवढी जिवाभावाची माणसं जोडून माणुसकीचं नात आपण जोडायला हवं...💜
©️ Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा