जीम कॉर्बेटच्या सान्निध्यात…💖💙
हल्ली वाचनात सतत जीम कॉर्बेट सर येतायत… त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून ते अधिक जवळ येतायत, जणू काही मी त्यांच्या सोबतच त्या जंगलात फिरतोय, त्या वाघाच्या मागावर चाललोय, त्या भीतीच्या, एकटेपणाच्या नि धाडसाच्या क्षणांना टच करतोय.
सुरुवातीला माय इंडिया पासून सुरुवात केली नि जंगल लोअर” वाचलं अन् एक गोष्ट लगेच लक्षात आली की निसर्गाला समजून घेणं म्हणजे केवळ माहिती जमवणं नाही तर अनुभवातून शिकणं. जीम कॉर्बेट म्हणतात की जंगल समजण्यासाठी पुस्तकं पुरेशी नाहीत झाडांच्या सावलीत, प्राण्यांच्या हालचालींमध्ये, मातीतून उठणाऱ्या वासात जे शिकता येतं तेच खरं जंगलाचं शास्त्र असतं.
त्यांचं Man-Eaters of Kumaon वाचताना मी अक्षरशः त्या थरारक क्षणांमध्ये होतो. जिथे एखादा नरभक्षक गावकऱ्यांवर दहशत निर्माण करतो नि जीम सर त्या प्राण्याला शोधून, त्याच्या सवयी समजून, अखेर अत्यंत संयमानं त्याला मारतात. पण यात कुठेही सूडाचा भाव नाही फक्त जवाबदारी आहे, नि माणसांच्या जीवनासाठी केलेली कर्तव्यपूर्ती आहे.
My India वाचताना मात्र त्यांच्या मनातली माणुसकी समोर आली. त्यांनी ज्या प्रकारे आदिवासी, ग्रामीण लोकांशी नातं जोडलं त्यांची बोली, त्यांचे विचार, त्यांचा साधेपणा हे इतकं जिवंतपणे वर्णन केलंय की मला वाटलं जणू हे सारे लोक माझ्यासमोरच बसले आहेत.
ते म्हणतात हा देश माझा आहे…तेव्हा जाणवलं की, प्रेम हे केवळ शब्दांनी नाही तर कृतीतून सिद्ध होतं. त्यांनी लोकांचं दुःख उचलून घेतलं, त्यांच्या गरजा समजून घेतल्या नि एक ब्रिटिश असूनही आपल्यातले झाले.
Man-Eating Leopard of Rudraprayag वाचताना जाणवलं की एखाद्या शिकाऱ्याचं काम केवळ गोळी झाडणं नसतं तर त्या मागचं निरीक्षण, संयम नि सातत्य हे किती महत्त्वाचं असतं. आठ वर्ष एका बिबळ्याच्या मागावर राहणं केवळ धाडस नाही तर ही एक मानसिक लढाई सुद्धा होती.
Temple Tiger मधल्या कथांमधून कॉर्बेटचं मन अगदी स्पष्ट उमगतं शिकार ही त्यांच्यासाठी ‘क्रूरता’ नव्हती तर निसर्गातला संतुलन राखण्याचं एक माध्यम होती. त्यांनी कधीही विनाकारण शिकार केली नाही नि जेव्हा वाघ वा बिबळा नरभक्षक होई तेव्हाच त्यांनी तो निर्णय घेतला.
या सगळ्या पुस्तकांमधून कॉर्बेट माझ्या मनात केवळ एक शिकारी म्हणून नाही तर एक सजग, संवेदनशील नि निसर्गाशी एकरूप झालेला माणूस म्हणून उभा राहिले आहेत.
आजच्या काळात आपण जंगल फक्त ट्रिपसाठी, फोटोंसाठी पाहतो. पण जीम सर सांगतात की जंगल हे अनुभवायचं असतं… ऐकायचं, समजून घ्यायचं नि सन्मानानं जगायचं असतं.त्यांच्या पुस्तकांतून माझ्या वाचनाची नजर बदलली, निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलली नि माणसांच्या दुःखांबद्दल समजही खोल झाली.
त्यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ मनात घर करून गेली नि म्हणूनच मी जीम कॉर्बेटच्या सान्निध्यात आहे…💖💙
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा