उष्टं…❤️



मागे ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘जुठन’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद ‘उष्टं’ वाचून पूर्ण केलं.
मराठीतील उपरा, बलूतं, उचल्या, अक्करमाशी, भंगार, कोल्हाट्याचं पोरं या धाटणीतील दलित साहित्याच्या परंपरेत बसणारं हे पुस्तक प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचलंच पाहिजे.

हे फक्त आत्मचरित्र नाही तर हा समाजाच्या अंतर्मनात लपलेल्या कुरूपतेचा आरसा आहे.
भंगी समाजात जन्मलेले वाल्मिकी यांनी पावलोपावली अनुभवलेली हीन वागणूक, उपेक्षा, जातीयभेदाचे जळजळीत चटके, असमानता नि दारिद्र्याचे अनुभव ते निःसंकोचपणे मांडतात. वाचताना मन सुन्न होतं, डोळे पाणावतात नि आपण अजूनही बदलाची गरज आहे हे नाकारता येत नाही.

या पुस्तकाची ओळख मला पहिल्यांदा NCERT च्या एका धड्यातून झाली. तिथला एक छोटा प्रसंग वाचूनच पोटात गोळा आला होता नि तेव्हाच ठरवलं की हे पुस्तक पूर्ण वाचायचंच. हिंदी मूळ वाचण्याऐवजी 2018 साली लोकवाङ्मय गृहकडून आलेला डॉ. मंगेश बनसोड यांचा मराठी अनुवाद बोलावला नि पहिल्या पानापासूनच ते डोक्यात नि हृदयात उतरलं.

वाल्मिकी यांचं बालपण उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका लहान गावात गावकुसाच्या बाहेर, नाल्याजवळील भंगी वस्तीत गेलं. हीच ती जागा जिथे गावातील लोक मलमूत्र विसर्जनासाठी येत.
त्यांच्या कुटुंबाचं जगणं म्हणजे इतर समाजाने तुच्छ मानलेली कामं पण तरी दोन वेळचं अन्नही हमखास मिळेल याची खात्री नाही.

शिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या आयुष्यातील संघर्ष अजूनच उग्र झाला.शाळेत, समाजात, रस्त्यावर सर्वत्र जातीय भेदभाव, अपमान, बहिष्कार. काही प्रसंग इतके घृणास्पद की वाचताना हात थांबवावा लागतो नि मनात एकच विचार येतो, ही लोक माणसं कशी म्हणवतात स्वतःला? 🥲

लोकनाथ यशवंत म्हणतात,

“जुठन म्हणजे त्या गुलाम मानसिकतेचा आरसा आहे, जी तथाकथित उच्चांनी शतकानुशतकं पाळीव करून ठेवली… नि आपणच आपल्या देशाचा विद्रूप चेहरा यात पाहतो.”

हे पुस्तक वाचून कळतं संविधान आलं तरी माणसाच्या मनातलं असंविधान अजून संपलेलं नाही.
उष्टं म्हणजे फक्त ओमप्रकाश वाल्मिकींची कथा नाही तर आपल्या समाजाच्या सामूहिक अपराधाची कबुली आहे.

आवर्जून वाचा.
❤️

©️ Moin Humanist ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼