शहीद भगतसिंहांची जेल डायरी…🩷🌱



हे पुस्तक वाचताना असं जाणवतं की आपण फक्त तुरुंगातल्या कैद्याची नोंद वाचत नाही तर एका विचारवंताचा मेंदू, त्याची स्वप्नं, त्याची जिद्द नि त्याच्यातून उमलणारी क्रांती यांना जवळून अनुभवतोय .

या डायरीतून कळतं की भगतसिंह हे केवळ बंदुकीवर विश्वास ठेवणारे क्रांतिकारक नव्हते तर ते प्रखर वाचन करणारे, प्रश्न विचारणारे नि समाजाचं भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहणारे तत्त्वज्ञ होते. तुरुंगातल्या 713 दिवसांत त्यांनी तब्बल 302 ग्रंथ वाचले, 5 पुस्तकं लिहिली नि 116 दिवसांच्या उपोषणानंतर ही 404 पानांची डायरी लिहायला सुरुवात केली. जरी आज आपल्या हातात फक्त 137 पाने उपलब्ध असली तरीही त्या प्रत्येक पानात विचारांची संपत्ती आहे. 

यात इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य अशा अनेक विषयांवर सखोल चिंतन आहे. भगतसिंहांनी धर्म, जात, विषमता, न्यायव्यवस्था अन् स्वातंत्र्य यावर जे विचार लिहिले ते आजच्या काळातही तितकेच लागू पडतात. प्रत्येक पान वाचताना असं वाटतं की ते थेट आपल्या मनाशी बोलत आहेत नि आपल्याला जागं करत आहेत. 

आपल्यापैकी अनेकांनी भगतसिंहांना फक्त शौर्यवान क्रांतिकारक म्हणून पाहिलं आहे पण ही डायरी वाचली की ते किती प्रगल्भ विचारवंत होते हे लक्षात येतं. ही डायरी एकदा का हातात घेतली की आपलं जगाकडे पाहण्याचं भानच बदलतं. आजच्या तरुण पिढीने ही डायरी वाचणं गरजेचं आहे कारण यातून केवळ देशभक्ती नाही तर कसा विचार करावा, बदलाला कसं सामोरं जावं नि समाजाकडे जबाबदारीनं कसं बघावं हे शिकायला मिळतं.  

एवढचं …🤍🩷

©️Moin Humanist 🌱🤍

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼