प्रथम अर्थात् अंतिम मुक्ति…..❤️
ओशो यांना वाचल्यानंतर काही दिवसांपुर्वी जे. कृष्णमूर्ती यांच्याकडे वळलोय.आधी यूट्यूब नि गुगल वर काही बघून ,वाचून त्यांच्या ‘The First And Last Freedom’या पुस्तकाचा मराठी अनुवाद , ‘प्रथम अर्थात् अंतिम मुक्ति’ हे वाचायला घेतलं नि कधी वाचून पूर्ण केलं समजलं सुद्धा नाही .🌱
हे पुस्तक वाचताना मला कायम जाणवत राहिलं की आयुष्यात खरी मोकळीक, मनःशांती नि आनंद मिळवण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. कृष्णमूर्ती खूप स्पष्टपणे सांगतात, की आपली सुख-दुःख, समस्या, गोंधळ हे सगळं बाहेरच्या गोष्टींमुळे किंवा नियतीमुळे घडत नसतं तर ते आपल्याच मनाच्या विचाराच्या अन् जुन्या सवयींच्या साखळीत अडकलेलं असतं. हे पुस्तक वाचताना प्रकर्षानं जाणवतं की खरी “मुक्ती” म्हणजे स्वातंत्र्य, ही धर्म, प्रथा, शिकवणी किंवा कुठल्या आदर्शाच्या मागे धावून मिळत नाही तर ती आपल्याला स्वत:च्या मनाचा, विचारांचा नि कृतींचा तल्लखपणे शोध घ्यावा लागतो असे कृष्णमूर्ती यात समजावतात.
या पुस्तकात सुरुवातीला कृष्णमूर्तींनी अनेक दैनंदिन प्रश्न कंटाळा, भीती, दुःख, ईश्वर, आत्मज्ञान अगदी सरळ भाषेत सांगितले आहेत. वाचताना जाणवतं, की त्यांच्या प्रत्येक उदाहरणामागे एक साधा मुद्दा लपलेला असतो: आपण स्वतःलाच समजून घ्यायला नि निरीक्षण करायला शिकलं पाहिजे. इतरांनी सांगितलेली गोष्ट, मोठ्या पुस्तकी ज्ञानाने किंवा परंपरांनी अखेर मन शांत होत नाही कारण प्रत्येक माणसाला स्वतःच्या अनुभवातून ठरवलेली सत्यता नि आनंद मिळत असतो .
पुस्तकात “मुक्ती” हा शब्द केवळ आध्यात्मिक अर्थाने वापरलेला नाही तर रोजच्या छोट्या गोष्टीतही स्वातंत्र्य, नवे विचार व स्वतःशी प्रामाणिक संवाद कसा साधता येईल, हे सांगितलं आहे. मुळात माझ्यामते हे पुस्तक कोणत्याही धर्मापेक्षा, गोड वाटणाऱ्या विधानांपेक्षा, किंवा परंपरांपेक्षा, एका सामान्य माणसांनी स्वतःची जबाबदारी घ्यावी, स्वतःचा मन:शोध घ्यावा याचा आग्रह धरतं. कृष्णमूर्ती ठामपणे म्हणतात संगठित धर्म, बाह्य गुरु किंवा ठराविक कल्पनांवर विश्वास ठेवल्याने माणूस फक्त विभागला जातो नि त्याच्या मूळ प्रश्नांना सामोऱं जायला तो कच खातो.
यातील प्रत्येक पॅराग्राफ , प्रत्येक प्रश्न अन् उत्तर ह्या सगळ्या गोष्टी मनात खोलवर रुजतात. सहसा आपण समस्यांचं समाधान सामूहिक तत्त्वज्ञानात, इतरांनी सांगितलेल्या मार्गदर्शनात किंवा परंपरेच्या आधारे शोधतो पण कृष्णमूर्ती यांची शिकवण सांगते की, काहीही झालं तरी जगण्यातली खरी क्लिष्टता नि त्याचं उत्तर फक्त “स्वतःच्या जागरूकतेत” आहे.हे पुस्तक उपदेश देत नाही, भावनिक करत नाही तर प्रत्येक वाचकाला आपल्या आत डोकावून, स्वतःच्या स्वभावाचा, इच्छांचा, मनाच्या साचा नि सवयींचा प्रामाणिक शोध घ्यायला शिकवतं.
या पुस्तकाचा प्रवास माझ्यासाठी म्हणजे शांत, विचारप्रवर्तक नि खोलवर मनाला भिडणारा ठरला . कोणत्याही नैराश्य, भीती, किंवा मानसिक गुंत्यात अडकलेल्या माणसाला, किंवा आयुष्याचा खरा अर्थ शोधायची आस असलेल्या प्रत्येकाला हे पुस्तक कधी ना कधी वाचायलाच हवं. कारण प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्यात स्वतःच्या आत असतं हे शिकण्यासाठी नि हेच “प्रथम”, हेच “अंतिम” आणि हीचं खरी “मुक्ती”..❤️
©️Moin Humanist 💝
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा